Saturday, June 29, 2019

बांधकाममंत्री पाटील यांच्या स्वागतासाठी रस्त्यावरील खड्डयांभोवती रांगोळी घालणार : विक्रम ढोणे

जत,(प्रतिनिधी)-
राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील उद्या जतमध्ये विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने येत आहेत त्यांच्या स्वागतासाठी जत शहरातील सर्व रस्त्यावरील खड्डयांभोवती रांगोळी घालून गांधीगिरी मार्गाने त्यांचे स्वागत करणार असल्याचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी तहसीलदारांना  दिले आहे.

 ढोणे  पुढे म्हणाले की, बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खड्डेमुक्त महाराष्ट्र घोषणा केली होती पण घोषणा करून सहा महिनेही झाले नाहीत तोवर जत शहर खड्डेमुक्त होण्याऐवजी खड्डेयुक्त झाले आहे. याच्या निषेधार्थ गांधीगिरी मार्गाने खड्डयांभोवती रांगोळी घालून गांधीगिरी मार्गाने स्वागत आंदोलन करणार आहे. कारण या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी, प्रशासन दुर्लक्ष करत आहेत.
या खड्ड्यांमुळे जत शहरातील आणि तालुक्यातील नागरिकांना पाठीच्या मणक्याचे आजार होत आहेत. तसेच अनेक मोठे अपघात होऊन  मोठ्या दुर्घटना घडलेल्या आहेत. प्रशासन कोणाचा बळी जाण्याचे वाट पाहत आहे का, असा प्रश्न पडला आहे. म्हणून याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन गांधीगिरी मार्गाने करीत आहे, असे सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी सांगितले. यावेळी राजाराम लकडे, बिभिषण निळे, ज्ञानेश्वर हिप्परकर,भोसले यादि उपस्थित होते. जत तालुका भाजप संपर्क कार्यालय आहे, त्याच्या अगदी समोर मोठेच्या मोठे खड्डे पडले आहेत. निदान मंत्री पाटील यांनी कार्यालयासमोरील रस्ता तर खड्डामुक्त करावा, अशी मागणी केली.

No comments:

Post a Comment