Friday, November 27, 2020

केंद्राने कामगारविरोधी जाचक कायदे रद्द करावेत : दिनकर पतंगे


जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-

केंद्र सरकारने कामगारांसाठी जे नवीन कायदे तयार केले आहेत, ते कामगारांच्या हिताच्या विरोधात आहेत. त्यामुळे केंद्राने सदरचे कायदे रद्द करून कामगारांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेना महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पतंगे यांनी केली आहे. याबाबतचे सविस्तर निवेदन श्री. पतंगे यांनी जतचे तहसीलदार सचिन पाटील यांना लेखी पत्राद्वारे दिले आहे. केंद्र सरकारने कामगार साठी नवीन कायदे तयार करून कामगाराचे मोठे नुकसान केले आहे. सदरचे कायदे कामगारांच्या हिताच्या विरोधात आहेत याचा कामगारांना काही फायदा नाही. त्यामुळे नवीन  कायदे ते तात्काळ बंद करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन सादर करताना महाराष्ट्र कामगार सेना तालुकाप्रमुख सुरेश घोडके, तासगाव कवठेमंकाळ शिवसेना संघटक सचिन चव्हाण तसेच सुरेश कोळी, अब्बास मुजावर, शाखाप्रमुख प्रभाग क्रमांक 10 जतचे शिवानंद तिकोंडी, विभाग प्रमुख उमराणी अर्जुन भोसले, शाखाप्रमुख अचकनहळळी जालिंदर शिंदे, मकरंद भोसले, दत्तात्रेय कोरे, उपविभाग प्रमुख डफळापुर चैतन्य कोरे, विभाग प्रमुख डफळापुर व इतर कामगार सेना कार्यकर्ते  उपस्थित होते.

Sunday, November 22, 2020

सभासदांच्या हितासाठी शिक्षक भारती संघटना शिक्षक बँक निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार.

शिक्षक भारती जिल्हा कार्यकारिणी बैठक 


विटा,(जत न्यूज वृत्तसेवा)-

शिक्षक भारतीच्या सांगली जिल्हा कार्यकारिणी बैठक नुकतीच विटा येथे उत्साहात पार पडली. यावेळी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणूकीच्या मुद्द्यावर चर्चा झाली. शिक्षक सभासदांच्या हितासाठी शिक्षक भारती संघटना पूर्ण ताकतीनिशी शिक्षक बँक निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत ठरल्याप्रमाणे शिक्षक भारती संघटना पहिल्यांदाच स्टँम्प पेपवर बँक निवडणूकीचा जाहीरनामा प्रकाशित करणार आहे. 

या बैठकीत शिक्षक बँकेत सभासद हिताच्याच मुद्द्यांवर प्रामुख्याने भर देणार दिला जाणार आहे.  शिक्षक भारतीचा जाहीरनाम्यामध्य कर्जाचा व्याजदर एक अंकी करणार आहे. निष्कर्जी मयत सभासदांच्या वारसास सभासद संजीवनी सुरक्षा ठेव योजनेतून 20 लाख रूपये देणार आहे. सत्तेवर आल्यावर नोकरभरती करणार नाही. नोकरभरतीवर बंदी आणणार आहे आणि महत्त्वाचे म्हणजे दोन अंकी लाभांश दिला जाणार आहे.

या बैठकीत सावित्री -फातिमा कुटुंब स्वास्थ्य योजनेत जिल्ह्यातील जास्ती जास्त शिक्षकांनी सहभागी होण्याबाबत शिक्षक भारती संघटनेने केले आवाहन करण्यात आले. यावेळी  शिक्षकांच्या कुटुंबासाठी असणारी  शिक्षक भारती संघटनेची सावित्री- फातिमा कुटुंब स्वास्थ्य योजनेची माहिती सर्व जिल्हा कार्यकारिणीला देण्यात आली.सदरची योजना जिल्ह्यातील जास्ती जास्त शिक्षकांना सांगण्यात यावी असे आवाहन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष महेश शरनाथे,कादर अत्तार,दीपक काळे,कृष्णा पोळ , महेशकुमार चौगुले,दिगंबर सावंत,दादासाहेब खोत, म्हाकू ढवळे,प्रताप टकले,चंद्रशेखर क्षीरसागर,महिला जिल्हाध्यक्षा विद्या चव्हाण,सुनिता शिंदे,उज्ज्वला कुंभार,अनिता कदम यांनी शिक्षक भारती संघटनेच्या वाटचालीबद्दल मनोगते व्यक्त केली. नामदेव गुरव यांनी सुत्रसंचलन केले.यावेळी जिल्ह्यातील शिक्षक भारती संघटनेचे शिक्षक -शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Wednesday, November 18, 2020

चर्मकार तरुणीवर अन्याय-अत्याचार करणाऱ्या नराधमांवर कारवाई करण्याची मागणी


जत,(जत न्यूज वृत्तसेवा)- 

चर्मकार समाजाच्या दोन भगिनी युवतीवर अन्याय व बलात्काराच्या घटना पुरोगामी महाराष्ट्रात घडल्या याच्या निषेधार्थ व अत्याचार करणाऱ्या नराधमांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा व्हावी म्हणून बुधवारी अखिल भारतीय गुरू रविदास समता परिषद ह्या संघटनेतर्फे जत प्रांत कार्यालयात जाऊन नायब तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. मागासवर्गीय समाजावर अन्याय व अत्याचाराचे प्रमाण वाढले असून यावर वेळीच पोलिसांकडून गुन्हेगारांवर त्त्वरीत कारवाई व्हावी यासाठी प्रयत्न होण्यासाठी शासनाने कडक कायदे करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी हराळे समाजाचे चेअरमन किरण शिंदे, संघटनेचे तालुका अध्यक्ष अरुण साळे, बसपा तालुका अध्यक्ष तानाजी व्हनखंडे, ईश्वर संकपाळ, गुरू साळे, अण्णा साळे, मारुती कांबळे, शिवमूर्ती कणसे, अण्णू राजाराम साळे, जनार्दन साळे, व महेशकुमार साळे उपस्थित होते.

शिक्षक बँकेने सभासदांसाठी कँशलेस मेडिक्लेम योजना सुरू करावी-सुनील सूर्यवंशी.


जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेने शिक्षक सभासद व त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी कॅशलेस मेडिक्लेम योजना सुरू करावी, अशी मागणी मागासवर्गीय प्राथमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील सूर्यवंशी यांनी बँकेला पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. सत्ताधारी संचालक मंडळाने याचा गांभीर्याने विचार करावा, असेही त्यात नमूद केले आहे.

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक ही शिक्षक सभासदांची कामधेनू मानली जाते. या बँकेच्या कर्जाची वसुली शंभर टक्के असून शिक्षकांच्या अडीअडचणीला केव्हाही उपयोगाला पडणारी बँक आहे .या बँकेचा सभासद असलेल्या आणि कर्जदार शिक्षकांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर वीस लाखापर्यंत कर्ज माफ केले जाते. पण या बँकेतून शिक्षकांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याची कोणत्याही प्रकारची काळजी शिक्षक बँक घेताना दिसत नाही . आज बाजारामध्ये अनेक कंपन्या कँशलेस मेडिक्लेमलच्या योजना राबवताना दिसत आहेत. पण त्यांचा मासिक व वार्षिक हप्ता न परवडणारा आहे.अशाच प्रकारची कँशलेस मेडीक्लेम योजना शिक्षक बँकेने राबवली. जेणेकरून मासिक व वार्षिक हप्ता खूपच कमी असेल.  शिवाय शिक्षक व त्यांच्या कुटुंबाला आजारपणामध्ये कँशलेस मेडिक्लेमचा फायदा  होईल. व शिक्षकांना 5 ते 10 लाख रूपयांचा मेडीक्लेम मिळवून देता येईल. त्यामुळे शिक्षक बँकेने शिक्षकांसाठी व त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी मेडिक्लेम योजना राबवावी, अशी मागणी मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील सूर्यवंशी व सांगली जिल्हा मागासवर्गीय शिक्षक संघटनेने केली आहे. 

Tuesday, November 17, 2020

भाजपा युवा मोर्चा जत तालुकाध्यक्षपदी एकुंडीचे बसवराज पाटील यांची निवड


जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-

 भारतीय जनता पार्टी(भाजप)ची जत तालुका कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या उपस्थितीत व माजी आमदार विलासराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच जाहीर करण्यात आली. पक्षाची पुढील वाटचाल व राजकीय समीकरणे याचा विचार करून अनेक सक्षम  व्यक्तींना या कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आले आहे.

