Friday, June 7, 2019

जतच्या बीडीओ वाघमळे यांच्यावर कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

जत,(प्रतिनिधी)-
 पंचायत समिती जतच्या प्रशासन विभागाकडील कनिष्ठ सहाय्यक दिपक बर्गे यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या  जतच्या गटविकास अधिकारी श्रीमती अर्चना वाघमळे   यांचेवर  कडक कारवाई करण्यात यावी यासाठी अफ्रोट आणि विविध  संघटनेच्या वतीने न्याय
मागण्याकरिता सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी सांगली यांनी आश्वासन दिल्यानंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.कारवाई नाही झाल्यास पुन्हा जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

 कै.दिपक बर्गे कनिष्ठ सहाय्यक यांना आत्महत्या करणेस भाग पाडणाऱ्या श्रीमती अर्चना वाघमळे यांचेवर  आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला असल्याने  त्यांना तात्काळ निलंबित करावे, अॅट्रासिटी कायदा 1989 अंतर्गत तात्काळ कारवाई करण्यात यावी, अॅट्रासिटी अंतर्गत गुन्हा  दाखल करणेस टाळाटाळ  आणि अटक न करणाऱ्या पोलीस अधिकारी यांचेवरही कारवाई करण्यात यावी, दिपक बर्गे यांच्या पत्नीला अनुकंपा खाली तात्काळ नोकरी देणेत यावी, श्रीमती अर्चना वाघमळे व मनोज जाधव विस्तार अधिकारी  पंचायत समिती जत यांचे मोबाईल रेकार्डिगची तपासणी करून त्यांची नार्को टेस्ट करावी, असे निवेदन जिल्हाधिकारीअभिजित चौधरी सांगली यांना  देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करणेबाबत जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांना कळवले असून चौकशी अहवाल येताच आठ दिवसात कारवाई करु असे आश्वासन दिले. यावेळी सर्व संघटनेचे वतीने जिल्हाधिकारी यांना विनंती केली आहे की, जर आठ दिवसात  अर्चना वाघमळे यांचेवर निलंबनाची व  अॅट्रासिटी कायदा नुसार  कारवाई झाली नाही तर जिल्ह्यातील सर्व मागासवर्गीय कर्मचारी संघटना, सामाजिक संघटना व इतर कर्मचारी संघटनेचे  वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
या आंदोलनास  कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, कास्ट्राईब शिक्षक संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी युनियन (४३४०), सह्याद्री आदिवासी असोसिएशन सांगली, बिरसा क्रांती दल सांगली, मागासवर्गीय कर्मचारी-अधिकारी महासंघ सांगली, कोळी आदिवासी संघटना सांगली, यांनी जाहीर पाठिंबा दिला.
दरम्यान, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य शाखा चे वतीने दिपक बर्गे हे आचार संहिता पथक बोर्गी चेक पोस्ट येथे कार्यरत होते. तरी त्याना निवडणूक आयोगाकडून मिळणारे अनुदान कुटुंबाना मिळावे याबाबत वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष गणेश मडावी यांनी  जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. यावेळी  अफ्रोड संघटनेचे अध्यक्ष दिनेश पवार, सोनाजी बर्गे, सचिव बाबासाहेब माने, सचिन भोसले, प्रकाश कांबळे, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रमोद काकडे, जिल्हा परिषद कर्मचारी युनियन (४३४०),चे सचिव दत्ता शिंदे, बजरंग संघपाळ,सह्याद्री संघटनेचे अध्यक्ष शिवाजी जोशी, बिरसा क्रांती दलाचे अध्यक्ष दिलीप आंबवणे, जगनाथ मोरे, गणेश काकडे, सर्व पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळ-(जत पं. स.च्या बीडीओ अर्चना वाघमळे यांच्यावर कारवाई करण्यात यावी,यासाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध संघटना आंदोलन करीत आहेत.)

No comments:

Post a Comment