Sunday, May 12, 2019

शिक्षकांचे पद कार्यात्मक घेऊन श्रेणीवाढ द्या


 जुनी हक्क पेन्शन संघटनेची मागणी; वित्त मंत्री व शिक्षण मंत्र्यांची घेणार भेट
जत,(प्रतिनिधी)-
ज्या शिक्षकांना 1 जानेवारी 2016 नंतर वरिष्ठ वेतन श्रेणी प्राप्त झाली आहे, अशा शिक्षकांच्या वेतनामध्ये सातव्या वेतन आयोगामध्ये होणारी वाढ ही इतरांच्या तुलनेने कमी होत असून ही तफावत दूर करण्यासाठी शिक्षकाचे पद कार्यात्मकमध्ये घेऊन श्रेणी वाढ होताना एक वेतनवाढ द्यावी यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनचे शिष्टमंडळ राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली वित्तमंत्री व शिक्षण मंत्री यांची भेट घेणार आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी दिली.

सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर राज्यभरात शिक्षकांच्या वेतन निश्चितीचे काम सुरू आहे. काही जिल्ह्यात सातव्या वेतन आयोगानुसार शिक्षकांचे पगार ही झाले आहेत. परंतु विकल्प निवडीबाबत व वेतन निश्चिती बाबत वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या पद्धतीने कार्यवाही होत असल्याचे निदर्शनास येत आहे.1 जानेवारी 2016 नंतर वरिष्ठ वेतन श्रेणी प्राप्त झालेल्या शिक्षकांनी त्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी प्राप्त झाल्यानंतरचा विकल्प दिला तर वेतन निश्चिती होत असताना त्याच्या 1 जानेवारी 2016 रोजीच्या वेतनावर वेतन निश्चिती होणार की त्याने ज्या दिनांकाचा विकल्प दिला आहे, त्या रोजीच्या वेतनावर वेतन निश्चिती होणार याबाबत वेगवेगळ्या जिल्ह्यात एकवाक्यता दिसत नाही. राज्याच्या अतिरिक्त मुख्य वित्त सचिव यांच्याकडे दिलेल्या निवेदनातील मुद्द्याबाबत योग्य धारणा पक्की करण्याबाबत पत्र पाठवले असून या बाबतीत लवकरात लवकर मार्गदर्शन आल्यास राज्यभरात शिक्षकांच्या वेतन निश्चितीबाबत एकवाक्यता येण्यास मदत होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनचे जिल्हा कोषाध्यक्ष राजकुमार भोसले यांनी सांगितले.
एक वेतनवाढ देणे गरजेचे 1 जानेवारी 2016 नंतर वरिष्ठ वेतन श्रेणी प्राप्त झालेल्या शिक्षकांच्या वेतनामध्ये सातव्या वेतन आयोगा मध्ये होणारी वाढ ही 1 जानेवारी 2016 पूर्वी वरिष्ठ वेतन श्रेणी प्राप्त झालेल्या शिक्षकांच्या वेतनात होणार्या वाढीच्या तुलनेत कमी होते.पूर्वी वरिष्ठ वेतन श्रेणी मिळाल्यानंतर सहाव्या वेतन आयोगात श्रेणी वाढ होताना 1400 रुपयांची वाढ होत पण सातव्या वेतन आयोगात केवळ 700 रूपयांची वाढ होत आहे. 1 जानेवारी 2016 ते 30 जानेवारी 2019 दरम्यान वरिष्ठ वेतन श्रेणी मिळालेल्या शिक्षकांना लाभ मिळेल पण 30 जानेवारी 2019 नंतर वरिष्ठ श्रेणी मिळणार्या शिक्षकांचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शिक्षकाचे पद कार्यात्मक मध्ये घेऊन श्रेणी वाढ होताना एक वेतनवाढ शिक्षकांना ही द्यावी, ही पेन्शन हक्क संघटनेची आग्रही मागणी आहे. यावेळी नेताजी भोसले,राहुल कोळी, रमेश मगदूम, विरेश हिरेमठ, सागर खाडे, स्वप्निल मंडले, गुरुबसू वाघोली, महादेव जंगम, मिलन नागणे, अनिल मोहिते, आकाश जाधव, श्याम राठोड उपस्थित होते.

No comments:

Post a Comment