भाजपामध्ये महत्त्व पूर्ण समजल्या जाणाऱ्या युवा मोर्चाचे तालुका अध्यक्षपदी एकुंडीचे सरपंच तथा जत तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष बसवराज पाटील यांची निवड झाली आहे.श्री. पाटील यांच्या रूपाने जत तालुक्यातील माजी आमदार विलासराव जगताप यांच्या कट्टर कार्यकर्त्याला पक्षाच्या कार्यकारणीत स्थान मिळाले आहे. संघटनेत अनेक वर्ष प्रभावीपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याला हे पद दिली गेल्याने तालुक्यातील युवकांत अतिशय उत्साहाचे वातावरण आहे.

या आधीच बसवराज पाटील हे एकुंडी ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच म्हणून कार्यरत आहेत, तसेच ते सरपंच परिषदेचे जत तालुका अध्यक्षसुद्धा आहेत. एक कार्यतत्पर  लोकप्रतिनिधी, जनतेशी नाळ जोडलेले युवा नेतृत्व, अभिनव पद्धतीने उपक्रम राबविण्याची कार्यशैली, अभ्यासू व्यक्तीमत्व उत्तम वक्ता, प्रभावीपणे विषयाची मांडणी करण्याचे कौशल्य अशी बसवराज पाटील यांची जनमानसात ओळख आहे.

बसवराज पाटील यांना याबाबत प्रतिक्रीया विचारली असता त्यांनी सांगितले की, हे पद म्हणजे बहुमान नसून एक जबाबदारी आहे आणि या माध्यमातून परिश्रम घेऊन तालुक्यातील युवकांचे प्रश्न सोडविण्याचे काम मी करणार आहे; तालुक्यातील गावोगावी भाजपा युवा मोर्चाचे शाखा काढणार असून या माध्यमातून जनतेची अडीअडचणी सोडवणार आहे तसेच माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्यावर  विश्वास ठेवून ही महत्त्वपूर्ण जबाबदारी दिल्याने जतचे माजी आमदार विलासराव जगताप, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराजबाबा देशमुख, तालुका अध्यक्ष सुनिल पवार व सर्वच वरीष्ठ नेत्यांचे आभार व्यक्त करीत असल्याचे ही त्यांनी सांगितले.

73 वा वार्षिक निरंकारी संत समागम सोहळा व्हर्च्युअल रूपात 5, 6 व 7 डिसेंबरला होणार

देश-विदेशातील निरंकारी भक्तगणांना व्हर्च्युअल समागमाची  प्रतीक्षा


जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-

 सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आशीर्वादाने या वर्षीचा 73 वा वार्षिक निरंकारी संत समागम व्हर्च्युअल रूपात दिनांक 5, 6 व 7 डिसेंबर, 2020 रोजी आयोजित करण्यात आला आहे. वैश्विक महामारी कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे भारत सरकारने जारी केलेली मार्गदर्शक तत्वे लक्षात घेऊन हा संत समागम व्हर्च्युअल रूपात आयोजित करण्यात येत आहे. जगभरातील लक्षावधी भाविक-भक्तगण घरबसल्या ऑनलाईनच्या माध्यमातून हा समागम पाहू शकणार आहेत.

निरंकारी मिशनच्या इतिहासात असे प्रथमच घडत आहे, की वार्षिक निरंकारी संत समागम व्हर्च्युअल रूपात आयोजित केला जात आहे. ही शुभ सूचना मिळाल्याने समस्त निरंकारी जगतामध्ये  हर्षोल्हासाचे वातावरण निर्माण झाले आहे. व्हर्च्युअल रुपातील या संपूर्ण समागमाच्या कार्यक्रमाचे प्रसारण मिशनच्या वेबसाईटवर दिनांक 5, 6 व 7 डिसेंबर, 2020 रोजी केले जाणार आहे. या व्यतिरिक्त हा समागम संस्कार टी.व्ही. चॅनल वर तिन्ही दिवशी सायंकाळी 5.30 ते रात्री 9.00 या वेळात प्रसारित करण्यात येईल.

माहीत  असावे, की भारताच्या फाळणीनंतर पहाड़गंज, दिल्ली येथे येऊन बाबा अवतारसिंहजी यांनी 1948 मध्ये संत निंरकारी मंडळाची स्थापना केली. सन 1948 मध्येच मिशनचा प्रथम निरंकारी संत समागम दिल्लीमध्ये संपन्न झाला. निर्मळ भक्तिभावनेचे हे रोपटे 91 वर्षांपूर्वी बाबा बूटासिंहजी यांनी लावले. बाबा अवतारसिंहजी यांनी त्या रोपट्याला सबुरी, संतुष्टी आणि गुरुमताचे पाणी शिंपून त्याचे रक्षण केले. बाबा गुरबचनसिंहजी यांनी सहनशीलता आणि विनम्रतेच्या बळावर त्याला वाढवले. बाबा हरदेवसिंहजी यांनी त्याचा प्रेम व बंधुभावाने ओत-प्रोत छायादार वृक्ष तयार केला.  त्यानंतर दिव्य गुणांच्या फुलांनी बहरलेल्या या बागेला आणखी सजवून सुगंधित करण्याची जबाबदारी सद्गुरु माता सविंदर हरदेवजी यांच्या खांद्यावर आल्यानंतर त्यांनीही ती लिलया निभावली. वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज तितक्याच ऊर्जेने व तन्मयतेने या मिशनला पुढे घेऊन जात आहेत.

या वर्षी निरंकारी समागमाचा मुख्य विषय ‘स्थिरता’ आहे. संत निरंकारी मिशन आध्यात्मिक जागृतीच्या माध्यमातून जगभरात सत्य, प्रेम, एकत्वाचा संदेश देत आहे. एका बाजुला प्रभु परमात्मा स्थिर आहे, अचल आहे तर दुसऱ्या बाजुला विश्वातील इतर सर्व गोष्टी गतिमान, अस्थिर व परिवर्तनशील आहेत. त्यामुळे स्थिर परमात्म्याशी नाते जोडूनच स्थिरता प्राप्त केली जाऊ शकते. वर्तमान काळातील आधुनिक परिवेशामध्ये हे जगत गतिमान होण्याबरोबरच कुठे ना कुठे अस्थिरही होत चालले आहे. अशा परिस्थितीत मानवी मनाला आध्यात्मिक रुपात स्थिर होण्याची नितांत गरज आहे.

सद्गुरू माता सुदीक्षाजी यांनी जीवनात स्थिरता धारण करण्याविषयी समजावताना म्हटले आहे, की  ज्या वृक्षाची मुळे मजबूत असतात तो नेहमी स्थिर राहतो. सोसाट्याचा वारा येवो किंवा वादळ येवो; जर त्या वृक्षाने आपल्या मुळांना घट्ट पकडलेले असेल तर तो स्थिर राहतो. अशाच प्रकारे ज्या मनुष्याने ब्रह्मज्ञान प्राप्त करुन आपले नाते या मूळ निराकार प्रभुशी जोडून ठेवलेले असेल तर त्याच्या जीवनात कशीही परिस्थिती आली तरी तो निराकार प्रभुचा आधार घेऊन स्थिरता प्राप्त करतो.

संत निरंकारी मिशन समाज सेवच्या कार्यामध्ये सदोदित अग्रगण्य राहिलेले आहे आणि त्याबद्दल प्रशंसेलाही पात्र बनलेले आहे. मिशनचे सर्व सामाजिक उपक्रम नियमितपणे संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून जनकल्याणासाठी राबविले जात आहेत. त्यामध्ये स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान यांच्या व्यतिरिक्त भूकंप, महापूर, सुनामी यांसारख्या नैसर्गिक आपत्तीने पीड़ित आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी मिशनकडून भरपूर योगदान दिले जात आहे.

कोविड-19 च्या वैश्विक महामारीच्या काळात संत निरंकारी मिशनने सरकारकडून दिलेल्या निर्देशांचे पालन करत सामाजिक अंतर ठेवणे व मास्कचा वापर करणे (मास्क वापरा निरंतर, ठेवा सामाजिक अंतर) समाजकल्याणाचे अनेक उपक्रम राबवले. यामध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन, गरजुंना जिवनावश्यक वस्तुंचे (रेशन) वाटप, निरंकारी सत्संग भवन क्वारंटाईन सेन्टर म्हणून प्रदान करणे इत्यादी विविध सेवांचा समावेश आहे. मिशनच्या वतीने प्रवासी शरणार्थी लोकांसाठी Shelter Homes (तात्पुरता निवारा) तयार करुन त्यामध्ये त्यांच्या राहण्याची तसेच चहापानाची उचित व्यवस्था करण्यात आली. याशिवाय संबंधित कार्यालयांमध्ये जाऊन मास्क तसेच सॅनिटायझरचे वितरण केले. या सेवा सातत्याने सुरु आहेत. देश-विदेशातील निरंकारी भक्तगण या व्हर्च्युअल समागमाची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहेत. वर्तमान परिस्थितीलाही ते प्रभु परमात्म्याचा आदेश मानून हसत हसत स्वीकारत आहेत.

