Sunday, June 2, 2019

ग्रामसभेत केला ग्रामसेविकेचा विनयभंग

 जत,(प्रतिनिधी)-
शासकीय कामात अडथळा आणला व  शिवीगाळ  करून विनयभंग केल्याच्या आरोपावरून वायफळ ( ता.जत ) येथील ग्रामपंचायत उपसरपंच किरण बापू  यादव व सरपंच मालती चव्हाण यांचा मुलगा अण्णासाहेब चव्हाण यांच्यासह अकरा जणांच्या विरोधात ग्रामसेविका योगेश्री माणीक कुंभार ( वय २९ ) यानी आज जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे . याप्रकरणी अद्याप कोणासही अटक करण्यात आली नाही .ही घटना काल सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान वायफळ ग्रामपंचायत कार्यालयात घडली आहे.

     याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की , वायफळ ग्रामपंचायत ग्रामसभा आज सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान आयोजित करण्यात आली होती .ग्रामपंचायत लिपिक  प्रदीप यादव यांना ग्रामपंचायत सरपंच , उपसरपंच व  सदस्यांनी किरकोळ कारणावरून निलंबित केले होते . या निलंबित  केलेल्या लिपिकास पंचायत समिती गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे यांच्या आदेशाने ग्रामसेविका योगेश्री कुंभार यांनी परत कामावर  घेतले होते . आम्ही  निलंबित केलेल्या  लिपिकास तुम्ही परत कामावर का घेतले आहे त्यामुळे गावात आमचा अपमान झाला आहे.  गावातील अतिक्रमण केलेल्या टपरीधारकाना  तुम्ही नोटीस काढली आहे कोणाची परवानगी घेवून त्यांना नोटीस बजावली आहे.याचा जाब ग्रामसभेत विचारून तुम्ही आमच्या गावात काम करायचे नाही. तुमची आम्हाला गरज नाही. आम्ही दुसरा ग्रामसेवक आणणार आहे. असे म्हणून दप्तर अंगावर  फेकून ग्रामसेविका कुंभार यांना ग्रामसभेतच  मारहाण करून , त्यांचा हात पकडून शिविगाळ करून विनयभंग होईल असे वर्तन केल्याच्या आरोपावरून आकरा जणांच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
       वायफळ ग्रामपंचायत उपसरपंच किरण यादव , सरपंच मालती चव्हाण यांचा मुलगा अण्णासाहेब चव्हाण , बापूसाहेब यादव ,  समाधान चव्हाण , नितीन यादव , संतोष पवार , दादासो यादव , ज्ञानेश्वर सूर्यवंशी , मगेश यादव , ज्ञानेश्वर यादव ,कुमार यादव या अकरा जणांच्या विरोधात जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे वायफळ गावात खळबळ माजली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ए.डी. कत्ते करत आहेत.

No comments:

Post a Comment