Friday, May 17, 2019

मंजूर खेपेनुसार टँकरचे पाणी नाहीच


  जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात 92 गावांना आणि 671 वाड्यावस्त्यांना 109 टँकरच्या खेपेद्वारा 255 खेपा मंजूर आहेत.मात्र प्रत्यक्षात 223 खेपाच होत असून त्यामुळे पाणी टंचाई कायम असून वादावादीचे प्रकार घडत आहेत. जत तालुक्यात पाण्याचे स्त्रोत नसल्याने टँकरद्वारा अपुरा पाणी पुरवठा होत आहे. जत तालुक्यातील तलाव म्हैसाळ योजनेच्या पाण्याने भरून घेण्याची मागणी होत आहे.

  मागील वर्षी टँकरमुक्त जिल्हा म्हणून सांगली जिल्हा जाहीर करण्यात आला होता. मात्र यावर्षी या टँकरमुक्त जिल्ह्याला भीषण पाणी टंचाईमुळे ग्रहण लागले आहे. सांगली जिल्ह्यात  टँकरची संख्या 200 घरात पोहोचली असून रोज 507 खेपा मंजूर आहेत. टँकरवर अवलंबून असणारी लोकसंख्या चार लाखांच्या घरात गेली आहे. सगळ्यात जास्त टँकरच्या पाण्यावर अवलंबून असलेली लोकसंख्या जत तालुक्यात आहे. सध्या जिल्ह्यात रोज मंजुरीपेक्षाही 46 खेपा कमी पाणी दिले जात आहे. मुळात टँकर मंजुरीस टाळाटाळ करणे, विलंब करण्याचा प्रकार सुरू असताना मंजूर खेपाही पूर्णपणे देण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याने संताप व्यक्त होत आहे. टँकर सुरू असलेल्या गावागावांमध्ये वादावादी, भांडणाचे प्रकार घडत आहेत. मात्र याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहेत.  दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढतच आहे. मान्सूनपूर्व पावसाचा पत्ता नाही. जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, मिरज पूर्वभागात पाणी गायब झाले आहे. अनेक बोअर आटल्या आहेत. सिंचन योजनांच्या माध्यमातून भरलेली तळेही तळ गाठत आहेत. जत तालुक्यातली तळी मात्र म्हैसाळच्या पाण्याने भरण्यात आली नाहीत. त्यामुळे लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
टँकरला ड्रायव्हर उपलब्ध नसणे, वीज नसणे अशी कारणे देऊन अनेक गावांना पाण्याचा पुरवठाच केला जात नाही.तर काही गावांना खेपांपेक्षा कमी खेपा केल्या जात आहे.  जिल्हा प्रशासनाने 13 मे रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 188 टँकर सुरू होते. त्यानंतर गेल्या चार दिवसांमध्ये त्यामध्ये आणखी भर पडली आहे. हा आकडा आता दोनशेच्या घरात गेला आहे. जतला 92 गावे 671 वाड्यांवरील सव्वादोन लाख लोकांसाठी 109 टँकरच्या255 खेपा मंजूर आहेत. मात्र प्रत्यक्षात 223 खेपाच मिळत आहेत. अर्थात ही सरकारी आकडेवारी आहे,प्रत्यक्षात याहीपेक्षा अधिक अधिक गावांना हव्या त्या पाण्याच्या खेपा केल्या जात नाहीत.

No comments:

Post a Comment