Friday, June 7, 2019

शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू करण्यासाठी रास्ता रोको

(जत शहरातील मुख्य महामार्गाचे काम सुरू करण्यासाठी भाजप नेते शिवाजी ताड यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.)
जत,(प्रतिनिधी)-
जत येथे राष्ट्रीय महामार्गाचे शहराच्या बाहेरील काम प्रगतीत आहे मात्र शहरातून जाणाऱ्या सोलनकर चौक ते बसवेश्वर चौक काम सुरूच झालेले नाही. सदरचा रस्ता पूर्णतः खराब झाला असून धुळीने माखलेला आहे. या रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे या मागणीसाठी भाजपचे नेते शिवाजी ताड यांच्या नेतृत्वाखाली शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांनी आंदोलनकर्त्याची भेट घेत तात्काळ काम सुरू होणार असल्याचे सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

   भाजपचे नेते शिवाजीराव ताड यांनी मागील महिन्यात शहरातील  रखडलेले कामे तातडीने सुरू करावेत, अशी मागणी करत रास्ता रोकोचा इशारा दिला होता. त्यावेळी प्रशासनाने तातडीने कामे सुरू करू असे सांगितले होते. पण कामे सुरू न झाल्याने शुक्रवारी  शिवाजी ताड यांच्या नेतृत्वाखाली महाराणा प्रताप चौकात शहरवासियांनी आंदोलन सुरू केले. आंदोलनात जत नगर परिषदेचे भाजपचे विरोधी पक्षनेते विजय ताड,  माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक उमेश सावंत, प्रकाश माने, डॉ. प्रविण वाघमोडे, हेमंत भोसले, किरण शिंदे, आप्पा शिंदे, बाळ सावंत, सचिन शिंदे, रघुनाथ भोसले, सचिन संख यांच्यासह शहरवासिय मोठया संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना शिवाजी ताड म्हणाले, जत शहरातील राष्ट्रीय महामार्ग हा कायम रहदारीचा आहे.  प्रमुख रस्ता असल्याने या ठिकाणी तालुक्यातील अनेक गावातून नागरीक येत असतात.  या ठिकाणी रस्ता खराब झाल्याने धुळीचे साम्राज्य समोर पसरलेआहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या रस्ताचे काम वर्षभरापासून सुरू  आहे.  अद्याप जत शहरातील काम सुरू केलेले नाही. वारंवार सुधारणा करण्याबाबत सूचना देऊनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे जत शहरातील वाहनांची अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. शिवाय शालेय विद्यार्थी, वयोवृद्ध व्यक्तींना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे.
यावेळी बोलताना विजय ताड, उमेश सावंत म्हणाले, सदरचे काम हे नगर परिषद यांच्यामुळेच थांबले आहे. पाइपलाइन बदली करण्याबाबत जे अंदाजपत्रक द्यायला हवे होते ते लवकर न दिल्याने काम रखडले.
आंदोलनाची माहिती मिळताच प्रांताधिकारी ठोंबरे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.मागील आठवडयातच याविषयावर बैठक झाली आहे. लवकरच  कामे सुरू होतील आंदोलन मागे घ्या, असे आवाहन केले.  प्रांताधिकारी यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

No comments:

Post a Comment