Friday, June 7, 2019

जतच्या पूर्व भागातील 42 गावांच्या पाणी प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष: श्रीकृष्ण पाटील

जत,(प्रतिनिधी)-
दुष्काळी जत तालुक्यातील पूर्व भागातील 42 गावातील शेतीसाठी व पिण्यासाठी म्हैशाळ योजनेतून पाणी मिळावे यासाठी उमदी पासुन सांगली पर्यंत पदयात्रा काढली होती. परंतु राज्यात व केंद्रात भाजपचेच सरकार असताना व तालुक्याचे विधानसभा सदस्य हेही भाजपचेच व जिल्ह्याचे खासदार  आणि  राज्य कृष्णाे खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष हेही भाजपचेच  असे असताना जत तालुक्यातील पूर्व भागातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याकडे दुर्लक्षच झाले आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण पाटील यांनी केला आहे.

गेली चाळीस वर्षे सत्ताधारी मंडळींनी जत तालुक्याला झुलवत ठेवले आहे आणि आताही तोच प्रकार सुरू आहे. राजकीय पक्ष आणि राजकारण्यांनी फक्त सत्तेसाठी जत तालुक्याचा उपयोग केला, असा आरोप त्यांनी केला. आता यासाठी जनातेतूनच आवाज उठवला जात आहे. निदान आता तरी सरकारने जागे व्हावे, अशी अपेक्षा आहे.  म्हैशाळ योजननेचे पाणी आतापर्यंत का उपलब्ध झाले नाही. आपल्या हक्काच्या शेतीच्या, पिण्याच्या पाण्यासाठी पूर्व भागातील 42 गावातील लोकांना उमदी पासुन सांगली पर्यंत पदयात्रा काढून खडतर प्रवास करित जावे लागणे म्हणजे तालुक्यातील, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांचे  नेतृत्वगुण कमी पडत आहे.
तालुक्यातील शेतीसाठी व पिण्यासाठी म्हैशाळ योजनेतून पाणी मिळावे यासाठी तालुक्यातील आमदारांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणला पाहिजे. यासाठी तालुक्यातील जनतेला व सर्व पक्षीयांना सोबत घेऊन  जनआंदोलन उभे केले तरच तालुक्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. तालुक्यातील जनतेने शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी कितीही आंदोलने केली तरी याची दखल शासन दरबारी घेतली जात नाही, हे उमदी पासुन सांगली पर्यंत पदयात्रा काढलेल्या नेतृत्वांच्या लक्षात आले आहे. तरीही जत तालुक्यातील पूर्व भागातील शेतीसाठी म्हैशाळ योजननेचे पाणी मिळावे यासाठी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती  तुकाराम महाराज यानी  गोंधळेवाडी ते मुंबई मंत्रालय पदयात्रा दिंडी  सुरू केली आहे. या पदयात्रा दिंडीमध्ये शेकडो स्त्री-पुरूष सहभागी झाले आहेत. पूर्व भागातील पाण्यावरून भाजप मध्येसुद्धा दोन गट तयार झाले आहेत,तरी पाणी प्रश्न सुटत नाही. त्यामुळे आता तालुक्यातल्या लोकांनाच रस्त्यावर उतरावे लागत आहे,हे लोकप्रतिनिधीसाठी लाजीरावाणा प्रकार आहे.

No comments:

Post a Comment