Monday, November 16, 2020

दुःख व्यक्त करायचं की...


खूप खूप वर्षांपूर्वीची खरी घटना आहे. हरी नावाचा प्रसिद्ध आणि यशस्वी गोल्फ प्लेअर होता, त्याने एक चॅम्पिअनशिप जिंकली, त्यात त्याला एक हजार डॉलर्सचे बक्षीस मिळाले. आज विजेता झाल्यामुळे हॅरी खुशीत होता, गुणगुणत तो स्टेडिअममधुन बाहेर पडला आणि आपल्या कारच्या दिशेने चालत असताना एक महीला आपल्या चिमुकल्या बाळाला कडेवर घेऊन त्याच्या समोर येते. तिच्या चेहऱ्यावर प्रचंड आगतिकतेचे भाव असतात, ती गरीब दिसणारी स्त्री, दीनवाणे, केविलवाणे भाव आणून त्याला विनवते की ह्या मुलाला एक दुर्धर रोग आहे, आणि जर त्याचे उपचार झाले नाहीत, तर तो जास्त दिवस जगणार नाही, त्या मुलाच्या उपचारासाठी एक हजार डॉलर्सची आवश्यकता आहे. हॅरीला त्या मुलाकडे पाहुन दया येते, आणि कर्तव्यभावनेने तो तिला एक हजार डॉलर्सच्या रकमेचा चेक देतो. बघता बघता ही गोष्ट सगळ्या शहरात पसरते. हॅरीची एक महत्त्वाची मेंच असते आणि त्याच्या ओळखीचे लोक त्याला शुभेच्छा देण्यासाठी येतात. त्यातली त्याची एक ओळखीची व्यक्ती हरीला सांगते. हरी, तुला फसवलं गेलयं, मागच्या आठवड्यात, तू एका महिलेला एक हजार डॉलर्स देऊन फसला आहेस, तुला नाही. माहीतीये, मागच्या आठवड्यात शहरात कोणीही बाळ दगावलं नाही. हॅरीचा हसरा चेहरा अजुनच आनंदी झाला, थैक्स गोंड, मागच्या आठवड्यात शहरात कोणीही बाळ दगावलं नाही. आणि हसत हसत हॅरी त्याच्या पुढच्या गोल्फ मॅचसाठी मैदानाकडे गेला.गोष्ट संपली..

मित्रांनो, तुम्ही आम्ही जर हरीच्या जागेवर असलो असतो तर आम्ही कसा प्रतिसाद दिला असता? मला फसवलं गेलं, ही भावना आपल्याला किती त्रास देऊन गेली असती? मला मूर्ख बनवून. खोटं सांगून. एक हजार डॉलर्स लुबाडले. म्हणुन आपण किती चिडलो असतो? हॅरीने दिलेला प्रतिसाद किती वेगळा होता. धन्यवाद देवा, मागच्या आठवड्यात, शहरात कोणतंही बाळ दगावलं नाही. हॅरीसारखं हसत हसत, पुढची मॅच खेळायला आपल्याला जमलं असतं का? इथे मला असं अजिबात म्हणायचं नाही की आपण आपल्याला फसवणाऱ्यांकडे दुर्लक्ष करावे, पण अचानक उद्भवलेल्या परिस्थीतीला आपण हसत हसत सामोरे जाऊ शकतो. आयुष्यात रोज काहीनाकाही चांगल्या घटना घडत असतात, आणि वाईट ही घटना घडत असतात. आपण फोकस कशावर करतो, त्यावर आपल्या वाट्याला आनंद आणि दुःख येतं. एक हजार डॉलर्सचा फटका बसल्याचं दुःख व्यक्त करायचं की मागच्या आठवड्यात शहरात एकही बाळ दगावलं नाही. म्हणून आनंद व्यक्त करायचा, हे आपणचं ठरवायचं!

●●●●●●

*वाचा विनोद*

वडिल : अरे, एक काळ असा होता की, मी पाच रुपयांत किराणा सामान, दूध, पाव आणि बिस्कीट घेऊन यायचो.

मुलगा : आता ते शक्य नाही, बाबा. आता सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत.

*संकलन-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Sunday, November 15, 2020

जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी मुचंडीचे रमेश पाटील


जत,(जत न्यूज वृत्तसेवा)- 

जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी मुचंडीचे रमेश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गेली अनेक महिने तालुका अध्यक्ष निवडीचा प्रश्न रेंगाळला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयात जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत जत तालुक्यातील नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या. अॅड. चन्नाप्पा होतीकर यांनी जत तालुक्याच्या अध्यक्षपदासाठी रमेश पाटील यांच्या नावाची शिफारस केली तर सुरेश शिंदे यांनी अनुमोदन दिले. जिल्हाध्यक्ष अविनाश (काका) पाटील यांनी रमेश पाटील यांची तालुकाध्यक्ष व उत्तम चव्हाण याची जत तालुका कार्याध्यक्ष म्हणून निवड केली तर माजी तालुकाध्यक्ष अँड.बसवराज धोडमणी यांची जिल्हा कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी निवड केली.

जवळपास १५ वर्षे बिळूरचे अँड.बसवराज धोडमणी हे तालुकाध्यक्ष होते. त्यानंतर अलीकडेच सुरेश शिंदे यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर उत्तम चव्हाण हे तालुकाध्यक्ष झाले. आता तालुकाध्यक्ष पदासाठी उत्तम चव्हाण व उमदीचे अँड.चन्नाप्पा होर्तीकर यांच्या नावाची चर्चा होती. मात्र होर्तीकर यांनीच रमेश पाटील यांचे नाव सूचविल्याने राजकीय गणित समजू शकले नाही. मात्र राष्ट्रवादी पक्षात लिंगायत समाजाचे प्राबल्य वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Thursday, November 12, 2020

बेवणूर येथील मयत बाजीराव शिंदे यांच्या वारसांना आर्थिक मदत


तहसीलदार पाटील यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द

जत (जत न्यूज वृत्तसेवा)- 

जत तालुक्यातील बेवणूर येथिल विज पडून मृत्यु झालेल्या बाजीराव शिंदे यांच्या वारसांना प्रशासनाचे वतीने चार लाख रूपयांचा धनादेश तहसिलदार सचिन पाटील यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.

जत तालुक्यातील बेवणूर येथिल शेतकरी बाजीराव नारायण शिंदे यांचा वादळी वारे व पावसात विजेचा धक्का लागून मृत्यु झाला होता. नैसर्गिक आपत्तीत शिंदे कुटुंबियांचा कमावता व्यक्ती गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जतचे आमदार  विक्रमसिंह सावंत ,तहसीलदार सचिन पाटील व प्रशासकीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती ची पहाणी केली व विज पडून मृत्यु झालेल्या बाजीराव शिंदे यांच्या वारस पत्नी श्रीमती. सुसाबाई बाजीराव शिंदे यांना आज जत तहसिलदार कार्यालयात बोलावून घेऊन त्यांना  तहसिलदार सचिन पाटील यांच्या हस्ते चारलाख  रूपयांचा धनादेश प्रदान केला. यावेळी जतचे तहसिलदार सचिन पाटील यांच्यासह अव्वल कारकून नितीन शिंगाडे, कदम आदी उपस्थित होते.

डफळापूर शाळा क्र.2 चे शिष्यवृत्ती परीक्षेत यश


जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-

 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता-पाचवी व आठवी शिष्यवृत्तीची गुणवत्ता यादी गुरुवारी  दिनांक 12 नोव्हेंबर  रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. येथील जि.प.मुलींची शाळा नं 2, या शाळेतील विद्यार्थिनींने ह्या परीक्षेत सलग पाचव्यावर्षी उज्वल यश संपादन केले.उत्तम नियोजन व त्याप्रमाणे कार्यवाही यामुळेच शाळेचा निकाल ६४.२८ टक्के लागला आहे.  शाळेतील जिल्हा गुणवत्ता धारक  हफ्सा नौशाद तांबोळी (232) ही जिल्हा गुणवत्ता यादीत 149 वा क्रमांक तर तालुक्यात 6 वा क्रमांक ने यशस्वी झाली आहे. तिचे केंद्राचे केंद्र प्रमुख रतन जगताप व शंकर बेले, मुख्याध्यापिका रेखा कोरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोटू शिंदे,उपाध्यक्ष हणमंत कोळी  व सर्व एस.एम.सी सदस्य यांनी कौतूक केले. उदयोगरत्न संकपाळ, अलका पवार ,शंकर कुंभार, सुषमा चव्हाण,अजय डोंगरे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Wednesday, November 11, 2020

