Sunday, June 2, 2019

कडक उन्हामुळे शितपेयांना मागणी वाढली

जत,(प्रतिनिधी)-
यंदाच्या उन्हाळ्यातील तापमान आजपर्यंतचे उंच्चाकी असून लोकांच्या जीवाची घालमेल वाढली आहे. 42 अंश सेल्सिअस तापमानाची सीमा ओलांढल्याने सर्वांसाठी हा उन्हाळा असह्य ठरला असला तरी शीतपेय विक्रेत्यांसाठी मात्र लाभदायक ठरला आहे. कडक उन्हामुळे शीतपेयांना मागणी वाढली आहे. याचा लाभ विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणात झाला आहे.

बाटलीबंद शीतपेय,पाण्याच्या बाटल्या आणि विविध प्रकारच्या आईस्क्रीम च्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. या विक्रीच्या नोंदी एकत्रितपणे कुठेच नोंदवल्या नसल्या तरी एकट्या जत तालुक्याचा विचार केला तर त्याचा व्यवसाय कोटींवर गेला असल्याचे बोलले जात आहे.याशिवाय ऊसाचा रस,फळांचा ज्यूस,  लिंबू सरबत,लसी, मठ्ठा,ताक या देशी पेयांनाही मागणी वाढली आहे. कित्येकांनी अन्य व्यवसाय बंद करून हा हंगामी व्यवसाय सुरू करून संधीचा लाभ उठवत आहेत.
यंदा उन्हाचा कहर झाला असून सकाळी आठ वाजल्यापासूनच कडक उन्हाला सुरुवात होते. अशा असह्य वातावरणात शीतपेये हवीहवीशी वाटतात.  देशी पेयांबरोबरच बाटलीबंद देशी-विदेशी कोल्ड्रिंक ला मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे.उन्हाने कासावीस झालेल्या जीवाला थंडा थंडा कूल कुल करणारी ही शीतपेये कोटींची उड्डाणे पार करत आहेत. उन्हाळा संपत आला तरी तापमान कमी व्हायला तयार नाही. शहारांबरोबरच ग्रामीण भागातील किराणा दुकान, पानांची टपरी, मेडिकल दुकाने, बेकरी, हॉटेल मधून या शितपेयांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.
विविध कंपन्यांनी विविध फ्लेवरची उत्पादने बाजारात आणली आहेत. मँगोवर आधारित शितपेयांची गर्दी बाजारात वाढली आहेत.
असे असले तरी ग्रामीण भागात बनावट शीतपेये देखील दाखल झाली आहेत. मोठ्या कंपन्यांच्या नावाशी साधर्म्य दाखवणारी शीतपेये मोठ्या प्रमाणात आली असून त्यांचाही व्यवसाय मोठ्या संख्येने होत आहे.यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अन्न व भेसळ विभागाने अशा दुकानांवर धाडी टाकून लोकांचे आरोग्य बिघडण्यापासून वाचवावे, अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment