Monday, August 12, 2019

स्टुडंट पोर्टलवरील विद्यार्थीच संचमान्येसाठी ग्राह्य धरणार!

जत,(प्रतिनिधी)-
शैक्षणिक सन २0१९-२0 साठी राज्यातील प्रत्येक शाळेला त्यांचे स्टुडंट पोर्टल पूर्ण करण्याची डेडलाईन जवळ आली आहे. २५ ऑगस्टपर्यंत स्टुडंट पोर्टलवर असणारे विद्यार्थीच यावर्षीच्या संचमान्यतेसाठी ग्राह्य धरले जाणार असल्याची माहिती प्राप्त आहे. त्यामुळे शाळांतील शिक्षक व कर्मचारी आपल्या शाळेचे स्टुडंट पोर्टल पूर्ण करण्याला प्राधान्य देत आहेत.

सन २0१२ पासून शासनाच्या शिक्षण संचालनालयाने राज्यातील सर्व शाळांचा संस्था, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी यांचा डाटा सरल प्रणालीत घेतला आहे. शाळेत शिकणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याला स्टुडंट आयडी देण्यात आला आहे. तो त्या विद्यार्थ्याच्या आधार कार्डशी संलग्न करण्यात आला आहे. त्यामुळे बोगस विद्यार्थी नाहीसे झाले आहेत. आता केवळ दरवर्षी पहिल्या इयत्तेत प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांनाच नवीन स्टुडंट आयडी घ्यावा लागतो. इतर विद्यार्थी केवळ प्रमोट, अटॅच, डीटॅच करूनच शाळेच्या पटावर घ्यावे लागते. शाळेच्या युडायस नंबरवर त्यांच्या स्टुडंट पोर्टलवर असणार्‍या विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसारच संबंधित शाळेला शिक्षकांची पदे मान्य केली जातात. त्यामुळे दरवर्षीच शिक्षकांचे समायोजन करण्याची झंझट शिक्षण विभागावर आली आहे.
यावर्षी २५ ऑगस्टला शाळेच्या पोर्टलवर असलेली विद्यार्थी पटसंख्या संचमान्यतेसाठी ग्राह्य धरली जाणार असल्याचे समजते. शाळांनी या डेडलाईनच्या आत आपल्या विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात प्रमोट करून घ्यावे, नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांची त्याच्या पूर्वीच्या शाळेला विनंती पाठवून ते विद्यार्थी आपल्या शाळेत जोडून घ्यावे. तसेच आपल्या शाळेतून दाखला घेवून गेलेल्या विद्यार्थ्यांची नवीन प्रवेशित शाळेकडून विनंती आल्यास ती मान्य करून द्यावी. जर २५ ऑगस्टपर्यंत नवीन प्रवेशित शाळेकडून विनंती न आल्यास अशा विद्यार्थ्यांना आऊट ऑफ बॉक्समध्ये टाकावे व आपल्या शाळेचे स्टुडंट पोर्टल अपडेट करून घ्यावे, अशा सूचना शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आल्या आहेत.
त्यामुळे आपले स्टुडंट पोर्टल अपडेट करण्यासाठी शाळांची लगबग सुरू झाली आहे. मराठी शाळांतील विद्यार्थी पटसंख्या दरवर्षी घसरत असल्याने शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. मात्र शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचे प्रमाण वाढल्याने अतिरिक्त शिक्षकांची संख्याही दरवर्षी कमी होत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये तर शिक्षकांची कमतरता निर्माण झाली आहे.

No comments:

Post a Comment