Sunday, June 2, 2019

जत तालुक्यातील 73 गावांमध्ये खासदार पाटील यांना आघाडी

काँग्रेसला आत्मचिंतनाची गरज;वंचित आघाडीची दमदार सुरुवात
जत,(प्रतिनिधी)-
जत विधानसभा मतदार संघातील १२३ पैकी ७३  गावात खासदार संजयकाका पाटील यांना आघाडी मिळाली आहे तर ४५  गावात बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना सर्वाधिक मते  मिळाली आहेत.  पाच गावात आघाडीचे उमेदवार विशाल पाटील आघाडी मिळाली आहे. या लोकसभा निवडणूक निकालाचे आगामी विधानसभा निवडणुकीवर दुरगामी परिणाम होणार असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षातील इच्छुक उमेदवारांनी आत्मपरीक्षण करण्यास सुरुवात केली आहे.     
 
       सन २०१४  मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार संजय पाटील यांना सुमारे ४६ हजार इतके मताधिक्य जत विधानसभा मतदार संघातून मिळाले होते .परंतु या नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत फक्त २४ हजार इतके अत्यल्प मताधिक्य मिळाले आहे त्यामुळे भाजपचे मताधिक्य वाढले का कमी झाले याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ स्थानिक नेत्यांवर आली आहे. खासदार संजयका पाटील यांनी मागील पाच वर्षात  म्हैसाळ उपसा जलसिंचन योजना , राज्य मार्ग व इतर विकास कामाच्या माध्यमातून जत विधानसभा मतदारसंघात विकास कामाचा डोंगर उभा केला आहे भाजपच्या लाटेवरती ४६  हजार इतके मताधिक्य सन  २०१४ मध्ये खासदार संजय पाटील यांना मिळाले असलेतरी विकास कामाचा डोंगर उभा करून व कार्यकर्त्यांशी थेट संपर्क ठेवूनही सन २०१९ मध्ये  फक्त २४ हजार इतके मताधिक्य त्यांना मिळाली आहे .त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीवर त्याचे राजकीय परिणाम होणार आहेत असे बोलले जात आहे .
        आमदार विलासराव जगताप माजी सभापती प्रकाश जमदाडे भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉक्टर रवींद्र आरळी ,जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण समिती सभापती तमन्नगौडा रवीपाटील , भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुड्डोडगी , जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील , पंचायत समिती सभापती सुशीला तावशी आदी जणांनी   खासदार संजय पाटील यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती .निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी पासून आमदार विलासराव जगताप व प्रकाश जमदाडे यांनी प्रचारदौरा व  प्रचाराचे नीट नेटके नियोजन करून प्रचार यंत्रणा राबवली असल्यामुळे  खासदार संजय पाटील यांना जत विधानसभा मतदारसंघातून आघाडी मिळाली आहे . खासदार संजय पाटील यांना भाजप , शिवसेना व मित्रपक्ष वगळता इतर पक्षात असलेले  कार्यकर्ते , नागरिक व नेतेमंडळींनी अंतर्गत मदत केली असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. त्यामुळे त्यांना जत विधानसभा मतदारसंघातून आघाडी घेता आली आहे असे येथे बोलले जात आहे.
       आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांची उमेदवारी जाहीर होण्यास विलंब झाला व प्रचार करण्यासाठी त्यांना कमी अवधी मिळाला असल्यामुळे  मतदारात संभ्रमावस्था निर्माण झाली होती .तरीही पहिल्या टप्प्यात त्यांनी जत विधानसभा मतदारसंघातील प्रचारात  आघाडी घेतली होती .आघाडीतील नेतृत्वशून्य नेते ,तालुका पातळीवरील नेत्यांमध्ये असलेले गटतट , अंतर्गत धुसफूस व मतभेद याचा फटका त्यांना बसला आहे .नेतेमंडळी व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन एक दिलाने प्रचार यंत्रणा राबवली नाही .जो तो आपल्या सोयीनुसार व आपला गट सांभाळून काम करताना दिसत होता जत तालुका काँग्रेसचे नेते विक्रम सावंत , माजी सभापती सुरेश शिंदे , तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आप्पासाहेब बिराजदार , बाबासाहेब कोडग ,पंचायत समिती सदस्य आप्पा मासाळ ,  तालुका काँग्रेस कमिटी  कार्याध्यक्ष कुंडलीक दुधाळ - पाटील ,  जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील , माजी उपसभापती शिवाजी शिंदे , अँड. बि.ए.धोडमणी  व सुजय शिंदे , रमेश पाटील , उत्तम चव्हाण यांनी त्यांची प्रचार यंत्रणा सांभाळली आहे .
     बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना प्रचार करण्यासाठी कमी वेळ मिळाला आहे .त्यांची प्रचार यंत्रणा माजी आमदार प्रकाश शेंडगे , अशोक बन्नेनवार , सचिन मदने , टिमू उर्फ लक्ष्मण एडके , लक्ष्मण जखगोंड यांनी  सांभाळली आहे . या वरील नेत्याव्यतिरिक्त बाहेरील  नेत्यांची एकही  जाहीर सभा जत विधानसभा मतदारसंघात झाली नाही. तालुक्यातील सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी त्यांची प्रचार यंत्रणा हातात घेऊन त्यांचा एकदिलाने प्रचार केला आहे . तालुक्यातील दोन नंबरची मते घेऊन प्रस्थापित नेत्यांना त्यांनी धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीवर याचे दूरगामी परिणाम होणार आहेत .
      खासदार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , मंत्री सदाभाऊ खोत यांच्या तालुक्यात जाहीर प्रचार सभा झालेल्या आहेत तर आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री हर्षवर्धन पाटील , आमदार विश्वजीत कदम , खासदार राजू शेट्टी ,आमदार जयंत पाटील यांच्या सभा झालेल्या आहेत .
          वाळेखिंडी गावातील माजी उपसभापती शिवाजी शिंदे हे सुरेश शिंदे समर्थक आहेत परंतु त्यांच्या  गावात खासदार संजय पाटील यांना सर्वाधिक मते मिळाली असून दोन नंबरची मध्ये गोपीचंद पडळकर यांना आहेत तर तीन नंबरची मते विशाल पाटील यांना आहेत . येळवी हे माजी सभापती प्रकाश जमदाडे यांचे गांव आहे. या गावात एक नंबरची मते गोपीचंद पडळकर यांना आहेत. दोन नंबरची मध्ये खासदार संजय पाटील यांना  आहेत तीन नंबरची मते विशाल पाटील  यांना मिळाली आहेत. जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण समिती  सभापती तम्मनगौडा रवीपाटील यांच्या जाडरबोबलाद गावात एक नंबरची मते खासदार संजय पाटील यांना मिळाली आहेत . दोन नंबरची मते गोपीचंद पडळकर व तीन नंबरची मते विशाल पाटील यांना मिळाली आहेत.
  तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वात मोठे गाव उमदी आहे. उमदी जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य व काँग्रेसचे नेते विक्रम सावंत यांचा हा बालेकिल्ला आहे या मतदारसंघात  खासदार संजय पाटील यांना  २६५७ इतकी सर्वाधिक मते मिळाली आहेत तर त्याखालोखाल विशाल पाटील यांना १५३९  मते मिळाली आहेत त्यानंतर गोपीचंद पडळकर यांना ७७५  मते मिळाली आहेत .शेगाव ग्रामपंचायत काँग्रेसच्या ताब्यात आहे. परंतु गावात एक नंबरची मते खासदार संजय पाटील यांना मिळाली आहेत तर दोन नंबरची मते  गोपीचंद पडळकर यांना व तीन  नंबरची मते विशाल पाटील यांना मिळाली आहेत.
