Tuesday, May 7, 2019

आवडीनुसार करिअर क्षेत्र निवडा: नगराळे

जत,(प्रतिनिधी)-
युवकांनी आपले ध्येय निश्चित करताना आपल्या आवडीनुसार करिअरची निवड करावी, असा सल्ला करिअर मार्गदर्शक जयंत नगराळे यांनी जत येथील एका कार्यक्रमात बोलताना युवकांना दिला.

'युथ फॉर जत' या सामाजिक संस्थेतर्फे आयोजित ‘यशस्वी करियरची गुरुकिल्ली’ हा कार्यक्रम जत येथील बचत भवन येथे पार पडला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना योग्य मार्गाची निवड करता यावी यासाठी या कार्यक्रमाचे प्रयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून जयंत नगराळे हे लाभले. त्यांनी आपल्या २ तासाच्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या करियर संदर्भात मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या दिलखुलास शैली मध्ये मराठी तसेच इंग्लिश मध्ये मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना खुर्चीला खिळवून ठेवले. आपल्या मार्गदर्शन भाषणामध्ये त्यांनी आई वडिलांचा सन्मान करावा तसेच विविध पुस्तकांचे सखोल अध्ययन करावे आणि त्यामुळे आपल्या जीवनात नक्की यश मिळेल अशी ग्वाही दिली. शेवटी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांच्या मनातील संभ्रम दूर केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. भरत हेसी होते. हा कार्यक्रम 'युथ फॉर जत' चे देश-परदेशातील वरिष्ठ सदस्य अजय पवार, वैभव पुरोहित, सैपून शेख, डॉ. सुनील जोशी, डॉ. गजानन रेपाळ यांच्या संकल्पानेतुन आणि मार्गदर्शनाखाली पार पडला.
यावेळी 'युथ फॉर जत' चे अध्यक्ष दिनेश शिंदे, सचिव अमित बामणे, व सतीश तंगडी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूपेंद्र कांबळे यांनी केले. डॉ. विद्या नाईक,अमर जाधव, शैलेश यमगर, सागर चांपन्नावर व सौ. अनुराधा गोंधळी आदी उपस्थित होते. प्रमोद  साळुंखे, सचिन जाधव यांनी कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मोलाचा हातभार लावला.

No comments:

Post a Comment