Wednesday, June 5, 2019

पाण्याचा काटकसरीने वापर अनिवार्य


(एस. आर. माने)
यंदाच्या उन्हाळ्यात वळवाच्या पावसाने दडी मारल्याने यंदा शेतीपिकाबरोबरच जनसामन्यांच्या पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या प्रशासनासमोर उभी आहे. आजमितीला निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाऊस पडणे हे गरजेचे आहे. मात्र ते आपल्या हाती नाही; मग उरला पर्याय तो उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून पाण्याची बचत करणे, हे मात्र आपल्या हाती असून त्यांची परिपूर्ती करणे जनतेच्या हिताचे आहे. म्हणून जनतेनं उपलब्ध पाण्याचा काटकसरीने आणि आवश्यक तेवढाच वापर करण्यात पुढाकार घ्यावा; तसेच पाण्याची होणारी नासाडी टाळून प्रशासनास सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी.

यंदा राज्याच्या सर्वच भागात पाणी टंचाईच्या झळा अगदी मार्चपासूनच लागल्या आहेत. शासन आणि प्रशासन यावर मात करण्यासाठी आवश्यक उपाय करीतच आहे. पण शासनाच्या या उपाययोजनांना सर्वांची साथ असणे गरजेचे आहे. कोल्हापूर हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे, की या जिल्ह्याने पाणीटंचाईच्या झळा कधीच पाहिल्या नाहीत, अनुभवल्या नाहीत. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टी विचारातून राधानगरी धरण शाहूंनी त्या काळी उभारल्याने कोल्हापूरकरांना पाण्याची टंचाई कधीच जाणवली नाही. पण आजमितीस राधानगरी धरणातही केवळ 1.35 टीएमसी इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे.
याबरोबरच जवळच्या वारणा धरणातही केवळ 9.17 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. चिकोत्रा प्रकल्पातही 0.49 टीएमसी, तुळशी धरणात 1.04 टीएमसी, दूधगंगा प्रकल्पात 2.41 टीएमसी, कासारी प्रकल्पात 0.45 टीएमसी आणि कडवी प्रकल्पात 0.13 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. एकूणच जिल्ह्यातील धरण प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध असून आणखी काही दिवस पावसाने ओढ दिल्यास पिण्याच्या पाण्याचं मोठं संकट जिल्हावासीयांसमोर उभं राहील. कोल्हापूर जिल्ह्यातील विशेषत: कोल्हापूरसह मोठ्या शहरातील जनतेनं संभाव्य पाणीटंचाई डोळ्यासमोर ठेवून आज नव्हे, तर आतापासूनच पाण्याची बचत करण्यास सुरुवात करायला हवी. कारण पाणी हे अमृत आहे. त्यामुळे पाण्याची बचत करणे तुम्हा-आम्हा सर्वांच्याच हिताचे आहे. याकामी जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि म हापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी भर दिला आहे. पण मुळातच धरण प्रकल्पातच पाणी कमी झाल्याने उपलब्ध पाण्याचा वापर अगदी काटकसरीने करण्याचा सल्ला महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment