Friday, June 14, 2019

अंगणवाडी कर्मचारी व आशा, गटप्रवर्तकांच्या मागण्या त्वरित मंजूर करून घेऊ: उद्धव ठाकरे यांचे आश्वासन


जत,(प्रतिनिधी)-
अंगणवाडी कर्मचारी, आशा व गटप्रवर्तकांच्या प्रश्नाबाबत उद्धव ठाकरे यांच्या सोबत दोन्ही क्षेत्रांमधील कृती समितींच्या पदाधिकाऱ्यांची सेनाभवन येथे महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मानधन वाढीवर प्रकर्षाने चर्चा झाली. कसल्याही परिस्थितीत मानधन वाढवून देऊ, असे आश्वासन श्री.ठाकरे यांनी दिले.

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात रुपये 1500, मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात रुपये 1250 व मदतनिसांच्या मानधनात रुपये 750 अशी वाढ 1 ऑक्टोबर 2018 पासून केंद्र सरकारने जाहीर केली होती. परंतु त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारने केलेली नाही. महाराष्ट्राच्या महिला-बाल विकास मंत्री श्रीमती पंकजताई मुंडे यांनी अंगणवाडी कर्मचार्‍यांना सेवा समाप्ती नंतर सध्या लागू असलेल्या एकरकमी लाभाव्यतिरिक्त निम्म्या मानधनाएवढी रक्कम दर महा पेन्शन म्हणून देण्याचे देखील मान्य केले आहे. त्या बाबतची मंत्रालयीन मान्यता व आर्थिक तरतूद करण्याचा प्रश्न बराच काळ विचाराधीन आहे.
   आशा स्वयंसेविकांच्या मोबदल्यात रुपये 3500 ते रुपये 5500वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. त्या बद्दलची मंत्रालयीन मान्यता मिळणे आवश्यक आहे. अंगणवाडी कर्मचार्‍यांची मानधनवाढ व पेन्शन योजना तसेच आशा कर्मचार्‍यांच्या मोबदल्यात वाढ या बाबींना मंत्रालयीन मान्यता व आर्थिक तरतूद करण्याच्या दृष्टीने मा. उद्धव ठाकरे यांनी स्वतः लक्ष घालावे अशी विनंती कृती समितीच्या प्रतिनिधींनी बैठकीत केली. यावर उद्धव यांनी स्वतः  मुखमंत्री व वित्तमंत्री यांच्याशी बोलण्याचे आश्वासन दिले. या मागण्यांबाबतचा शासकीय निर्णय जून महिन्यामध्ये निर्गमित होण्याबाबत त्यांनी कृती समितीच्या प्रतिनिधींना आश्वस्त केले.  राज्यातील सर्व आशांना सायकली देण्याबाबत सकारात्मक प्रयत्न करण्याचे त्यांनी मान्य केले.
बैठकीत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत आरोग्यमंत्री एकनाथजी शिंदे, पर्यावरण मंत्री रामदास कदम, तसेच आमदार डॉ. निलम गोर्‍हे तसेच सारिका सावंत हे मान्यवर उपस्थित होते . अंगणवाडी व आशा कृती समितींच्या व CITU  वतीने कॉ.शुभा शमीम ,कॉ.  सलिम पटेल, कॉ. आरमायटी इराणी कॉ. आनंदी अवघडे, मिना कोळी,नेत्रदिपा पाटील, सुरेखा जाधव ,अंजू नदाफ,शबाना आगा, तसेच अंगणवाडी व आशा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, बैठकीच्या शेवटी उद्धव ठाकरे यांनी  एकनाथ शिंदे व रामदास कदम यांना पुढील पाठपुरावा करून येत्या तीन ते चार दिवसामध्ये पूर्तता करण्याची जवाबदारी सोपवली. त्यांनी देखील सर्व पाठपुरावा युद्ध पातळीवर करण्याचे आश्वासन दिले.

No comments:

Post a Comment