Tuesday, June 25, 2019

एसटीत आठ हजार जागा भरणार: परिवहन मंत्री


सामाजिक बांधिलकीच्यादृष्टीने दुष्काळग्रस्त १२ जिल्ह्यातील ४४१६ तसेच कोकण प्रदेशातील जिल्हे वगळता इतर ९ जिल्ह्यांत ३६0६ अशा एकूण ८0२२ चालक व वाहकांच्या रिक्त जागा राज्य परिवहन महामंडळामध्ये भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी जाहिरात देण्यात आली असून भरतीमध्ये दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील उमेदवारांना तसेच आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या पाल्याला प्राधान्य देणार असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

राज्यातील बेरोजगार तरुण, विधवा, शहीद जवानांचे वारस, आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांचे वारस, दुष्काळग्रस्त भागाताली तसेच सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी परिवहन विभागाने त्यांना नोकरीत प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिवाकर रावते यांनी सांगितले. २0१६-१७ मध्ये चालक व वाहक पदाची चाचणी उत्तीर्ण असलेल्या ९४५ तसेच किरकोळ त्रुटीच्या फेर तपासणीअंती पात्र ठरलेल्या व वाहन चाचणी उत्तीर्ण झालेल्या ८७८ असे एकूण १८२३ उमेदवारांना कोकण प्रदेशांतर्गत विभागात सामावून घेण्यात येणार आहे. मातृभूमीच्या संरक्षणासाठी शहीद झालेले संरक्षण दलातील अधिकारी-जवानाच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजने अंतर्गत चार शहिदांच्या वारसांची एसटी महामंडळात नियुक्ती करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.
महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी २१ आदिवासी युवतींना एसटीमध्ये चालकपदी नियुक्ती देण्यासाठी सहा महिन्यांचे प्रशिक्षण सुरु केले आहे. या प्रशिक्षणात युवतींना अटी व शर्तींमध्ये शिथिलता दिली असून प्रशिक्षणाच्या दरम्यान मोफत पास, गणवेश व विद्यावेतन दिले जाणार आहे. तसेच, राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या विधवांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होण्यासाठी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे निराधार स्वावलंबन योजना अंमलात आणण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. या योजनेव्दारे ३९२ अर्जदारांना आँटोरिक्षाचे परवाने वितरित केले आहेत. तसेच परिवहन विभागाद्वारे मागील साडे चार वर्षात ३ लाख ५८ हजार ३७६ आँटोरिक्षा व टँक्सी चालकांना बँजेस देण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. तसेच राज्यात २ लाख ३२ हजार 0३९ रिक्षांचे व ४९0१ टॅक्सीचे परवाने जारी करण्यात आल्याचे रावते यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment