Thursday, August 1, 2019

दुष्काळी भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी होणार माफ


राज्य सरकारने दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. दुष्काळी भागात शिक्षण घेत असलेल्या १0 वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी तसेच प्रात्यक्षिक, गुणपत्रिका व प्रमाणपत्र शुल्कही माफ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री अँड. आशीष शेलार यांनी दिली आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांच्या फीच्या प्रतिपूर्तीचा प्रश्न आला होता. त्याबाबत अधिकार्‍यांकडून माहिती घेतली असता दुष्काळी भागातील १0 वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा फीची प्रतिपूर्ती करताना परीक्षा फी माफ केली जाते. मात्र, त्यामध्ये प्रात्यक्षिक, गुणपत्रिका व प्रमाणपत्र शुल्क मात्र आकारले जाते, हे आले. त्याचवेळी त्यांनी हे शुल्कसुद्धा माफ करून संपूर्ण फीची प्रतिपूर्ती करण्यात येईल, असे शासनातर्फे सभागृहात जाहीर करण्यात आले होते.
यंदा पावसाला उशिरा सुरुवात झाल्याने राज्यातील काही जिल्हय़ांमध्ये भीषण दुष्काळ आहे. त्यामुळे शेतकरी कुटुंबाला आर्थिक चणचण भासत आहे. अशातच मुलांच्या शिक्षणाचा वाढता खर्च हे पालकासमोर मोठे आव्हान आहे. अशा शेतकरी कुटुंबातील आणि विशेषत: दुष्काळी भागातील जनतेच्या मुलांना आर्थिक कमतरतेमुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये म्हणून फी माफीचा हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे असेही अँड. शेलार यांनी सांगितले.
दुष्काळी भागातील १0 वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करतानाच ही प्रतिपूर्ती आरटीजीएसमार्फत थेट विद्यार्थ्यांच्या अथवा पालकांच्या खात्यात जमा करण्यात यावी असा निर्णयही घेण्यात आला असून शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे. आता प्रतिपूर्तीच्या कार्य पद्धतीमध्ये सुधारणा करून थेट विद्यार्थी अथवा पालकांच्या खात्यात फीची प्रतिपूर्ती करण्यात येणार आहे. राज्य मंडळाचे १0 व १२ वी परीक्षेचे फॉर्म भरताना विद्यार्थ्यांचे महसूल मंडळ, गाव, तालुका व जिल्हय़ाची तसेच विद्यार्थ्यांचे/पालकांचे बँक खात्याची माहिती राज्य मंडळाने घ्यावी. महसूल विभागांना दुष्काळी गावांची यादी जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्यापूर्वी जी गावे दुष्काळी म्हणून घोषित केलेली असतील अशा विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना कोणतेही शुल्क भरावे लागू नये याची दक्षता राज्य मंडळाने घ्यावी.

No comments:

Post a Comment