Thursday, May 23, 2019

माडग्याळचा रस्त्यावरचा आठवडी बाजार पोलिसांनी हटवला

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील माडग्याळ येथील जत-चडचण या आंतरराज्य मार्गावर  भरवला जात असलेला आठवडी भाजीपाला बाजार उमदी पोलीस ठाण्याच्या पुढाकाराने अन्यत्र भरवण्यात आल्याने वाहन चालकांची वाहतूक कोंडीपासून सुटका झाली आहे. याबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

माडग्याळ येथे दर शुक्रवारी भाजीपाला आणि जनावरांचा बाजार भरतो. भाजीपाला आठवडी बाजार जत-चडचण  या आंतरराज्य मार्गावर भरत होता. यामुळे या दिवशी सतत वाहतूक कोंडी होत होती. याचा हकनाक त्रास वाहन चालकांना होत होता. मागच्या आठवडी बाजारादिवशी सुमारे दोन तास वाहतूक कोंडी झाली होती. याबाबत जत न्यूज पोर्टलवर आवाज उठवण्यात आला होता.त्यामुळे याची दखल घेऊन उमदी पोलिसांनी ग्रामपंचायतीच्या मदतीने रस्त्यावर भरणारा बाजार तिथून हटवला व हा बाजार अंकलगी  रस्त्याकडेला असलेल्या जुन्या जनावरांच्या बाजारात भरवला. त्यामुळे जत-उमदी मार्ग पूर्ण मोकळा झाला आणि वाहतूक सुरळीत सुरू झाली. काल (दिनांक 24 रोजी) वाहतूक सुरळीत झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
 उमदी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक श्री. कोळेकर यांनी सांगितले की, शुक्रवार हा बाजार दिवस असल्याने व बाजारातील विक्रेते जत - उमदी रस्त्याचे दुतर्फा बसून सामानाची विक्री करत असल्याने वाहतुकीची कोंडी होत होती. त्यानुषंगाने उपविभागीय पोलिस अधिकारी जत यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे नियमित भरणारा बाजार हा नवीन बाजार तळ याठिकाणी हलवला. तसेच  उमदी ते जत या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होणार नाही अशा पद्धतीने वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. याकामी माडग्याळ गावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांची मदत घेतली आहे. बाजारामध्ये योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यापुढे माडग्याळ येथील शुक्रवारी होणारा आठवडा बाजार हा नवीन बाजार तळ याठिकाणी होणार असलेबाबत  उमदी पोलीस ठाणे , ग्रामपंचायत माडग्याळ यांच्यावतीने बाजारातील विक्रेते यांना सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच यापुढे नवीन बाजारपेठ येथे बाजार भरण्यात यावा याबाबत आवाहन केले.

No comments:

Post a Comment