Wednesday, July 31, 2019

वाहन पार्किंग व्यवस्थेअभावी रहदारीची मोठी समस्या

जत,(प्रतिनिधी)-
 वाढत्या लोकसंख्येबरोबर वाढती वाहनसंख्या शहरासाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. बाजारपेठांनी गजबजलेल्या रस्त्यांना आता वाहनतळाचे रूप येऊ लागले आहे. त्यामुळे इतर वाहनचालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. जत शहरात वाहन पार्किंग व्यवस्था उभी राहण्याची आवश्यकता आहे.

अलीकडच्या काळात  वाढत्या लोकसंख्येमुळे वाहन खरेदीही वाढली. मात्र त्या तुलनेत रस्त्यांचे रुंदीकरण आणि वाहनतळासाठी मुबलक जागा उपलब्ध करून देण्यावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर  कुठेही लोकांकडून  वाहने उभी केली जातात. त्यामुळे वारंवार वाहतूक ठप्प होत असते.  वाहतूक पोलीसही नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन या वाहनांवर कारवाई करण्याचे टाळतात. मात्र, अनधिकृत पार्किंगवर कारवाई करत नाहीत, अशा टीकांचे धनी त्यांना व्हावे लागते. रस्ता आपल्या बापाचा नाही,याची जाण तरी वाहनधारकांना यायला हवी आहे. सगळ्यांना विना अडथळा रस्ता पार करता यायला हवा, याचा विचार सर्वानीच घ्यायला हवे.
जत शहरात कुठेच वाहन तळाची व्यवस्था नाही.त्यामुळे शहरात कुठेही वाहन पार्किंग केले जाते.याचा त्रास सगळ्यांनाच होतो.जागोजागी रहदारीला अडथळा निर्माण होतो. मंगळवार व गुरुवार या दोन आठवड्याच्या बाजारादिवशी तर लोकांना या वाहतुकीचा फार मोठा त्रास होत असतो. अशा वेळेला वाहने कुठेही लावलेली असल्याचे दिसून येत आहे.याकडे नगर परिषदेचे कर्मचारी व पोलिस कुठेच आढळून येत नाहीत.ही वाहतूक कोंडी सोडवण्याची आवश्यकता आहे.
सध्या जत शहरातून गेलेल्या विटा-विजापूर हाय वे रस्त्याचे काम सुरू आहे,त्याच पावसामुळे रस्ता राडेराड झाला आहे. कित्येक ठिकाणी नगरपरिषदेने गटारीची कामे सुरू केली आहेत. सध्या फारच लोकांना त्रास होत आहे. रस्त्यावरून चालणे मुश्किल झाले आहे.
दरम्यान,नवीन निवासी अथवा व्यावयायिक इमारतींच्या बांधकामांना परवानगी देताना त्या ठिकाणी मुबलक पार्किंग व्यवस्था आहे का, याची प्रत्यक्ष पाहणी करावी. तसेच, अनेक बांधकाम व्यावसायिकांकडून बांधकाम पूर्ण करेपर्यंत पार्किंगची सोय दाखवली जाते. मात्र, एकदा का सर्व परवानग्या आणि वीज, पाण्यासारख्या सुविधा मिळाल्या की, पार्किंगमध्ये छोटी-छोटी दुकाने थाटून ती भाड्याने दिली जातात. त्यामुळे या दुकानांमध्ये येणारे गिर्‍हाईक रस्त्यावरच वाहन उभे करते. परिणामी रस्त्यावर वाहतूककोंडी होऊन वाहनचालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

No comments:

Post a Comment