Sunday, June 2, 2019

लॉटरी लागल्याचे सांगून 31 लाखाला गंडविले

जत,(प्रतिनिधी)-
तुम्हाला सॅमसंग गॅलेक्सी नॅशनल लॉटरीमध्ये दोन कोटी 65 लाखांची लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून जत तालुक्यातील उमराणी येथील श्री साई कृषी सेवा केंद्राचे मालक अनिल ईश्वर वाली ( वय 40) यांना जॅन स्टीफन या व्यक्तीने 31 लाख 30 हजाराला गंडविल्याचे उघड झाले आहे. लॉटरीतील अडीच कोटी मिळवण्याच्या अमिषापोटी अनिल वाली यांनी स्वतः च्या खात्यावरील 31 लाख 30 हजार गमावले आहेत. आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच त्यांनी काल पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, उमराणी येथील अनिल वाली यांचे श्री साई कृषी सेवा केंद्र आहे. ते राहायलाही उमराणीतच आहेत. चार डिसेंबर 2017 रोजी त्यांच्या मोबाईलवर दुपारी दोन वाजता एक मेसेज आला. त्यात तुम्हाला सॅमसंग गॅलेक्सी नॅशनल लॉटरीमध्ये 2 कोटी 65 लाखांची लॉटरी लागल्याचे नमूद केले होते. त्याच मेसेजमध्ये त्यांनी तुमच्या आकाऊंटची डिटेल माहिती देण्यास सांगितले होते.  अडीच कोटींची लॉटरी लागल्याचा आनंद झालेल्या अनिल वाली यांनी तात्काळ आपल्या बँकेची सर्व माहिती अगदी खातेनंबरसह त्यांना मेल करून पाठवली. दुसऱ्या दिवशी अनिल वाली यांना फोन आला. मी जॅन स्टीफन बोलतोय. तुमच्या बँकेची माहिती आम्हाला मिळाली आहे. दिलेल्या अकाउंट वर 20 हजार भरा,तुम्हाला पैसे मिळण्याचे लिंक पेज देतो असे त्याने सांगितले. त्यानुसार वाली यांनी 20 हजार भरले. त्यानंतर वालींच्या मोबाईलवर लिंक कोड आला. तो कोड उघडण्यासाठी दीड लाख रुपये भरायला सांगण्यात आले आणि त्यानंतर आपल्या बँक खात्यावर पैसे जमा होतील, असे स्पष्ट करण्यात आले. वाली यांना पैसे तात्काळ मिळतील असे वाटल्याने त्यांनी दिलेल्या खात्यावर पैसे भरले. त्यानंतर त्या संबंधित इसमाचा वाली यांना फोन आला. तुमच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचे खात्री करा, असे सांगितले. वाली यांनी बँकेत जाऊन पैसे जमा झाल्याबाबत खात्री केली,पण पैसे जमा झाले नव्हते.
पुन्हा वाली यांनी स्टीफन यांना पैसे जमा झाले नसल्याचे सांगितले. त्यावर तुमचे खाते सेव्हिंग खाते असल्याने पैसे जमा होण्यास अडचण येत आहे.तुम्ही आणखी तीन लाख भरा म्हणजे तुम्हाला मास्तर कार्ड पाठवून देतो,असे सांगण्यात आले. वाली यांनी पैशाच्या लालसेपोटी आणखी तीन लाख भरले. हा प्रकार असाच आतापर्यंत सुरू राहिला. अशा प्रकारे वाली यांनी वेळोवेळी रकमा भरल्या. असे एकूण 31 लाख 30 हजार रुपये त्यांच्याकडे जमा केले. अडीच कोटी लॉटरीतील एक छदामही मिळाले नाही,उलट वाली यांचेच वेळोवेळी 31 लाख रुपये गेले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच काल रात्री वाली यांनी जत पोलिसांत फिर्याद दाखल केली.

No comments:

Post a Comment