आपलं मार्केटिंग


मार्केटींग, सेल्स अवघड नाही... तो आपला जन्मजात गुण आहे स्वतःला ओळखा-१. लहानपणी आई बाबांकडे आग्रह करुन करुन चाॅकलेट, खेळणी मिळवली आहेत ?  २. शाळेत शिक्षकांसमोर नाटक करुन अर्ध्या दिवसाची सुट्टी मिळवली आहे ?  ३. काॅलेज मधे मस्तपैकी ड्रेस घालुन, स्टाईल मारुन छाप पाडलेली आहे ? ४. पालकांना कमी मार्क का पडलेत याचं समाधानकारक ऊत्तर दिलंय का कधी ? ५. एस.टी. बस मधून फिरताना अनोळखी लोकांशी कधी गप्पा मारल्यात ? ६. काॅलेज मधे ओरल एक्झाम देताना काहीही येत नसताना १५ मिनीटे एक्टरनल समोर ठामपणे कधी ऊभे राहीलात ?  ७. परिक्षेत काहीही येत नसताना तीन तास पेपर लिहीला आहे ? ८. एखाद्या कार्यक्रमात लोकांशी मोकळेपणाने गप्पा मरु शकताय ?  ९. कार्यक्रमात जाताना टाईट-फीट ड्रेसकोड मधे ऐटीत जाऊन लोकांचे लक्ष वेधुन घेण्याचे स्कील आहे?   १०. नविन काहितरी शिकण्याची वृत्ती आहे?  ११. ट्राय करायला काय जातंय, असा कधी विचार करता ?  १२. सर्वात महत्वाचे समोरच्याला तुमचे मत स्पष्टपणे सांगण्याची डेअरींग आहे ? आता लक्ष देऊन ऐका- यापैकी ३० टक्के प्रश्नांची ऊत्तरे "हो" असतील तर तुम्हाला मार्केटींग सुद्धा अवघड नाहीये... ही सगळी उदाहरणे मार्केटींगचीच आहेत. आणि वरिलपैकी एकही प्रश्नाचे उत्तर हो नसेल तरिही मार्केटींग अवघड नाही, फक्त शिकायला थोडा वेळ लागेल.  मार्केटींग, सेल्स म्हणजे वेगळ काही नसुन समोरच्याला आपलं प्रोडक्ट घेण्यासाठी कन्व्हींस करण्याची प्रोसेस आहे. यात एकदा रुळलं की ती एक‌‌ सवय होऊन जाते. सहज होणारी प्रक्रीया बनते. मार्केटींग, सेल्सचं‌ स्कील प्रत्येकात जन्मजात असतं. काही जणांना ते लवकर‌ गवसतं काहींना त्या फील्ड मधेच नसल्यामुळे गवसायला थोडा वेळ लागतो. पण हे स्कील प्रत्येकात थोडफार असतंच. मार्केटींग स्कील आपल्या रक्तात असतं, फक्त आपण ते ओळखलेलं नसतं. स्वतःलाओळखण्याची गरज आहे.  मार्केटींग अवघड‌ नक्कीच नाही, फक्त थोड्या प्रॅक्टीकल ज्ञानाची गरज आहे... पण त्यासाठी फील्ड वर प्रत्यक्षात उतरावं लागेल. मार्केटींग स्कील अनुभवाने समृद्ध होत असते. पुस्तकी ज्ञानाने किंवा कुणाचे लेक्चर ऐकुन मार्केटींग शिकता येत नाही. तुम्हाला प्रत्यक्ष व्यवसायात उतरावं लागेल, मगंच हे ज्ञान मिळू शकेल.

व्यवसाय अवघड नाही, शिकायला थोडा जड आहे...

त्यामुळे व्यवसाय साक्षर व्हा...  ऊद्योजक व्हा... समृद्ध व्हा...

●●●●●●●

कांहीं लोक इंग्रजीच्या उच्चाराचे 12 वाजवतात. कसे..... वाचा हा जोक.... असेही काहीं विद्यार्थी असतात कॉलेजात!

एक विदयार्थी (इंग्लिश टीचरला) : मॅडम, हे नटूरे म्हणजे काय...??? 

टीचर (प्रचंड टेंशन मध्ये) : नटूरे ....??? टीचर ला कांहीं त्या शब्दाचा अर्थ सांगता येईना.

(वेळ सावरून घेण्यासाठी) मी तुला नंतर सांगते माझ्या  ऑफिस मध्ये ये. हा तिथेही गेलाच. "सांगा ना मॅडम, नटूरे म्हणजे काय ते ......???"

टीचर : (अगदी घामाघुम) आता कायच करावं बुवा याला  "मी तूला उदया सांगु का.... ???"

टीचर रात्रभर परेशान!  डिक्शनरी शोध, इंटरनेट वर शोध, जिकडे तिकडे शोधाशोध ....प्रचंड त्रस्त ! दुसऱ्या दिवसी सुद्धा तेच, "मॅडम, नटूरे म्हणजे काय..... ???"

टीचर त्याला टाळायला लागली, हा दिसला की दुरून- दुरून जायला लागली. पण हा पठ्ठ्या पण काही पिच्छा सोडेना.

एक दिवस टीचर त्याला म्हणाली, " नटूरे हा शब्द तू विचारत आहे हा मराठी आहे का इंग्लिश ???

तो : इंग्लिश 

टीचर : स्पेलिंग सांग ..

तो : N-A-T-U-R-E

टीचरची अशी तळपायाची आग मस्तकाला गेली.

"हरामखोरा, आठवडाभर नुसता जिवाला घोर लावून ठेवला तू माझ्या जिवाला, या टेंशन मुळं उपाशी- तापाशी राहीले, रात्र-रात्र जागले. कुठेच असा शब्द सापडला नाही, आणि तू ...... मूर्ख कुठला...!!! नेचर ला नटूरे-नटूरे म्हणून परेशान करून सोडलं नुसतं, थांब तुला चांगली शिक्षा करते, कॉलेज मधून काढूनच टाकते"

तो : नाही हो मॅडम, तुमच्या पाया पडतो, आता पुन्हा नाही असं काही विचारणार मी.  प्लीज मला कॉलेज मधून काढू नका नाहीतर ... माझं  फुटूरे.....बर्बाद होईल.

फुटूरे....!( F-U-T-U-R-E)...... बर्बाद होईल हो. 

संकलन-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

प्रा.एम.बी.सज्जन यांना पीएचडी


जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-

जत येथील राजे रामराव महाविद्यालयातील प्रा. एम. बी.सज्जन यांना शिवाजी विद्यापीठाची प्राणीशास्त्र विषयातील पीएचडी जाहीर झाली आहे. 'डायव्हरसिटी ऑफ ॲम्फिबीयन्स फ्राॅम सांगली ॲंन्ड सोलापूर डिस्ट्रीक्ट (महाराष्ट्र)' हा त्यांच्या शोधप्रबंधाचा विषय होता. याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. प्रा. सज्जन जत येथील  राजे रामराव महाविद्यालयात गेली १७ वर्षं वरिष्ठ विभागाकडे प्राणीशास्त्र या विषयाचे अध्यापन करीत आहेत. त्यांना डॉ. बी.व्ही. जाधव, डॉ. आर.एन. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ. व्ही. एस. मन्ने, प्राचार्य डॉ. युवराज भोसले, प्राचार्य डॉ. मिलींद हुजरे, प्राचार्य डॉ. विठ्ठल ढेकळे, प्रा. महादेव करेन्नावर यांचे विशेष सहकार्य लाभले. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर चे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे व सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी गावडे यांनी समाधान व्यक्त केले. प्रा. सज्जन यांच्या यशाबद्दल ग्रामस्थ व मित्रपरिवारातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Tuesday, November 10, 2020

सुंदर विचार


कुणाच्या  सांगण्यावरून  आपल्या मनात  एखाद्या  व्यक्तीबाबत  चांगले  वा वाईट  मत  बनवण्यापेक्षा,  आपण  स्वत: चार  पावले  चालून  समोरासमोर  त्या व्यक्तीशी  संवाद  साधून  मगच  खात्री करा.

�  नाती  जपण्यासाठी  संवाद  आवश्यक आहे.  बोलताना  शब्दांची  उंची  वाढवा आवाजाची उंची नाही. कारण, पडणार्‍या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडाटामुळे नाही.

� वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं. डबक्यावर डास येतात आणि झर्‍यावर राजहंस! निवड आपली आहे.

� कुणा वाचून कुणाचे काहीच आडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.

� डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, अन् भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

�  जे  तुम्हाला  मदत  करायला  पुढे  सरसावतात  ते  तुमचे  काही  देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून...!

� मोर नाचताना सुद्धा रडतो... आणि... राजहंस मरताना सुद्धा गातो... दु:खाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही...आणि.... सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. यालाच जीवन म्हणतात.

� किती दिवसाचे आयुष्य असते? आजचे  अस्तित्व  उद्या  नसते,  मग  जगावे  ते  हसून-खेळून  कारण  या

जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहीत नाही.

� आयुष्यात कितीही चांगली कर्म करा कौतुक हे स्मशानातच होतं.

●●●●●●●

वाढत्या थंडीमुळे गुड मार्निंगचे मेसेज दुपारी 2.00 वाजेपर्यंत स्विकारले जातील.-अखिल   भारतीय   ग्रुप   अ‍ॅडमीनच्या मीटिंगमध्ये ठरलेला निर्णय.

●●●●●●●●

शब्द  मोफत  मिळतात  ‘पण’  त्यांच्या वापरावर  अवलंबून  असतं  की  त्यांची किंमत ‘मिळेल की’ किंमत ‘मोजावी लागेल’.

●●●●●●●●

प्रश्‍न : 1,000 पाने  लिहियला किती दिवस लागतात?

उत्तर - 

वकील : 5 वर्ष.

डॉक्टर : 1 वर्ष.

पायलट : 5 महिने.

लेखक : 3 महिने.

इंजिनीयर : सबमिशन कधी आहे

ते सांगाल एका रात्रीत लिहुन काढतात.

🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

*संकलन-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली*

Monday, November 2, 2020

जत तालुक्यातील सिंदूर येथे 51 लाखांचा गांजा जप्त

हळदीच्या पिकात गांजाची लागवड


जत, (जत न्यूज वृत्तसेवा)- 

जत तालुक्यातील सिंदूर येथे हळदीच्या शेतात पिकविलेला ५१ लाखांचा गांजा जत पोलिसांनी धाड टाकून जप्त केला असून याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. १५-२० वर्षानंतरची जत पोलिसांची ही मोठी कारवाई ठरली आहे. प्रभारी पोलिस अधिक्षक रविंद्र शिसवे असताना कोंतेवबोबलाद येथे अशीच मोठी कारवाई झाली होती. 

जत पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उत्तम जाधव  यांना खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की बसाप्पा खुशाबा आक्कीवाट रा. सिंदूर (ता.जत जि. सांगली) याने त्याच्या हळदीच्या पिकात गांजाची लागवडकेली  असल्याची खात्रीशीर बातमी मिळालेने याबाबत  वरीष्ठांना कळवून त्यांचे मार्गदर्शनाखाली छाप्याचे नियोजन केले. दोन शासकीय पंचासमक्ष तसेच पोलीस स्टाफसह बसाप्पा खुशाबा आक्कीवाट याच्या सिंदूर गावचे हद्दीतील जमीन गट नं.४२८ मध्ये असलेल्या हळदीचे पिकात छापा टाकला असता गांजाची ५ ते ६ फुट उंचीची झाडे मिळून आली. या सर्व गांजाचे झाडाचे वजन केले असता ते ५२० किलो भरले. सदर छाप्यामध्ये ५१ लाख ९३ हजार ३०० रूपये किंमतीची गांजाची झाडे वाढविलेल्या स्थितीत मिळून आली आहेत. याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी बसाप्पा खुशाबा

आक्कीवाट  यास ताब्यात घेतले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास हा उपविभागीय पोलीस अधिकारी (जत विभाग जत)  रत्नाकर नवले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उत्तम जाधव करीत आहेत.

ही कामगिरी  पोलीस अधिक्षक दीक्षीत गेडाम ,अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा दुवुले,उपविभागीय पोलीस अधिकारी  रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उत्तम जाधव, सपोनि मोहीते, पोहेकॉ वीर, पोना हाके, पोना थोरात, पोना मासाळ, पोना चव्हाण, पोना चव्हाण, पोना फकीर,मपोना मुजावर, पोकॉ शिंदे, पोकॉ खोत, पोकॉ माळी, अशांनी पार पाडली. जत पोलीस ठाणे हद्दीतील अशा प्रकारच्या अवैदय कृत्याविषयी कोणास माहीती असल्यास त्यांनी सदरची माहीती पोलीस ठाणेस दयावी. माहीती देणाऱ्याचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल, असे आवाहन जत पोलिसांनी केले आहे.

Sunday, November 1, 2020

संग्राम जगताप यांची भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड


जत, (जत न्यूज वृत्तसेवा)-

जत विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार विलासराव जगताप यांचे राजकीय वारसदार, त्यांचे नातू व युवा नेते संग्राम जगताप यांची भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नुकतीच  निवड करण्यात आली आहे. ही निवड भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केली आहे. या निवडीबद्दल संग्राम जगताप यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. प्रदेशाध्यक्ष पाटील हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता संग्राम जगताप यांची निवड जाहीर केली. 

जतच्या राजकारणातील किंगमेकर व भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी आमदार विलासराव जगताप यांचे संग्राम हे नातू आहेत. गेल्या काही वर्षापासून ते जगताप यांच्या सोबत राजकीय मैदानात सक्रीय आहेत. त्यांच्यावर भाजपा नेत्यानी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी टाकली आहे. जत तालुक्यात भाजपचे कार्य युवकांबरोबर सामान्य जनतेपर्यंत पोहचवून पक्ष मजबूत करण्यासाठी माझे प्रयत्न राहतील,असे यावेळी बोलताना संग्राम जगताप म्हणाले.

Thursday, October 29, 2020

29 ऑक्टोबर 2020 चा शासन निर्णय तातडीने मागे घ्या आमदार कपिल पाटील व शिक्षक भारतीची मागणी


मुंबई,(जत न्यूज वृत्तसेवा)-

राज्यातील शाळांमध्ये 50 टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहण्याबाबत मार्गदर्शक सुचना देणारा दि. 29 ऑक्टोबर 2020 चा शासन निर्णय संदिग्ध व अनाकलनीय आहे. राज्यातील शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था दि. 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत विद्यार्थ्यांसाठी व नियमित वर्ग घेण्यासाठी बंद राहतील अशा सूचना शासन निर्णयात दिलेल्या असून 1 नोव्हेंबर पासून शाळा उघडणार का असा प्रश्न राज्यातील शैक्षणिक संस्था व मुख्याध्यापकांना पडला आहे. व्हॅक्सीन आल्याशिवाय शाळा, महाविद्यालय उघडू नये अशी मागणी पालकांकडून होत असतांना 50 टक्के शिक्षक, शिक्षकेतरांना शाळेत उपस्थित राहण्याची सक्ती करणारा शासन निर्णय तातडीने मागे घ्या अशी मागणी आमदार कपिल पाटील व शिक्षक भारतीने केली आहे, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली.

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये शिक्षक शिक्षकेतरांना प्रवेश देण्यापूर्वी शाळांचे निर्जंतुकीकरण करणे, हँडवॉश, सॅनिटायझर उपलब्ध करून देणे, सहा फुट अंतर ठेवणे, 3 ते 4 तासानंतर सॅनिटायझेशन करणे, शाळेत प्रवेश करतांना थरमल स्कॅनरने तापमान तपासणे, अध्यापन साहित्य, संगणक, लॅपटॉप, प्रिंटर या उपकरणांचे 70 टक्के अल्कोहल वाईफने निर्जंतुकीकरण इत्यादी बाबींचा समावेश केला आहे. या संपूर्ण  व्यवस्थेसाठी शैक्षणिक संस्थाना किमान 25 हजार ते 1 लाखापर्यंत खर्च येणार आहे. त्याची कोणतीही आर्थिक मदत शासनाने जाहीर केलेली नाही. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीच्या प्रमुखांची परवानगी न घेता शाळा सुरु करणे म्हणजे लहान मुलांच्या आयुष्याशी खेळ केल्यासारखे होईल. शासनाने विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना व्हॅक्सीन दिल्याशिवाय बोलावू नये. अशी मागणी केली आहे.


बँकांनी प्रलंबित कर्ज प्रकरणांचा तात्काळ निपटारा करावा- जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी


सांगली,(जत न्यूज वृत्तसेवा)-

 बँकांनी पीककर्जासाठी संवेदनशिलपणे व सुलभतेने कर्ज वितरण करावे. स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. विविध योजनेंतर्गत जी कर्ज प्रकरणे मंजुर झाली आहेत अशांना लवकरात लवकर वित्त पुरवठा करावा व जी कर्ज प्रकरणे प्रलंबित आहेत त्यांचा तात्काळ निपटारा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.

जिल्हास्तरीय पुनर्विलोकन सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राजेंद्र यादव, नाबार्डचे श्री. धानोरकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दिपक चव्हाण, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नितीन कोळेकर, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी श्री. बिळगी यांच्यासह विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

यावर्षी खरीपासाठी 1 हजार 497 कोटी 50 लाख रुपयांचे तर रब्बीसाठी 1 हजार 97 कोटी 50 लाख रुपयांचे पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट आहे. एप्रिल ते सप्टेंबर अखेर खरीपासाठी 1 लाख 70 हजार 15 खातेदारांना 1387 कोटी 77 लाख रुपयांचे पीककर्ज वितरण करण्यात आले. खरीप हंगामासाठी पीककर्ज वितरणाची 93 टक्के उद्दिष्टपूर्ती झाली असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

यावेळी नाबार्डच्या वतीने तयार करण्यात आलेल्या सांगली जिल्ह्याच्या सन 2021-22 करीता संभाव्य वित्त पुरवठा आराखडा पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले. सन 2021-22 करीता सांगली जिल्ह्याचा संभाव्य वित्त पुरवठा आराखडा 7115 कोटी 19 लाख रूपयांचा असून यामध्ये प्रामुख्याने शेती / शेतीपुरक क्षेत्रासाठी 4882 कोटी 55 लाख रूपये, सुक्ष्म/लघु/मध्यम उद्योगासाठी 1434 कोटी 30 लाख रूपये आणि इतर प्राथमिक क्षेत्रासाठी 834 कोटी 34 लाख रूपये प्रस्तावित केले आहेत. शेती/शेतीपुरक क्षेत्रामध्ये प्रामुख्याने पिक कर्जासाठी 3200 कोटी 29 लाख, सिंचनासाठी 448 कोटी 52 लाख रूपये, शेती यांत्रिकीकरणासाठी 349 कोटी 47 लाख, मत्स्य, कुक्कुटपालन, पशुपालन आणि दुग्ध व्यवसायासाठी 343 कोटी 40 लाख रूपये, गोदामे/शीतगृहासाठी 56 कोटी 99 लाख रूपये, भुविकास/जमीन सुधारणा 46 कोटी 78 लाख रूपये, शेती माल प्रक्रिया उद्योगासाठी 62 कोटी 60 लाख रूपये, इतर प्राथमिक क्षेत्रामध्ये प्रामुख्याने गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज तसेच जे एल जी/महिला बचत गटासाठी वित्त पुरवठा प्रस्तावित करण्यात आला आहे. या वित्त आराखड्याचा उपयोग अग्रणी बँकेला जिल्ह्यासाठी वार्षिक पत धोरण निश्चित करण्यासाठी तसेच बँकांना वित्त पुरवठ्यासाठी असणारे संभावित क्षेत्र याची माहिती घेण्यासाठी होणार आहे. या बैठकीत विविध प्राधान्यक्रम योजना व महामंडळांकडील योजनांचा आढावाही घेण्यात आला.

Saturday, October 24, 2020

राजे रामराव महाविद्यालयात श्रीमती सुशिलादेवी साळुंखे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

 


जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-

श्री स्वामी विवेकानंद  शिक्षण संस्था  कोल्हापूर या संस्थेच्या संस्थामाता श्रीमती सुशिलादेवी  साळुंखे  यांच्या  पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य  डाॅ. व्ही.एस. ढेकळे यांनी संस्थामाता श्रीमती सुशिलादेवी साळुंखे  यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून  अभिवादन केले. यानिमित्ताने प्राचार्य डॉ.ढेकळे यांनी संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या  जीवनातील विविध प्रसंग सांगितले.  ते आपल्या  भाषणात  म्हणाले, शिक्षणमहर्षी डाॅ. बाबूजी साळुंखे यांच्या  ज्ञानयज्ञात त्यांचा  प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष  मोलाचा वाटा आहे. त्यांनी बापूजीच्यां देशसेवेच्या कार्यालाही भुमिगतांना  एक महिना  जेवण देऊन हातभार लावला.तसेच बहुजन समाजाला सुसंस्कारी करण्याचा वसा घेतलेल्या  बापूजीचा दौरा  असे तेव्हा  कोणतीही  प्रापंचिक  अडचण त्या खंबीरपणे सोडवित. त्यामुळे  बापूजींनी ज्ञानगंगा खेड्यापाड्यातील  घरापर्यंत  पोहोचवली. त्यांनी  प्रतिकूल  परिस्थितीतही बापूजींना समर्थसाथ दिली म्हणूनच आज आपण या ज्ञान मंदिरात  अखंड ज्ञानदानाचे काम करीत आहोत. आज आपण त्यांच्या कार्याच्या प्रेरणेतून प्रेरित होऊन सत्य, शील, प्रामाणिकता, त्याग ,पिळवणुकीस आळा या पंचसूत्रीचे आचरण करूया हीच आपल्या संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांना आदरांजली असेल. तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक  विभागप्रमुख  प्रा.ए. एच. बोगुलवार यांनी केले. तर आभार प्रा.डॉ.बी एम डहाळके यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ. शिवाजी कुलाळ, प्रा.एस. एस. चव्हाण,प्रा.एम. एच.करेनवार, प्रा. के. के.रानगर, तसेच सांस्कृतीक विभागातील सदस्य प्रा. सौ. एन. व्ही. मोरे,प्रा.एम. बी.सज्जन, प्रा.एच. डी. टोगरे, प्रा.पी. जे. चौधरी व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.

जत येथील राजे रामराव महाविद्यालयाला विविध कौशल्याधिष्टीत अभ्यासक्रमांना मंजुरी


जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-

एन. एस. क्यू. एफ अंतर्गत विद्यापीठ अनुदान आयोग (यु.जी.सी.) यांच्याकडून जत येथील राजे रामराव महाविद्यालयाला कौशल्याधिष्टीत पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रमांना मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही. एस.ढेकळे यांनी दिली.
कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत-
1) Physics- Instrumentation:self Cleaning Solar Cell Panels
2) Commerce-  Office Automation&E- commerce
3) Chemistry - Soil,Water Analysis &Management
4) Botany- Identification Cultivation and Conservation of  Medicinal Plants.
5) Zoology-Medical  Laboratory Techniques
या अभ्यासक्रमांना गरजू विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढेकळे यांनी केले आहे.  अधिक माहितीसाठी कोर्सचे नोडल ऑफिसर प्रा. जी. डी. साळुंके, रसायनशास्त्र विभाग यांचेशी संपर्क साधावा.
मोबाईल नंबर - ०९६६५५८९०६३

Friday, October 23, 2020

सातारा जिल्ह्यातील उपळावी येथील अल्पवयीन मुलीच्या हत्येची चौकशी करावी


होलार समाज संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-

सातारा जिल्ह्यातील उपळावी (ता.फलटण) येथील कु. अक्षदा देवीदास ऐवळे या अल्पवयीन मुलीच्या हत्येची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय होलार समाज  संघटनेचे (ए गट) चे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब नामदेव गेजगे यांनी जत तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

जतचे तहसीलदार यांना दिलेल्या  निवेदनात म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यातील उपळावी (ता. फलटण) येथील कु. अक्षदा देवीदास ऐवळे या होलार समाजातील अल्पवयीन मुलीची गावातील काही नराधमानी अत्याचार करून अमानुषपणे हत्या केली व नंतर तिचा मृतदेह विहीरीत फेकून दिला. ही घटना माणूसकीला काळीमा फासणारी अत्यंत  संतापजनक आणि  दुदैवी घटना आहे. या घटनेची सखोल उच्च स्तरीय चौकशी करून नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहीजे. सदर खटल्यासाठी सरकारी वकिल म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी तसेच पिडीत कुटूंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे व लवकर न्याय न मिळाल्यास संघटनेच्यावतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब ऐवळे, राजाराम जावीर, सतीश गेजगे, दिनकर पतंगे, प्रकाश देवकुळे यांच्या सह्या आहेत. 

Monday, October 19, 2020

जिल्ह्यातील सर्व गावातील आठवडा बाजार सुरू करा


जनसेवा संघटनेचे अध्यक्ष शंभोराज काटकर यांचे आवाहन

सांगली,(जत न्यूज वृत्तसेवा)-

सांगली, मिरज, कुपवाड शहरांप्रमाणे जिल्ह्यातील नगर पालिका आणि सर्व गावातील आठवडा बाजार सुरू करण्यात यावेत. स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी आणि प्रशासनाने सहकार्य करावे असे आवाहन जनसेवा फळे भाजीपाला आणि खाद्यपेय विक्रेता संघाचे अध्यक्ष शंभोराज काटकर यांनी केले आहे.

