Wednesday, June 5, 2019

शेळ्या-मेंढ्यांच्या छावणीला अखेर मान्यता


जत,(प्रतिनिधी)-
 ऐन उन्हाळ्यात पाणी व चार्यासाठी शेळ्या-मेंढ्या तडफ डत असताना दुर्लक्ष करणार्या सरकारला अखेर शेळ्या-मेंढ्यांची कणव आली असून संपूर्ण उन्हाळा गेल्यानंतर शासनाने शेळया आणि मेंढ्यांसाठी चारा छावण्या सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्याबाबतचा आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. दरम्यान, या छावण्यांसाठी संबंधित संस्थांनी पुढाकार घेऊन छावण्या सुरू कराव्यात, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी केले आहे.

जिल्ह्यात शेळ्यांची संख्या 1 लाख 57 हजार 390, तर मेंढ्यांची संख्या 3 लाख 24 हजार 632 इतकी आहे. जिल्ह्यात गेल्या तीनचार महिन्यापासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. चारा आणि पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. यावर मात करण्यासाठी शासनाने टँकर आणि छावण्या सुरू केल्या आहेत. सध्या दोनशेवर गावांत आणि हजारहून अधिक वाड्यावस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 45 हून छावण्या सुरू केल्या असून यामध्ये हजारो जनावरे दाखल झाली आहेत. मोठ्या जनावरांना छावण्या सुरू करून शासनाने दिलासा दिला असला तरी शेळ्या आणि मेंढ्यांसाठी ना पाण्याची, ना चार्याची सोय करण्यात आली होती. यामुळे या जनावरांची एकप्रकारे उपासमारच सुरू होती. या जनावरांसाठी पाण्याची आणि चार्याची सोय करण्याची मागणी शेतकर्यांकडून केली जात होती.
सरकारने अखेर याची गांभीर्याने दखल घेत शेळया-मेंढ्यांसाठी चारा छावण्या सुरू करण्यास मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. या आदेशामुळे जिल्ह्यात लहान जनावरांसाठीच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न सुटून त्यांना दिलासा मिळणार आहे. शासनाने सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, सातारा यासह राज्यातील आठ जिल्ह्यात लहान जनावरांना चारा छावण्या सुरू करण्यास मान्यता दिली आहे. यानुसार प्रतिजनावर प्रतिदिन 25 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. छावणीत दाखल होणारे जनावरांसाठी दिवसाला तीन किलो हिरवा चारा व एक किलो सुका नारा द्यावा; तसेच आठवड्यातून तीन दिवस 200 ग्रॅम पशुखाद्य द्यावे, असे म्हटले आहे. या जनावरांना ऊस किंवा उसाने वाढे देऊ नये. हिरवा चारा उपलब्ध न झाल्यास दोन किलो मुरघास द्यावा, असे म्हटले आहे. छावणीत येणार्या जनावरांच्या संरक्षणासाठी जनावर मालकांनी जाळी आणावीत, असेही म्हटले आहे. सरकारने लहान जनावरांसाठीही छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित संस्थांना पुढाकार घेऊन छावण्या सुरू कराव्यात, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment