Friday, July 19, 2019

पॉस्कोअंतर्गत जत येथे मुख्याध्यापकांची कार्यशाळा

जत,(प्रतिनिधी)-
बाललैंगिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा (पॉस्को) अंतर्गत जत येथील गोब्बी हायस्कूलमध्ये तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची कार्यशाळा पार पडली. यावेळी मुलींच्या लैगिक हिंसाचारावर आणि त्यांवरील कायद्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

जत येथील ऍड.आर.के.मुंडेचा यांनी यावेळी मुख्याध्याकाना मार्गदर्शन केले. ते म्हणाले,मुलींचे फसवणूक होण्याचे प्रमाण १६ ते १८ या वयोगटात सर्वाधिक आहे. लग्नाचे आमिष दाखवून, फसवून त्यांच्यावर बलात्कार केला जातो. या वयामध्ये मुलींना वाटणारे आकर्षण, त्यांना दाखविण्यात आलेली आमिषे, प्रलोभने म्हणजे त्यांना प्रेम वाटते. ते प्रेम आहे, की आकर्षण, हे त्या समजू शकत नाहीत. या सर्व गोष्टींची समज त्यांना नसते किंवा कोणी समजून सांगितल्यास ऐकून घेण्याची तयारी नसते. अनेकदा अशा मुलींना, त्यांच्या घरच्या लोकांना त्रास देऊ, मारून टाकू, अशी धमकी दिली जाते. अशावेळी घरच्या लोकांच्या प्रेमापोटी त्या मानसिक अत्याचार सहन करत गप्प बसतात.
ते पुढे म्हणाले,शिक्षक किंवा सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांनी याकडे लक्ष देऊन मुलींना सावध करणे,त्यांना लढण्यासाठी आत्मनिर्भर केले पाहिजे.
   प्रारंभी स्वागत विषय तज्ज्ञ ए. बी. मुल्ला यांनी तर आभार  सौ. नसीमा पठाण यांनी मानले. यावेळी केंद्रप्रमुख रतन जगताप, जयवंत वळवी, गोब्बी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. काटकर यांच्यासह मोठया संख्येने तालुक्यातील मुख्याध्यापक उपस्थित होते.

फोटो ओळ (जत येथे बाललैंगिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ठेवण्यात आलेल्या मुख्याध्यापकांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना वकील श्री.मुंडेचा.)

No comments:

Post a Comment