    श्री. काटकर यांनी पत्रकात म्हटले आहे की, जनसेवा संघटनेच्या पाठपुराव्याला प्रतिसाद देत मुख्यमंत्री उध्दव जी ठाकरे यांनी राज्यातील सर्व आठवडा बाजार सुरू करण्यास परवानगी दिली आहे.  जिल्ह्यातील सलगरे, माधवनगर आणि बुधगाव या बरोबरच जिल्ह्यातील काही बाजार तेथील गावचे व्यापारी, शेतकरी आणि सरपंच यांच्यासह सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी यांनी अत्यंत गतीने निर्णय घेऊन बाजार सुरू केले. त्यामुळे परिसरातील शेतमाल विक्रीची सोय झाली. जनतेला गेले सात महिने न मिळालेल्या अत्यावश्यक वस्तू सहज उपलब्ध झाल्या. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील अर्थचाके गतिमान होण्यास मदत होणार आहे. सध्या बाजारात भाजीपाल्याची टंचाई आहे. पावसामुळे शेतमाल बाहेर काढता येत नाही.  त्यामुळे दर वाढलेले आहेत. शेतकरी आपला भाजीपाला बाजारात आणून शकले तर त्यांचा आर्थिक भारही हलका होणार आहे. त्यामुळे बाजार सुरू होणे ही शहर आणि ग्रामीण भागाची गरज आहे. गावोगावच्या भाजिपला विक्रेत्यांना व्यवसाय पुन्हा सुरळीत करण्यासाठी दहा हजाराचे कर्ज सरकार देत आहे. त्यामुळे हे व्यापारीही पुन्हा उभे राहणार आहेत. याचा विचार करून मोठ्या नगर पालिका नगर पंचायती आणि ग्राम पंचायतीने तातडीने बाजार सुरू करावेत. कर्जासाठी भाजीपाला विक्रेते आणि व्यापाऱ्यांनी संघटनेशी 9970555570 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन ही जनसेवा संघटनेचे अध्यक्ष शंभोराज काटकर यांनी केले आहे.

Tuesday, October 13, 2020

अतिवृष्टी कालावधीत नागरिकांनी दक्षता घ्यावी - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी 1077 टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा

सांगली,(जत न्यूज वृत्तसेवा)-

आंध्रप्रदेशच्या उत्तर किनारपट्टीवर निर्माण झालेला तीव्र कमी दाबाचा पट्टा हा तेलंगणा राज्यातील खम्माम व आंध्रप्रदेश येथील काकीनाडा किनारपट्टीवर प्रवेश करणार आहे. या परिस्थितीमुळे दिनांक 13 ते 14 ऑक्टोबर 2020 या कालावधीत पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार मध्य महाराष्ट्रामध्ये दि. 13 ऑक्टोबर रोजी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस व दि. 14 ऑक्टोबर रोजी अत्यंत मुसळधार पाऊसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अतिवृष्टीच्या कालावधीत सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

 मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे. घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. पाऊस पडत असताना, विजा चमकत असल्यास नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये. मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रीक वस्तूपासून दूर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा. मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन स्थितीमध्ये मदतीसाठी 1077 या टोल फ्री आपत्ती व्यवस्थापन क्रमांकावर संपर्क साधावा. कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये व अफवा पसरवू नये. कुठल्याही अशा मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सुत्राकडून करून घ्यावी. अतिवृष्टी होत असताना कोणीही नदी नाला इत्यादी ठिकाणी प्रवेश करू नये. पूराच्या पाण्यात नागरिकांनी सेल्फी काढू नये. DAMINI Lighetening Alert हे ॲप आपल्या क्षेत्रात पडणाऱ्या आगाऊ वीजपडीची माहिती देते. तसेच वीजपडीपासून संरक्षण करावयाच्या उपाय योजनांची माहिती देते. तरी हे ॲप प्ले स्टोर वरून डाऊनलोक करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या आहेत.


Monday, October 12, 2020

डफळापूर येथील जि. प. शाळा क्र.2 मधील विद्यार्थिनींचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश


डफळापूर,(जत न्यूज वृत्तसेवा)-

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च माध्यमिक (इयत्ता-पाचवी ) शिष्यवृत्ती व पूर्व माध्यमिक (इयत्ता-आठवी ) शिष्यवृत्तीचा निकाल नुकताच ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यात जत तालुक्यातील डफळापूर येथील जिल्हा परिषद मुलींची शाळा नं 2 मधील विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामुळे त्यांचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.  विशेष म्हणजे या शाळेतील विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती परीक्षेत सलग पाचव्या वर्षी उज्ज्वल यश संपादन केले. उत्तम नियोजन व त्याप्रमाणे कार्यवाही यामुळेच शाळेचा निकाल 65 टक्के लागला आहे व केंद्रातील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थीनाही याच शाळेतील आहेत, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिकांनी दिली. शाळेतील यशस्वी मुलींची नावे अशी: कु. हाफ्सा नौशाद तांबोळी (232), कु. अनुष्का अजितराव माने (176), कु. तमन्ना अरमान तडवी (176), कु. तृप्ती राजू शिंदे(160), कु. चेतना लक्ष्मण केंगर (154), कु. हर्षता शहाजी पाटोळे (148), कु. ऋतुजा प्रशांत माने (136), कु. साक्षी बाळासाहेब माने (126), कु.लक्ष्मी श्रीकांत कोष्टी (124).यशस्वी मुलींचे डफळापूर केंद्राचे केंद्रप्रमुख रतन जगताप व शंकर बेले, मुख्याध्यापिका रेखा कोरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोटू शिंदे, उपाध्यक्ष हणमंत कोळी  व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी कौतुक केले. शाळेतील शिक्षक उदयोगरत्न संकपाळ, अलका पवार ,शंकर कुंभार, सुषमा चव्हाण, अजय डोंगरे यांचे विद्यार्थिनींना मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थिनींचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Friday, October 9, 2020

मुलानेच केला बापाचा खून; जत तालुक्यातील बिळूर येथील घटना


जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-

 मुलानेच आपल्या जन्मदात्या बापाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना जत तालुक्यातील बिळूर येथे गुरुवारी रात्री उशिरा घडली. भीमू सत्याप्पा जामगोंड (वय 83) असे मयताचे नाव आहे. तर  सदाशिव भीमु जामगोंड (रा. बिळूर वय-35) असे खून करणाऱ्या मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे जत तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मयताच्या मुलीला सोन्याची अंगठी कुणाला विचारून दिली या कारणावरून घरात बाप आणि मुलामध्ये वादावादी सुरू झाली याचे पर्यवसान भांडणात झाले. शेवटी रागाच्या भरात मुलाने जन्मदात्या बापाचा दगडाने ठेचून खून केला. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात मयताची मुलगी महानंदा राजेन्द्र कोरे (रा. बेडग, ता. मिरज) हिने फिर्याद दिली आहे. आरोपीला जत पोलिसांनी अटक केली असून आधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद कांबळे करीत आहेत.

कंठी येथील धनाजी नामदेव मोटे याचा अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून व डोके दगडाने ठेचून निघृनपणे खून

एका संशयित आरोपीला पोलिसांनी चौकशीसाठी घेतलं ताब्यात


जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-

पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार व गुंड धनाजी नामदेव मोटे (वय 45 , रा. कंठी, ता. जत) याचा अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून व डोके दगडाने ठेचून निघृनपणे खून केल्याची  धक्कादायक घटना घडली आहे.जत तालुक्यातील कंठी येथे गुरूवारी मध्यरात्री मरगुबाई देवीच्या मंदिराजवळ ही घटना घडली. खूनाचे नेमके कारण समजू शकले नाही.

या घटनेनंतर मारेकरी फरार झाले होते. त्याचा शोध घेतला असता एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले.दरम्यान  जत पोलिस पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, धनाजी मोटे हा हत्यारांची तस्करी, यासह अनेक गुन्हे जत पोलिस ठाण्यात दाखल आहेत.तसेच सांगली शहर पोलिसात ही त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. गुरूवारी मध्यरात्री एकच्या  सुमारास धनाजी मोटे यांचा अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून व डोक्‍यात दगड घालून निघृनपणे खून केला. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली होती. 

दरम्यान, शुक्रवारी पहाटे घटनास्थळी मृतदेहाजवळ दुचाकी व बंदुकीच्या गोळ्या आढळून आल्या आहेत. तर जत उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले, पोलिस निरीक्षक उत्तम जाधव ,पोलीस नाईक केरबा जाधव,प्रशांत गुरव,प्रवीण पाटील व  सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. तपासाची चक्रे फिरवत जत पोलिसांकडून एका संशयित आरोपीला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतल आहे.तर अन्य आरोपींच्या शोधात जत पोलिसांची तीन पथके तर  स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखांची पथके  रवाना केली आहेत.

Monday, October 5, 2020

कोरोना काळात अहोरात्र झटणाऱ्या आशा सेविकांना प्रोत्साहन भत्ता देण्याचा जत नगरपरिषदेचा निर्णय


जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-

जत शहरात कोरोना संसर्ग वाढला असताना ही अशा परिस्थितीत आशा सेविका आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र आपले काम करत आहेत. त्यांना मागणीनुसार प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय जत नगरपरिषदेने घेतला आहे. त्यामुळे आज (सोमवारी) होणारे आंदोलन स्थगित करण्यात आले. ही माहिती कॉ. हणमंत कोळी यांनी दिली.

