Thursday, June 20, 2019

योग करा, आरोग्य सुधारा!

आपल्याकडे एखादे वाहन असेल तर काही ठराविक कालावधीनंतर आपण त्याची दुरुस्ती किंवा सर्व्हिसिंग करतो. कशासाठी तर ऐनवेळी आपणास धोका होऊ नये आणि आपला प्रवास सुखकारक व्हावा म्हणून वाहनांची जेवढी काळजी घेतली जाते तेवढी काळजी आपल्या सजीव शरीराची खरोखरच आपण घेत असतो का ? नाही. म्हणूनच अचानक मृत्यू पावणार्‍या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. योग आणि आपण याचा काही तरी संबंध आह,े हे सर्वप्रथम जाणून घेऊ या.

मनुष्य पृथ्वीतलवार जन्म घेतल्यापासून तर मरेपयर्ंत मानवाच्या शरीराचा आरोग्याशी संबंध येतो. शरीर सुदृढ असेल तर त्याचे आरोग्य देखील सुदृढ असते. आरोग्य सुदृढ असेल तर बाकी सगळ्या गोष्टी आपोआप सोईस्करपणे पार पडत असतात. एक म्हण आहे, शरीर मजबूत तर मन मजबूत. मात्र आपले आरोग्य चांगले नसेल तर आपल्या जवळ सर्व काही असून ते काहीच कामाचे नसते. म्हणून प्रत्येक जण आपले आरोग्य कसे चांगले राहील? याकडे विशेष लक्ष देत असतो. वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेले अभिनेता अमिताभ बच्चन आज ही न थकता चित्रपटात काम करताना दिसतो. याचे काय कारण असू शकते तर ते म्हणजे त्यांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिल्यामुळे. आरोग्य चांगले असेल तर किती ही धन कमाविता येऊ शकेल. आपले आरोग्य म्हणजे आपले धन होय. परंतु एकूण लोकसंख्यापैकी फारच कमी म्हणजे १0 ते २0 टक्के लोक आपल्या शरीराची देखभाल करून आरोग्याची काळजी घेतात. बाकी इतर मंडळी मात्र आपल्या अमूल्य अशा शरीराकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे त्यांना आरोग्याच्या विविध तक्रारीला तोंड द्यावे लागते. असे म्हटले जाते की, दवाखाना मागे लागले की कुटुंबाचा विकास होत नाही. म्हणून दवाखाना आपल्या मागे लागू नये यासाठी काय करता येईल याचा विचार करणे आवश्यक आहे.
आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी सर्वप्रथम आपणांस चांगली सवय असावी लागते. रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे ही सवय आपणाला निरोगी राहण्यास मदत करते. ज्याप्रकारे शाळा-महाविद्यालयात प्रत्येक विषय आणि कृतीचे नियोजनानुसार एक वेळापत्रक असते. अगदी त्याचप्रकारे माणसाने सुद्धा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपयर्ंत प्रत्येक कृतीचे नियोजन करून त्याचे एक वेळापत्रक आपल्या मेंदूला दिले की, रोज त्या वेळेला मेंदू आठवण करून देते. एखाद्या दिवशी वेळापत्रकात मागे पुढे होईल पण वारंवार त्यात चुका करू नये. स्वच्छतेच्या आपल्या सवयी आपणाला निरोगी राहण्यास मदत करतात. कधी कधी आपल्या वागण्यामुळे इतरांना त्रास होतो, त्यामुळे त्यांचे आरोग्य बिघडू शकते. आपले जेवण हे देखील आपले आरोग्य वाढविण्यासाठी नेहमी मदत करतात. आपल्या जेवणात संतुलीत आहार नियमितपणे असेल तर आपल्या आरोग्याच्या तक्रारी खूप कमी प्रमाणात असतात. बहुतांश मुले आणि मोठी माणसेदेखील फळभाजी आणि पालेभाजी खाण्यासाठी टाळाटाळ करतात. रोज एकसारखे अन्न जेवण केल्यास सर्व प्रकारचे जीवनसत्वे मिळत नाहीत. त्यामुळे मग कोणत्या तरी जीवनसत्वाचे प्रमाण कमी होते आणि मग आपणांस आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात. आपणाला मिळलेले शरीर हे एक अमूल्य वरदान आहे. मात्र त्याची आपणांस काहीच काळजी वाटत नाही हे आपल्या नेहमीच्या वागण्यावरून लक्षात येते. पूर्वीच्या लोकांचे जिवंत राहण्याचे सरासरी आयुष्य शंभर वर्षे होते परंतु आजच्या लोकांचे वय ६0 वर्षांवर येऊन बसले आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनामुळे मनुष्य स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत आहे.
मुलांनी आपल्या शरीराच्या तंदुरुस्तीसाठी दिवसातून एक तास जरी दिले तरी आपले आरोग्य बिघडणार नाही. रोज सकाळी आणि सायंकाळी अर्धा तास चालणे हे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. इतर काही करा किंवा न करा मात्र रोज अर्धा तास चालण्यासाठी द्या असे प्रत्येक डॉक्टर आपल्या रुग्णाला सांगत असतात. आपल्या पूर्वजांनीदेखील शरीराच्या तंदुरुस्तीसाठी व्यायाम करण्याचे महत्त्व सांगितले आहे. मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी योगाचे खूप महत्त्व आहे. पूर्वीच्या काळातील संत महात्मे जंगलात जाऊन ध्यान धारणा करीत. त्यातून योगाचेच महत्त्व अधोरेखित होते. शाळाशाळांतून परिपाठच्या माध्यमातून मुलांना दोन मिनिटे मौन धारण करण्याचे उपक्रम घेतले जातात. त्यातून मुलांची मनाची एकाग्रता वाढविण्याचा नकळत प्रयत्न झालेला असतो. काही उपक्रमशील आणि प्रयोगशील शिक्षक या मौनचा उपयोग करून मुलांमधील सुप्त गुणांचा आविष्कार देखील करत असतात. शाळा सुरू होताना आणि सुटताना मौन घेणे मुलांच्या दृष्टिकोनातून अत्यंत फायदेशीर आहे. त्याच अनुषंगाने करा योग राहा निरोग असे आयुर्वेदामधून नेहमी सांगितले जाते. ११ डिसेंबर २0१४ रोजी संयुक्त राष्ट्रसभेत २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून मंजुरी देण्यात आली. म्हणून सर्वात पहिल्यांदा २१ जून २0१५ रोजी सर्वात पहिल्यांदा संपूर्ण जगात योग दिन साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्रसभेत योगाबाबत बोलतांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, शरीर आणि मन यांच्यात समन्वय ठेवण्याचे काम योग करते.
योग ही भारताची खूप जुनी परंपरा आहे. योग हे व्यायाम नसून निरोगी शरीर राहण्यासाठी एक चांगली सवय आहे. लोकांमध्ये योगाविषयी जागृती निर्माण करणे हे या दिनाचे महत्त्व म्हणता येईल. म्हणून आज आंतरराष्ट्रीय योग दिनी आपल्या आयुष्यासाठी आणि आपल्या कुटुंबाच्या निरोगी आरोग्यासाठी रोज कमीतकमी अर्धा तास चालणे आणि योगा करण्याचा संकल्प करू या आणि निरोगी जीवन जगू या.

No comments:

Post a Comment