Monday, August 5, 2019

महापुराचे वाहून जाणारे पाणी दुष्काळी तालुक्यांना सोडण्यासाठी 9 आगस्ट रोजी सांगलीत आंदोलन


जत,(प्रतिनिधी)-
  कृष्णा, वारणा दुथडी भरून वाहत आहेत मात्र दुसरीकडे जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव आणि खानापूर हे तालुके तहानलेलेच आहेत. या तालुक्यात पाऊस आहे मात्र त्याचे प्रमाण अल्प आहे. या तालुक्यातील तलाव, ओढे, नद्या कोरड्याच आहेत त्यामुळे वाहून जाणारे प्रचंड पाणी दुष्काळी तालुक्यात सोडले तर दुष्काळी तालुक्याला वरदान ठरणार आहे. याशिवाय चारा छावण्या,  टँकरवर होणारा खर्च वाचणार आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यातच ताकारी, म्हैशाळ, विसापूर पुनदी, टेंभू व आरफळ या योजना सुरू करून दुष्काळी तालुक्यातील नदया, नाले, ओढे आणि तलाव भरून घेणे आवश्यक आहे. पण वीज बिल कुणी भरायचे हा प्रश्न उभा करून गेंड्याच्या कातडीचे प्रशासन दुष्काळग्रस्ताच्या भावनांशी खेळत आहे. माकडाच्या गोष्टीसारखे दुष्काळी जनतेचे झाले आहे.

दर पावसाळा आला की माकड घर बांधायचे म्हणते पण त्याला ते शक्य होत नाही पुढचा पावसाळा आला की त्याला घराची आठवण होते तसेच दुष्काळी जनतेचे झाले आहे दर पावसाळ्यात पुराचे पाणी सोडावे अशी मागणी होते. पण दुष्काळग्रस्त रस्त्यावर कधीच येत नाही.रस्स्यावर उतरल्याशिवाय हा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार नाही  आईसुद्धा मुलाला रडल्याशिवाय मुलाला दूध पाजत नाही आणि सरकार आणि प्रशासन गेंड्याच्या कातडीचे असते त्याला वठणीवर आणण्यासाठी आनदोलनाशिवाय पर्याय नाही नुसती चर्चा करून कट्ट्यावर गप्पा मारून हा प्रश्न सुटणार नाही त्यासाठी ठोस कृतीची गरज आहे. त्यामुळेच दुष्काळी जनतेसाठी 9 ऑगस्ट रोजी सांगलीत आंदोलन करण्यात येणार आहे.
दुष्काळी तालुक्यातील जनतेने पक्ष, गट अशी सगळी बंधने बाजूला ठेवून या प्रश्नासाठी एकत्रित येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शुक्रवार दि 9 आगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर एकत्र जमण्याचे आवाहन करण्यात आहे.  स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी याबाबत आवाहन केले आहे. 9850693701, 8329121717 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment