Saturday, June 1, 2019

महामार्गाचे जत शहरातून काम सुरू करण्यासाठी ७ जूनला रास्तारोको

जत,(प्रतिनिधी)-
जत येथे राष्ट्रीय महामार्गाचे शहराच्या बाहेरील काम प्रगतीपथावर आहे. मात्र शहरातूनजाणाऱ्या सोलनकर चौक ते बसवेश्वर चौक या मार्गावर काम सुरूच झालेले नाही. सदरचा रस्ता पूर्णतः खराब झाला असून धुळीने माखला आहे.या रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, अन्यथा ७ जून रोजी या मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी ताड यांनी दिला आहे.

शिवाजी ताड यांनी तहसीलदार सचिन पाटील यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, जत शहरातील राष्ट्रीय महामार्ग हा कायम रहदारीचा आहे. प्रमुख रस्ता असल्याने या ठिकाणी तालुक्यातील अनेक गावातून या ठिकाणी नागरिक येतात. या ठिकाणी रस्ता खराब झाल्याने धुळीच्या साम्राज्यास सामोरे जावे लागत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. शिवाय या रस्त्यावरून वाहन चालवताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
     सदरच्या रस्त्याचे गेली वर्षभरापासून काम सुरू आहे. अद्याप जत शहरातील काम सुरू केलेले नाही. वारंवार सुधारणा करण्याबाबत सूचना देऊन सुध्दा कोणत्याही प्रकाराची सुधारणा झाली नाही. त्यामुळे शहरातील अपघाताचे प्रमाणदेखील वाढले आहे. शिवाय शालेय विद्यार्थी, वयोवृद्ध व्यक्ती यांना सदर रस्त्याने जाणे देखील अवघड झाले आहे. त्यामुळे विजापूर-सातारा या महामार्गाचे जत शहरातून जाणाऱ्या रस्त्याचे काम त्त्वरीत सुरू करावे अन्यथा रास्ता रोको ७ जून रोजी करण्याचा निर्धार देत तसे निवेदन तहसिलदार यांना दिले आहे.

No comments:

Post a Comment