Sunday, May 26, 2019

बच्चे कंपनीला मोबाईलचे वेड; पालकांमध्ये चिंता

जत,(प्रतिनिधी)-
मोबाईलमुळे जगात क्रांती झाली हे खरे आहे. तस बघितलं तर मोबाईल वरदानच ठरावा. कुठेही, कधीही आपल्याला आपल्या माणसांना, मित्रपरिवार, आणीबाणीच्या वेळी, महत्त्वाच्या कामासाठी मोबाईलमुळे संपर्क साधता येतो. परंतु, शाळा, महाविद्यालयांना सुट्टय़ा लागल्याने जत शहरासह तालुक्यातील बच्चेकंपनी या मोबाईलमध्ये खेळणी म्हणून गुंतल्याने ही बाब पालकांच्या चिंतेत भर घालणारी ठरू पाहते आहे.

मोबाईलच्या वापरामुळे नागरिकांचा प्रत्यक्ष संबंध कमी येतो. आताच्या सोशल मीडियाच्या जगात कुणी, कुणाला शुभेच्छा देण्यासाठी घराबाहेर निघत नाही. मानसिक भावनांच्या अभावामुळे नाती दुरावली जात आहे. याचा आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. दृष्टी कमी होत आहे. मोबाइलच्या प्रयत्नात अनेक क्षणांना मुकत आहो, याच भान आज तरुणाई विसरते आहे. सध्य:स्थितीत अगदी बालवयातच मोबाइलची सवय जडली. तरुण पिढीवर तर त्याचे अतिदुष्परिणाम होताना दिसून येत आहे. त्यामुळे मोबाइल जर दुसर्‍या बाजूने बघितला. एकप्रकारे आजच्या पिढीला शाप ठरला. मोबाइल वापरामुळे फायद्यापेक्षा नुकसान जास्त असल्याचे निदर्शनात येत आहे. नागपुरातील वेणा जलाशयात नौका विहार करायला गेलेल्या आठ जणांचा फेसबुक लाइव्हच्या प्रयत्नात नौका उलटून जलसमाधी मिळाली होती. वाहन चालविताना मोबाईल वापरल्याने अपघात झाल्याच्या घटना नेहमीच ऐकायला मिळतात.
वाहतूक विभागाकडून वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नये म्हणून नेहमीच सल्ले दिले जातात, त्याचे गांभीर्य कुणीच समजून घ्यायला तयार नाही. अशा प्रकारामुळे झालेल्या अपघातात अनेकांना आपल्या जिवाला मुकावे लागले. मोबाइलच्या अतिवापरामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. मानदुखी, डोकेदुखी, पाठदुखी, अनिद्रा, नैराश्य, स्मरणशक्ती कमी होण्यासारख्या आजारात वाढ झाली आहे. मोबाईलचा सामान्यांच्या जिवनातील रोजचा वापर जसजसा वाढत आहे, तसतसा मोबाईल कंपन्यांकडून विविध सुविधा सवलती देणे सुरू झाले. मोबाईल कंपन्यांकडून देण्यात आलेल्या प्रलोभनाकडे सर्वसामान्य अडकत असल्याची वस्तुस्थिती आहे.

No comments:

Post a Comment