Wednesday, May 29, 2019

जत शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध विक्रम सावंत,सुरेश शिंदे यांची ग्वाही


जत,(प्रतिनिधी)-
जत शहराचा विकास हेच आमचे ध्येय असून शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही जिल्हा बँकेचे संचालक,काँग्रेसचे नेते विक्रम सावंत आणि राष्ट्रवादी चे नेते सुरेश शिंदे यांनी दिली.

जत नगरपरिषदेच्यावतीने नागरोत्थान योजनेंतर्गत शहरातील भोसले घर ते ईदगाह मैदानापर्यंत 57लाख खर्चून डांबरीकरण व खडीकरण तसेच गांधी चौक ते शिवाजी पुतळा चौक दरम्यानच्या विकास कामांचे उद्घाटन नुकतेच श्री. सावंत आणि श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.जत नगरपरिषदेत सत्ता स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच हे दोन्ही नेते एकत्र आले होते. जत शहरातून लोकसभेला भाजपच्या उमेदवाराला मताधिक्य गेल्याने हे दोन्ही नेते विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी एकत्र आल्याने शहरात हा चर्चेचा विषय होता.
यावेळी नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर,उपनगराध्यक्ष आप्पासाहेब पवार , काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब बिराजदार, मार्केट कमिटीचे संचालक संतोष पाटील, माजी सभापती बाबासाहेब कोडग, काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना शिंदे, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक इकबाल ऊर्फ पटटू गवंडी, माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत शिंदे, नगरसेवक भूपेंद्र कांबळे, निलेश बामणे, स्वप्निल शिंदे, ममता तेली, प्रवीण जाधव, रशीद पटाईत, आर.एम. सय्यद, बाजी केंगार,रवी मानवर, बंडू शेख, माणिक बिज्जरगी आदी उपस्थित होते.
उद्घाटन झाल्यावर बोलताना विक्रम सावंत आणि सुरेश शिंदे यांनी शहराच्या विकासावर प्राधान्याने भर दिला जाणार असून नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठका आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले. ठेकेदारांनी व्यवस्थित कामे करावीत,असे आवाहनही करण्यात आले.
यावेळी बोलताना नागराध्याक्षा शुभांगी बन्नेनवर, उपनगराध्यक्ष आप्पासाहेब पवार यांनी शहरात विकास कामे होत आहेत,पण विरोधक खोडा घालण्याचे काम करत आहेत. नाना शिंदे आणि भूपेंद्र कांबळे यांनी लवकरच 'नगरसेवक आपल्या दारी' हा उपक्रम राबवत नागरिकांच्या समस्या जाणून घेणार असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment