Tuesday, June 18, 2019

शासनाची सव्वीस लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघे निलंबित

जत,(प्रतिनिधी)-
बोगस चलन करून त्यावर स्टेट बँक जत शहर शाखेचा शिक्का मारून शासनाची सुमारे सव्वीस लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून जत प्रांताधिकारी कार्यालयातील लिपिक बिपिन मुगळीकर व तहसील कार्यालयातील लिपिक लक्ष्मण भवर यांना जिल्हाधिकारी यांनी निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ माजली असून महसूल विभागाचे पितळ पुढील सखोल चौकशीत उघडे पडणार आहे असे येथे बोलले जात आहे.   
 
         याबाबत अधिक माहिती अशी की, राजकुमार रावसाहेब सावंत , शफिक बाबूमीया शकतोख ,  ज्ञानेश चंदर पांढरे ,संतोष शंकर पाथरूट , दादासाहेब नामदेव हीप्परकर या पाच वाळू  व्यवसाईकांच्या विरोधात बनावट चलन  प्रकरणी जत पोलिसात तर किरण ज्योत्याप्पा बेळुंखी ,  संतोष शंकर पाथरूट , अरुण शंकर बिराजदार या तीन वाळू व्यावसायिकांच्या विरोधात उमदी पोलिसात बनावट चलन प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या वरील आठ पैकी सहा वाळू व्यवसायिकांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांनी आपल्या जबाबात बिपिन मुगळीकर व लक्ष्मण भवर यांच्याकडे आम्ही रोख पैसे दिले होते त्यांनीच आम्हाला चलन आणून दिले आहे. ते बनावट आहे का, खरोखरचे आहे  ते माहिती नाही असा जबाब पोलिसात दिल्यामुळे पोलिसांनी याचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवून दिला होता.
याशिवाय या आठ जणांनी गुन्हा दाखल होण्यापूर्वी यासंदर्भात लेखी तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती .जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन मुगळीकर व भवर यांना निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत . दरम्यान लक्ष्मण भवर यांची पंधरा दिवसापूर्वी जत तहसील कार्यालयातून आटपाडी तहसील कार्यालयात बदली करण्यात आली आहे .
    जत तालुक्यात अवैध वाळू तस्करीचे राकेट मोठ्या प्रमाणात आहे. १५ जानेवारी ते १३ मार्च २०१९  दरम्यान जत व संख तहसीलदार कार्यालयातील वार्षिक लेखा परिक्षण सुरू असताना सदरचा अपहार उजेडात आला आहे. या अपहाराची रक्कम सुमारे सव्वीस लाख रुपये इतकी आहे . प्रत्यक्ष वाळू व्यावसायिकाकडून लक्ष्मण भवर व बिपिन मुगळीकर यांनी रोख पैसे घेऊन सदरची रक्कम त्यांनी बँकेत जमा केली नाही.परंतु त्यांना बनावट स्टेट बँकेचा शिक्का मारून बनावट चलन तयार करून  देऊन आम्ही सदरची रक्कम बँकेत भरली आहे,असे भासवून त्यांच्या जप्त करण्यात आलेल्या गाड्या सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. याप्रकरणी जत व उमदी पोलिस ठाण्यात स्वतंत्रपणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

No comments:

Post a Comment