Saturday, May 11, 2019

शासनाने दुष्काळग्रस्त लोकांना तातडीने मदत करावी:प्रकाश जमदाडे

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात १९७२  पेक्षाही भयावह दुष्काळ पडला असून नागरिक  हवालदिल झाले आहेत. हाताला काम नाही, प्यायला पाणी नाही तर जनावरांना चारा नाही अशी अवस्था येथे निर्माण झाली आहे. शासनाने  दुष्काळग्रस्तांना तातडीने मदत करावी अशी मागणी माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन पाठवून केली आहे.

        जत तालुका भौगोलिक विस्ताराने मोठा व कायम दुष्काळी  आहे. दर तीन ते पाच वर्षांनी  दुष्काळी परिस्थिती येथे निर्माण होत आहे. सन २००३, २००४, २००८, २०१२  व २०१३ पेक्षाही मोठा दुष्काळ यावर्षी आहे. ८९ गावे व त्याखालील ७५० वाड्या -  वस्त्यांवर १०८ टँकरव्दारे  पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे.   बिरनाळ व अंकलगी साठवण तलावातून टँकर पाणी भरुन घेत आहेत या पाण्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही आथवा त्यामध्ये  टिसीएल वापरले जात नाही.त्यामुळे नागरिकांना अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे. हे पाणी पिण्यासाठी योग्य नाही. कांही टँकर गळके व  नादुरुस्त होत आहेत त्यामुळे लोकसंख्याच्या प्रमाणात पाणी पुरवठा होत नाही अशी तक्रार प्रकाश जमदाडे यानी या निवेदनात केली आहे.
            जत तालुक्यात लहान मोठी मिळून सुमारे  तीन लाख जनावरे आहेत. शासनाकडून जनावरांच्या पाण्याची सोय करण्यात आलेली नाही.त्यामुळे पशुधन मालकासमोर  पाणी व चाऱ्यांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कवडीमोल किंमतीने जनावरे विकण्याची वेळ  नागरिकावर आली आहे . सन २०१२-१३ व २०१३-१४ या आर्थिक वर्षात छावणी चालकांनी चारा छावण्या बिकट परिस्थितीत चालवल्या परंतु छावणी चालकांवर प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे आता तालुक्यात कोणीही छावण्या सुरू करण्यासाठी  पुढे येण्यास तयार नाही. छावणीसाठी प्रशासनाकडून घालण्यात आलेल्या अटी जाचक आहेत. तालुक्यात एकही चारा छावणी सुरू नाही ही प्रशासनाची चूक आहे असा आरोप करुन प्रकाश जमदाडे यानी शासनाला घरचा आहेर दिला आहे. 
      माणसी ४० लिटर प्रमाणे पाणी द्यावे याशिवाय  जनावरांसाठी वेगळे  पाणी द्यावे, प्रशासनाने चारा छावणी किंवा डेपो सुरू करावेत, टंचाई निधीतून जत तालुक्यातील साठवण तलाव भरावेत, म्हैसाळ योजनेचे अपूर्ण काम पूर्ण करावे, शेतकऱ्यांचे कर्ज व वीज बिल माफ करावे,  रोहयो कामे गावोगावी सुरू करावीत, पावसाची अनियमितता पाहता पावसाळ्यात कर्नाटकात वाहून जाणारे पाणी अडवून  येथील तलाव भरावेत पूर्व भागातील  वंचित गावाकरिता विस्तारित म्हैसाळ योजनेचे काम मार्गी लावण्यात यावे इत्यादी  मागण्या प्रकाश  जमदाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना पाठविलेल्या निवेदनात केल्या आहेत.

No comments:

Post a Comment