Sunday, June 2, 2019

जतमध्ये निकृष्ट खाद्यपदार्थांचे पेव

अन्न प्रशासनाचे दुर्लक्ष; शहरातील वाढत्या रोगराईत निकृष्ट खाद्य पदार्थांचा मोठा वाटा
जत,(प्रतिनिधी)-
जत शहराच्या कानाकोपऱ्यात सध्या चिकन 65,वडापाव,भजी, चायनीज चमचमीत पदार्थ मिळत आहेत. या हातागाड्यांवर शहरातील अनेक लोकांचे संसार चालत असले तरी या सगळ्यांमागे कमालीची अस्वच्छता, खाद्य पदार्थांचा निकृष्ट दर्जाचे याचे एक जळजळीत वास्तव आहे. जत शहराला गेल्या कित्येक महिन्यांपासून रोगराईने ग्रासले आहे,त्याला हे बाहेरचे,उघड्यावरचे ,निकृष्ट दर्जाचे अन्न पदार्थही मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत.

जत शहरात कसली परवानगी नसलेले चायनीज पदार्थांची विक्री करणारे,अंडा आम्लेट,चिकन 65 विकणारे हातगाडे आहेत. यांची चौकशी करणारी जत नगरपरिषद ची आरोग्य यंत्रणा नाही.उलट त्यांच्याकडून अशा हातागाडीवाल्यांना पाठिशीच घालण्याचा प्रकार होत आहे. अन्न व भेसळ विभागानेही याकडे सोयीस्कर दुर्लक्ष दिसत आहे. शहरातील वाढत्या रोगराईला निकृष्ट खाद्य पदार्थांचा मोठा वाटा असल्याचे डॉक्टर मंडळींचे मत आहे.
जत शहर एकेकाळी उत्कृष्ट खाद्य पदार्थांसाठी प्रसिद्ध होते. मात्र अलीकडच्या काही वर्षांत जत नगरी रस्त्यांवरील अस्वच्छ आणि टुकार खाद्य पदार्थांमुळे बदनाम होत आहे.  साहजिकच दवाखान्यांमध्ये रुगणांची गर्दी गेल्या अनेक महिन्यांपासून कायम आहे. डॉक्टर मंडळी आपल्या रूग्णांना नेहमी दोन सल्ले देत असतात. एक म्हणजे पाणी उकळून प्या आणि दुसरे म्हणजे बाहेरचे काही खाऊ नका.
सध्या जत शहराच्या कानाकोपऱ्यात मोठ्या प्रमाणात खाद्य पदार्थ विकणारे गाडे आहेत. यापैकी काही व्यावसायिक हे स्वच्छता आणि खाद्य पदार्थांचा दर्जा याबाबत चांगली खबरदारी घेतात,पण स्वच्छतेचे सगळे नियम धाब्यावर ठेवून अतिशय निकृष्ट खाद्यपदार्थ ग्राहकांच्या माथी मारणाऱ्याची संख्या अधिक आहे. यामुळे फक्त जत शहरातील च नव्हे तर जतमध्ये येणाऱ्या रुग्ण,प्रवाशांचे आरोग्य कमालीचे धोक्यात आले आहे.
जत शहरातील पंचायत समिती, शिवाजी पुतळा चौक, संभाजी चौक ते लोखंडी पूल आणि तेथून बिळूर मार्ग,उमराणी रोड,विजापूर रोड,जत बसस्थानक परिसर,निगडी रोड चौक,सोलनकर चौक या परिसरात मोठया प्रमाणात हातगाडे लागलेले असतात. मात्र यांच्याकडून स्वच्छता आणि पदार्थांचा दर्जा पाळला जत नाही.त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य बिघडण्यास या रस्त्यावरच्या अन्न पदार्थ विकणाऱ्या गाड्यांचाही मोठा सहभाग आहे.

No comments:

Post a Comment