Monday, July 29, 2019

युवा पिढीला शिस्त,संस्काराचे ओझे होईना सहन


जत,(प्रतिनिधी)-
सध्याच्या स्पर्धेच्या आणि मनोरंजनाचा विस्फोट
झालेल्या युगात पालकांच्या शिस्तीचे व संस्कारांचे ओझे युवा पिढीला अजिबात सहन होईना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. समाजात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणांनी मुले घरातून निघून गेल्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे पालक धास्तावले असल्याचे दिसून येते.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतानाच युवापिढी मोवाईल, संगणक, इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्स अॅप, टीटरचा मोठ्या प्रमाणात वापर करू लागली आहे. ही बाब निश्चितच पालकांसाठी धोक्याची व गंभीर बनत आहे. शाळकरी व महाविद्यालयीन मुले व मुली मोबाईलवर तासन्तास चॅटिंग करीत बसतात.
त्यामुळे पालकांना त्यांना नाईलाजाने थांबवावे लागते, अभ्यास करावा, वेळेवर शाळेत जावे, परीक्षेची तयारी करावी, स्पर्धेचे युग आहे तेव्हा गुणवत्ता महत्त्वाची आहे, असे रास्त व गरजेचे बोल पालकांनी पाल्याला सुनावले की, झालं, त्याचा इगो हर्ट होतो अन् तो एकतर निघून जाण्याची भिती घालतो किंवा नसांगताच निघून जातो. यामुळे संपूर्ण कुटुंबच संकटाच्या आणि तणावाच्या खाईत लोटले जाते.एक तर सध्या लोकसंख्या वाढ होवू नये, म्हणून जनजागृती झाल्याने हम दो हमारे दो' अशीच कुटुंबातील
स्थिती दिसून येते. त्यामुळे खूपच लाडात वाढवलेल्या मुलांना शिस्त व संस्कार लावणे अनेक पालकांसाठी मोठी तारेवरची कसरत ठरत आहे. दुसरीकडे शिस्त व संस्कार न लावावेत तर मुले बिघडतील व स्पर्धेत टिकणार नाहीत, ही अनामिक भिती वाटते. त्यामुळे सध्या अनेक पालक अक्षरश: कात्रीत सापडले असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
सध्याची युवा पिढी संवेदनशील बनली आहे की,
परीक्षेत गुण कमी कसे मिळाले? दररोज वेळेवर शाळेत का जात नाही? असले फैशनेबल कपडे कशाला खरेदी केले? इतक्या महागड्या मोबाईल व बाईकची गरज आहे का? सारखे मित्रमंडळीसोबत फिरायला व पार्टीला जायची गरज आहे का? असे शिस्तीचे व संस्कारक्षम प्रश्न जरी विचारले तरी, आजकालच्या मुलांचा पारा लगेच चढतो. अन् रागाच्या भरात घरातून निघून जाणे किंवा खूपच संवेदनशील असेल तर आत्महत्या करणे अशा घटना समाजात घडत आहेत. नेमके काय करावे? हेच अनेकांना कळेनासे झाले आहे. अशा परिस्थितीत मुले
घडवायची तरी कशी? आणि मग त्यांना स्वावलंबी बनवायचे तरी कसे? यासारखे एक ना अनेक प्रश्न पालकांना भेडसावू लागले आहेत.
एकीकडे मुलांना शिस्त लावणे आणि
संस्कारक्षम बनविणे आवश्यक असताना दुसरीकडे मोबाईल, इंटरनेट आणि भरकटत चाललेल्या मित्रमंडळींच्या संगतीमुळे अनेक ठिकाणी घरातली एकुलती एक मुले व्यसनाच्या आहारी जावू लागली आहेत, तर काही जण शाळा सोडून बार, ढाबे यासारख्या ठिकाणी जाण्याला पसंती देत आहेत. परिणामी अनेक युवकांचा भविष्यकाळ अंधकारमय होत चालला आहे. पण, या वयात त्यांना त्याची तमा नसते. वेळ निघून गेल्यावर किती तरी मुलांना पश्चाताप होतो. परंतु, त्याचा काहीच उपयोग नसतो.
तेव्हा आजच्या पिढीने पालकांच्या किंवा शिक्षकांनी लावलेल्या शिस्तीचे व संस्काराचे दडपण किंवा ओझे न मानता आपल्या भल्यासाठी आहे, असा सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे.
यावर काही प्रमाणात तरी अंकुश ठेवण्यासाठी शासनाने शाळा स्तरावरील बंद केलेला
'मूल्यशिक्षण' हा विषय सुरू करणे गरजेचे आहे. तसेच पूर्वी ज्याप्रमाणे समाजात सर्वत्र एकत्र कुटुंबपद्धती होती; ती राहणे आवश्यक आहे. त्यामुळे आजी-आजोबांचे शिस्त व संस्कार आणि चांगली मुल्ये रूजविण्याचे काम सुरू राहील अशी आशा वाटते.तसेच शाळा व महाविद्यालयीन स्तरावर तज्ञ मार्गदर्शकांचे समुपदेशन गरजेचे आहे. पण एक मात्र नक्की की, अशा घटना समाजात वाढत आहेत याला नेमके जवाबदार कोण? हा प्रश्न मात्र निरुत्तरीत असला तरी समस्या मात्र गंभीर आणि भयानक आहे, हे नाकारता येणार नाही.

No comments:

Post a Comment