Friday, June 7, 2019

राज्यात सहा हजार चारशे टँकर्सद्वारे पाणीपुरवठा - लोणीकर मुंबई,(प्रतिनिधी)-

राज्यात ३ जून २0१९ अखेर एकूण ६ हजार ४४३ टँकर्सद्वारे ५ हजार १२७ गावे आणि १0 हजार ८६७ वाड्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. यात औरंगाबाद विभागातील सर्वाधिक २ हजार ३७४ गावे आणि ८0३ वाड्यांना ३ हजार ३५९ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्याचबरोबर नाशिक विभागात १ हजार ९४ गावे आणि ४ हजार ७९ वाड्यांना १ हजार ४२४ टँकर्स, पुणे विभागात ८७९ गावे आणि ५ हजार १२७ वाड्यांना १ हजार ३५ टँकर्स, अमरावती विभागात ४२१ गावांमध्ये ४४२ टँकर्स, कोकण विभागात ३१६ गावे आणि ८५८ वाड्यांना १३२ टँकर्स आणि नागपूर विभागात ४३ गावांना ५१ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.

यावेळी लोणीकर म्हणाले, २0१८ ची लोकसंख्या व पशुधनाची संख्या विचारात घेऊन टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. टँकर मंजुरीचे अधिकार उपजिल्हाधिकार्‍यांना व चारा छावणी मंजूर करण्याचे अधिकार जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले असून मागणी होताच ताबडतोब टँकर व चारा छावणी मंजूर करण्यात येते. राज्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत दीर्घ व अल्प स्वरुपाच्या विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यानुसार जिल्हा स्तरावर टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात उप जिल्हाधिकार्‍याचा नियंत्रणाखाली टंचाई नियंत्रण व समन्वयासाठी एक स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला आहे. पाणीपुरवठा करण्यासाठी राज्यात ९ हजार ३१४ विहीर/विंधन विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. औरंगाबाद विभागात ५ हजार ८१७,अमरावती विभागात १ हजार ८३७, पुणे विभागात ५२२, नाशिक विभागात ७१९, नागपूर विभागात ४00, कोकण विभागात १९ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. खाजगी विहीर अधिग्रहणाचे दर वाढविण्यात आले आहेत.
पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणासाठी अधिग्रहित केलेल्या विहिरींच्या मोबदल्याचे दर सुधारित करण्यात आले आहेत. त्यानुसार अधिग्रहित पाण्याच्या स्त्रोतामधून टँकर भरण्यासाठी पुरविण्यात येणार्‍या पाण्याकरिता १२ रुपये प्रति हजार लिटर असा ठरविण्यात आला आहे.
विहीर, तलाव उद्भवावरुन टँकर भरण्यासाठी डिझेल जनरेटरच्या भाड्याचा तसेच डिझेलचा खर्च टंचाई निधीतून देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे टंचाई अंतर्गत उपाययोजनांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यास निविदेचा कालावधी कमी करण्यात आला आहे. टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठय़ासाठी अन्य गावाच्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीतून पिण्याच्या पाण्याचे टँकर्स भरले जातात, अशा प्रकरणी वाढीव विद्युत देयक टंचाई निधीमधून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. टँकर्सच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार वाहनाच्या एक मेट्रीक टनाकरिता दुर्गम व अतिदुर्गम भागासाठी प्रतिदिन भाडे ३३८ रुपये प्रति ४.३0 कि.मी. प्रमाणे तसेच सर्वसाधारण भागासाठी प्रतिदिन २७0 रुपये प्रति ३.४0 कि.मी. असे करण्यात आले आहे. तसेच मंत्रालयीन स्तरावरील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील अधिकार्‍यांच्या पथकाकडून टँकरग्रस्त गावांचा आढावा घेण्यात येत आहे. टँकरव्दारे पाणी पुरवठा वितरणातील अनियमितता टाळण्यासाठी व कार्यक्षमरित्या संनियंत्रणाच्या दृष्टीने जी.पी.एस. प्रणाली बाबतच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या स्तरावर देण्यात आल्या आहेत. टँकरव्दारे पाणी पुरवठा करताना संबंधित गावे-वाड्या-नागरी क्षेत्रातील कायमस्वरुपी अस्तित्वात असलेल्या सध्याच्या लोकसंख्येनुसार दरडोई दरदिवशी ग्रामीण भागासाठी २0 लिटर तसेच मोठय़ा जनावरांसाठी ३५ लिटर व लहान जनावरांसाठी १0 लिटर व शेळ्या मेंढय़ांसाठी ३ लिटर पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment