Saturday, May 11, 2019

टँकरच्या तीन खेपा,मग पाणी जाते कुठे?

ग्रामस्थांमध्ये संताप; ग्रामपंचायतीसमोर आंदोलन
जत,(प्रतिनिधी)-
दरिकोणूर ( ता.जत) येथील गावकऱयांचे पिण्याच्या पाण्याअभावी हाल होत असून वैतागून ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोर आज घागर मोर्चा काढून आंदोलन केले. गावाला पाण्याच्या टँकरने तीन खेपा केल्या जातात,असे सांगितले जाते तर मग पाणी कुठे जाते, असा सवाल संतप्त ग्रामस्थ करत आहेत.पाण्याच्या टँकरची चौकशी करावी,अशी मागणी ग्रामस्थाकडून होत आहे.

गावाला एका पाण्याच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असला तरी तो पुरेसा नाही. पाण्याच्या तीन खेपा केल्या जात असल्याचे तरी प्रत्यक्षात तीन खेपा कधीच होता नाहीत. कधी वीज नसल्याचे सांगितले जाते,तर कधी गाडीचा चालक जाग्यावर नसल्याचे सांगितले जाते. गावाची तहान भरेल,इतके पाणी त्यात असत नाही. शिवाय कधी कधी टँकरच गायब असतो,त्यामुळे लोकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. संपूर्ण दिवस लोकांना फक्त पाण्यासाठी घालवावा लागतो.
गावाची लोकसंख्या सुमारे दोन हजार आहे. गावाला पाणी पुरवठा करणारी पाणी योजना पाण्याअभावी बंद आहे.त्यामुळे लोकांना परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरीतून किंवा बोअरवेल मधून आणावे लागते. लोकांना पाण्यासाठी दिवसभर वेळ घालवावा लागत आहे.  गावाला तीन खेपा टँकरच्या पाण्याच्या केल्या जात असल्याचे सांगितले जाते शिवाय विक्रम सावंत यांचाही टँकर येत असल्याचे सांगितले जाते,मग प्रत्यक्षात लोकांना पाणी का मिळत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. प्रशासनाने याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. प्रशासनाने गावाला पुरेसे किंवा प्रत्येक माणशी 40 लिटर पाण्याचा पुरवठा टॅंकरद्वारा करावा, अशी मागणी करत आहेत.

No comments:

Post a Comment