Saturday, May 11, 2019

महाराष्ट्रातील ५ हजार गावे ‘नॉट रिचेबल

जत,(प्रतिनिधी)-
महाराष्ट्रातील 5 हजारांवर गावांमध्ये अद्याप मोबाईल सेवा पोहोचली नसल्याची धक्कादायक माहिती दूरसंचार विभागानेच केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. कोकणातील दुर्गम भाग आणि नक्षलग्रस्त भागातील गावांचा यामध्ये समावेश आहे.

केंद्र सरकारकडून डीबीटी अर्थात डायरेक्ट  बेनिफिट ट्रान्स्फर योजनेला प्रोत्साहन दिले जात आहे. याचा विस्तार करण्याच्या उद्देशाने दूरसंचार विभागाने एक सर्वेक्षण केले आहे. मोबाईल सेवा देणार्‍या कंपन्यांकडून मिळालेली माहिती आणि दूरसंचारच्या दहा अधिकार्‍यांमार्फत सर्वेक्षण करण्यात आले. महाराष्ट्रातील 43 हजार 665 गावांच्या ‘नेटवर्क’ची नोंद यामध्ये घेण्यात आली. त्यापैकी 88 टक्के म्हणजे 38 हजार 536 गावांमध्येच मोबाईल सेवा पोहोचली असल्याची नोंद झाली. कोकण तसेच नक्षलग्रस्त भागातील मिळून 5 हजार 129 गावांत अद्याप टॉवर उभारले नसल्याने हजारो नागरिक अद्याप मोबाईल सेवेपासून दूर आहेत, तसा अहवाल येथील विभागाने दूरसंचार मंत्रालयाला पाठविला आहे.   
नक्षलग्रस्त भागात दूरसंचारचे टॉवर
नक्षलग्रस्त भागात खासगी कंपन्यांकडून उभारलेले टॉवर नक्षलवाद्यांकडून उद्ध्वस्त केले जात असल्यामुळे येथील अनेक गावांमध्ये अद्याप मोबाईल सेवा पोहोचलेली नाही. आता केंद्र सरकारच्या दूरसंचार मंत्रालयानेच या ठिकाणी टॉवर उभारण्याचे काम हाती घेतले आहे. तेथील 103 गावांमध्ये सध्या नागपूर विभागाकडून टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. नक्षलवाद्यांकडून या कामातही अडथळे येत असल्याने पोलिस बंदोबस्तात काम सुरू असून, उभारणी झाल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेबाबतही उपयायोजना करण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले.
गोव्यामध्येही 33 गावांत सेवा नाही
महाराष्ट्राप्रमाणेच गोव्यातील 33 गावांतही अद्याप मोबाईल सेवा पोहोचलेली नाही. त्या ठिकाणची कमी लोकसंख्या असलेली गावे आणि दाट जंगलामध्ये राहणार्‍या छोट्या गावांमध्ये सेवा पोहोचविण्यात अडथळे येत असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.
सरकारी सुविधांपासून वंचित!
मोबाईल सेवाच पोहोचली नसल्याने संपर्कसेवेबरोबर यावर आधारित इतर योजनाही या लोकांपर्यंत पोहोचत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. डायरेक्ट  बेनिफिट ट्रान्स्फरसारख्या सेवांपासून हे नागरिक वंचित आहेत. याबाबतचा अहवाल केंद्राकडे गेल्याने धोरण निश्‍चित होईल, अशी अपेक्षा आहे.
 मोबाईल सेवेची सद्य:स्थिती (दूरसंचारमधील नोंद)     
                            महाराष्ट्र        गोवा     
गावे                  43 हजार 665     334     
टूजी                  35 हजार 884     298     
थ्रीजी                 19 हजार 512     245     
फोरजी               33 हजार 264     268     
सुविधाच नाही      5 हजार 129        33 

No comments:

Post a Comment