Wednesday, June 26, 2019

तरुणींचे पलायन, पालकांसाठी डोकेदुखी

जत,(प्रतिनिधी)-
मोबाईल, व्हॉटस अप, फेसबुक यांच्या अति वापराचा परिणाम समाजात प्रकर्षाने दिसू लागला असून तरुण मुली याला अधिक बळी पडताना दिसत आहेत. प्रेमासाठी वाट्टेल ते करायला तयार असलेल्या मुली आता बंडखोर होत असून ज्यांनी जन्म दिला, वाढवलं, शिकवलं त्यांच्यावरच डारडूर करून या मुली घरातून पलायन करत आहेत. समाजातील इज्जत घालवायला नको म्हणून मुलीचे पालक फार दोन पावले मागे सरत आहेत. सांगली जिल्ह्यात अलीकडच्या काही महिन्यात पन्नासहून अधिक घटना घडल्या आहेत. पोलीस दप्तरी नोंद नसलेली आकडेवारी मोठी असल्याचे सांगण्यात येते.

अर्थात यात फक्त कॉलेजवयीन तरुणीच आहेत असे नाही तर काही विवाहित महिलाही आहेत. सासरकडील लोकांकडून खूष नसलेल्या विवाहित महिला या मोबाईलमुळे बाहेरील तरुणांच्या संपर्कात येत आहेत. त्यांच्या प्रारंभीच्या बोलण्याला भुलून  तरुणी त्यांच्या प्रेम जाळ्यात ओढल्या जात आहेत. शांतिनिकेतन विद्यालयात अशाच प्रकारातून एका विवाहित महिलेचा खून झाला. मुलींना आपण फसलो आहोत,याची जाणीव झाल्यावर त्या संबंध तोडायचा प्रयत्न करतात ,तेव्हा त्यांना मागील चुकांची आठवण किंवा त्याचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन संबंध ठेवण्यास भाग पाडले जाते किंवा आहे त्या परिस्थितीत त्याचा स्वीकार करावा लागतो.
अलीकडच्या मुलींना डेशिंग तरुणांची भुरळ पडली आहे. भपकेबाज कपडे, गाड्यांचा शौक असलेल्या मुलांवर मुली लवकर फिदा होतात. मित्रांच्या गाड्या, त्यांच्याच पैशांवर गर्लफ्रेंडला फिरवणाऱ्या मुलांची संख्या मोठी आहे. जतसारख्या ग्रामीण भागात श्रीमंतांच्या घरातील मुली अशा मुलांवर फिदा होऊन गरबा घराच्या  सुना झाल्या आहेत.
पोलीस नोंदीनुसार तरुणी घराबाहेर पडण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरांबरोबरच ग्रामीण भागात त्याची चिंता वाढली आहे. मुलींचे फिल्मी स्टाइल प्रेमविवाह पालकांसाठी डोकेदुखी ठरले आहेत. सर्रास मुली 17 ते 10 वयोगटातील आहेत. सुशिक्षित मुलींचे प्रमाण कमी आहे. 10 वी ,12 वी शिकलेल्या मुली शिकलेल्या किंवा रोजगाराला बाहेर जाणाऱ्या मुलींचे पळून जाऊन लग्न करण्याचे प्रमाण वाढले आहे. शिक्षण सोडून घरात बसलेल्या मुलींचीही संख्या अधिक आहे. त्याचबरोबर लग्न होऊनही उंबरठा ओलांडून पळून जाणाऱ्या विवाहित मुलींची पळून जाण्याची घटना मोठी गंभीर आहे. मुलींना पळवून नेऊन चार दिवस एकत्र घालवून पुन्हा घरी आणून सोडण्याच्या म्हणजेच फुस लावून पळवून नेण्याच्या घटनाही घडत आहेत. यात मुलींचे आयुष्यच उदवस्त होत आहे. पालकांचीसुद्धा समाजात नाचक्की होत आहे.
हा सगळा प्रकार व्हायला मोबाईल असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हॉटस अप आणि फेसबुक च्या माध्यमातून ओळखी घडवून आणल्या जातात. आता सहजासहजी मोबाईल मिळत असल्याने आणि घरचे लोक मुलीच्या या सततच्या मोबाईलला चिकटून राहण्याच्या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने मुली निडर बनल्या आहेत. आयुष्यात काही तरी वेगळं करण्याच्या नादात स्वतः चा विनाश करून घेतात. मोबाईल वर कुठेही जाऊन बोलण्याची सोय असल्याने घरातल्या लोकांना फार धाकात ठेवणे अवघड होऊन बसले आहेत.

No comments:

Post a Comment