     बनाळी हे काँग्रेसचे विद्यमान पंचायत समिती सदस्य रवींद्र सावंत यांचे गाव असून या गावात सर्वाधिक मते खासदार संजय पाटील यांना मिळाली असून त्यानंतर विशाल पाटील व तीन नंबरची मते गोपीचंद पडळकर यांना मिळाली आहेत . माजी आमदार उमाजी सनमडीकर यांच्या सनमडी गावातून   एक नंबरची मते गोपीचंद पडळकर याना दोन नंबरची मते खा. संजय पाटील यांना तर तीन एक नंबरची मते विशाल पाटील यांना मिळाली आहेत.पंचायत समितीचे विद्यमान सदस्य विष्णू  चव्हाण ( भाजप ) यांचे गाव माडग्याळ असून या गावात एक नंबरची मध्ये खासदार संजय पाटील यांना  तर दोन नंबरची मते गोपीचंद पडळकर व तीन नंबरची मते विशाल पाटील यांना मिळाली आहेत.
      जत नगरपालिकेवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्तपणे सत्ता असून येथे नगराध्यक्ष कॉग्रेस पक्षाचा आहे तर उपनगराध्यक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा आहे तरीही जत शहरातील ७८३८ इतके सर्वाधिक मतदान खासदार संजय पाटील यांना मिळाले असून त्यानंतर विशाल पाटील यांना ४११२  मते मिळाली आहेत तर तीन नंबरची ३३१३ मते गोपीचंद पडळकर यांना मिळाली आहेत . जत  पूर्व भागातील  सर्वात मोठे गाव संख असून येथे माजी सभापती आर के पाटील ( भाजप ) व जनसुराज्य नेते बसवराज पाटील यांची सत्ता आहे . या गावात  खासदार संजय पाटील यांना २२६२ मते मिळाली असून दोन नंबरची ७८०  मते गोपीचंद पडळकर यांना मिळाली तर तीन नंबरची ४०० मते विशाल पाटील यांना मिळाली आहेत .
       विद्यमान पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण ( काँग्रेस ) यांचे गाव डफळापूर असून या गावात सर्वाधिक मते खासदार संजय पाटील यांना मिळाली आहेत तर दोन नंबरची मते गोपीचंद पडळकर याना  असून तीन नंबरची मते विशाल पाटील यांना मिळाली आहेत .दरीबडची गावात भाजप व काँग्रेस पक्षाची सत्ता असून दरीबडची ग्रामपंचायतीवर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे या गावात एक नंबरची मते खासदार संजय पाटील यांना  दोन नंबरची मते विशाल पाटील यांना तर तीन नंबरची मते गोपीचंद पडळकर यांना मिळाली आहेत. तिकोंडी  पंचायत समिती मतदार संघातून  मनोज जगताप निवडून आले आहेत  तिकोंडी गावातून खा. संजय पाटील यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत तर दोन नंबरची मते विशाल पाटील  यांना व तिन नंबरची मते गोपीचंद पडळकर यांना  मिळाली आहेत.
     जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आप्पासाहेब बिराजदार यांच्या मुचंडी गावातून  सर्वाधिक मते खासदार संजय पाटील यांना , दोन नंबरची मध्ये विशाल पाटील यांना व तिन नंबरची मते गोपीचंद पडळकर यांना मिळाली आहेत. खोजांनवाडी गाव बाजार समिती संचालक रामगोंडा संती यांचे आहे. येथे खा. संजय पाटील यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत तर विशाल पाटील यांना दोन नंबरची व गोपीचंद पडळकर याना तीन नंबरची मते मिळाली आहेत. बिळूर  हे दक्षिण भागातील सर्वात मोठे गाव असून  गावात गोपीचंद पडळकर यांना १०२४ मते मिळाली आहेत तर दोन नंबरची ९२४ मते विशाल पाटील यांना  तीन नंबरची ३१८ मते खासदार संजय पाटील यांना मिळाली आहेत. विद्यमान जि.प.सदस्य मंगल नामद ( भाजप )  यांच्या उमराणी गावात खा.संजय पाटील याना १७६५ , विशाल पाटील याना १११७ तर गोपीचंद पडळकर याना ५५९ मते मिळाली आहेत.
जत विधानसभा मतदारसंघातून लोकसभेसाठी उमेदवारांना झालेले मतदान
खा.संजयकाका पाटील ( भाजप ) - ७८०५०
गोपीचंद पडळकर ( वं.ब.आ. ) -५३०८३
विशाल पाटील (आघाडी ) -३१७६८

No comments:

Post a Comment