सोमवार दि. 5 ऑक्टोबर रोजी जत नगरपरिषद समोर आशा सेविका यांच्या प्रोत्साहन भत्त्या संदर्भात धरणे आंदोलनाला बसण्यात येणार होते  पण नगरपरिषदेने संघटनेच्या पदाधिकारी यांना बैठकी साठी बोलावले होते. या बैठकीच्या चर्चातून जत शहरातील 33 आशा सेविका यांना कोरोनाच्या काळामध्ये अहोरात्र काम करत असल्याबद्दल नगरपरिषद कडून आशा वर्कर्स यांना प्रोत्साहन भत्ता देण्याचे मंजूर केले आहे व जोपर्यंत कोरोना आहे तोपर्यंत आशांना प्रोत्साहन भत्ता देण्याचे ठरले आहे या मिटिंग साठी नगरपरिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. देसाई ,उपनगराध्यक्ष आप्पा पवार ,नगरसेवक स्वप्नील शिंदे , निलेश बामणे ,आशा व गटप्रवर्तक संघटनेचे जिल्हा संघटक कॉ हणमंत कोळी  , आशा वर्कर्स ,ललिता सांवत, लता मदने, रेश्मा शेख ,व इतर अनेक आशा वर्कर्स या उपस्थित होत्या.

Thursday, October 1, 2020

दरवाढ करार झाल्याशिवाय मजूर ऊसतोड करणार नाहीत-आमदार पडळकर


जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-

 'नवीन दरवाढीचा करार मान्य होईपर्यंत राज्यातील ऊस तोड मजूर ऊस तोडणीसाठी जाणार नाहीत', असा इशारा माजी मंत्री सुरेश धस आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत तालुक्यातील संख येथे दिला.

 जत तालुक्यातील संख येथील संत बागडे बाबा मंगल कार्यालयात उसतोड मजूर व ऊस तोड मजुरांच्या आंदोलनाची घोषणा आणि सुरुवात करण्यात आली यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार गोपीचंद पडळकर, चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज, जि. प. सभापती तम्मन्नगौडा रवी-पाटील, आजिंक्यतारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकर जाधव, काम्माण्णा बंडगर, बिळूरचे लक्ष्मण जखगोंड यांच्यासह आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना धस म्हणाले राज्यातील ऊस तोड मजूर, वाहतूकदार आणि मुकादम संघटनांचा करार संपला आहे. नवीन दरवाढीचा करार करण्याकडे राज्य सरकार आणि साखर कारखानदारांनी दुर्लक्ष केले आहे, असा आरोप करत धस आणि पडळकरांनी आंदोलनाची घोषणा केली. सुरेश धस यांनी ऊस तोड मजूर, मुकादम आणि वाहतूकदार यांच्या प्रश्नावरुन राज्य सरकार आणि साखर संघाला इशारा दिला. सध्या अधिवेशन सुरु नसले तरी सरकारने कायदा करण्याची तयारी सुरु करावी. आम्ही राज्य सरकारला मदत करु, असे धस म्हणाले. ऊस तोडणी मजुरांचा करार २०१४ ला झाला होता. त्याला आता सहा वर्षे झाली आहेत. त्यावेळची परिस्थिती दुष्काळी होती. यापुढे दर तीन वर्षांनी करार करण्यात यावेत अशी मागणी धस यांनी केली. ऊस तोडणीच्या दरात १५० टक्के वाढ करावी, अशी मागणी धस यांनी केली. ऊस वाहतूकदार यांचाही प्रश्न गंभीर आहे.

डिझेल ५२ रुपये प्रतिलिटर होते त्यावेळच्या दरात ऊस वाहतूक करावी लागते. डिझेलचे प्रतिलिटर दर ८२रुपयांवर गेले आहेत. त्यांचाही प्रश्न सोडवण्याची मागणी धस यांनी केली.ऊस तोड मजूर, मुकादम आणि वाहतूकदारांच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, सुरेश धस यांच्या सूचने नुसार आंदोलन करण्यात येत आहे. सरकारने या प्रश्नाची दखल न घेतल्यास दि. 5 ओक्टोंबर पासून राज्यव्यापी आंदोलन तीव्र करण्यात येईल. ऊसतोड मजुरांना न्याय मिळाला पाहिजे. ऊसतोडणीच्या कामासाठी आल्यानंतर अनेक मजुरांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे मजुरांचा आणि बैलांचा विमा उतरवण्यात यावा, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.Monday, September 28, 2020

रामपूर किल्ल्याची किल्लाप्रेमींकडून स्वच्छता


जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-

जतपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर पूर्वेला सांगली मार्गावर  शिवकालीन  रामदुर्ग किल्ला आहे. त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. सध्या इथे झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेली होती.  रामदुर्गटीम  व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या कार्यकऱयांच्यावतीने  किल्ल्याची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. झाडे-झुडपे हटवण्यात आली आहेत. याला रामपूर ग्रामपंचायतीनेही मोठ्या प्रमाणात साथ दिली.

जतपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर शिवकालीन रामदुर्ग किल्ला आहे. येथे राबवण्यात आलेल्या  स्वछता मोहिमेदरम्यान गडावर वाढलेली अनावश्यक झाडे काढण्यात आली. तसेच गडावरील प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला.गडावरील महादेवाची पूजा करून व ध्येय मंत्र म्हणून कामाची सुरुवात करण्यात आली. त्याच बरोबर मंदिराच्या मधील दडपल्यागेलेल्या गोमुखास मोकळा श्वास देण्यात आला.यावेळी सांगलीमधून टीम रामदुर्ग चे स्वप्नील भजनाईक,गणेश घम,हेमंत खैरमोडे तसेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान जत शाखेचे धारकरी सिद्धगोंडा पाटील, ग्रामपंचायत रामपूर चे माजी सरपंच.मारुती पवार ,सरपंच रखमाबाई कोळेकर,तानाजी कोळेकर, सामाजिक कार्यकर्ते मनोहर शिंदे,प्रमोद शिंदे,प्रशांत शिंदे,टीम किल्ले रामदुर्ग चे मावळे व रामपूर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.यआ सगळ्यांनी मिळून गडाची स्वच्छता केली. 


Saturday, September 26, 2020

तुबची-बबलेश्वर योजनेचे पाणी जतच्या पूर्वभागात दाखल- आमदार सावंत


जत, (जत न्यूज वृत्तसेवा)- 

कर्नाटकातील तुबची- बबलेश्वर योजनेचे पाणी जत तालुक्यात कधीच येणार नाही, अशी वल्गना करणाऱ्या विरोधकांना पाणी आल्याने चाप बसला आहे, असे प्रतिपादन आ. विक्रम सावंत यांनी जत तालुक्यातील भिवर्गी येथे बोलताना केले. 

जत पुर्व भागातील भिवर्गी तलाव व करजगी बंधाऱ्यांतील पाण्याचे पुजन आमदार विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. आ.सांवत म्हणाले,आ. सावंत म्हणाले, जत पुर्व भागात कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर योजनेतून आलेले हे पाणी या भागातील शेतीचा कायापालट करून जनतेला समृध्द करू. मी विधानसभा निवडणूकीच्या पुर्वीपासून या योजनेतून पाणी यावे, यासाठी प्रयत्न करत होतो. निवडणूकीतही या भागाचा या योजनेतून पाणी आणून कायापालट करण्याचे आश्वासन दिले होते. आज त्यांची पुर्तता झाली आहे.मला माझ्या तालुक्यातील जनता सुखी,समृद्ध व्हावी यासाठी काम करायचे आहे. पाणी,रस्ते,विज,अशा मूलभूत सुविधा मुबलक उपलब्ध झाल्या पाहिजेत, शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ माझ्या तालुक्यातील जनतेला झाला पाहिजे, यासाठी मी पुढेही काम करणार आहे,असेही आ.सांवत म्हणाले.

पाण्याचे पुजन करून आ.सांवत यांनी या तलावाचा कॅनॉल दरवाजे उचलून कार्यान्वित केला.त्यामुळे करजगी,बेळोंडगी, बोर्गी, बालगाव, हळ्ळी, सोनलगी, सुसलाद ते पुढे कर्नाटकातील चडचण पर्यंत पाणी पोहचविण्यात येणार आहे.

यावेळी माजी सभापती बाबासाहेब कोडग, संतोष पाटील,मार्केट कमिटी संचालक संजय सांवत,पाटबंधारे विभागाचे अधिकारी श्री.मोरे,शेख,करजगीचे कॉग्रेस नेते डॉ.बशीर,संरपच सायबपाशा बिराजदार,सुभाष बालगाव,श्रीमंत आवटी, नबी जागीरदार,साहेबांना ककमरी, ज्ञानेश्वर बमनाली,आदी मान्यवर उपस्थित होते.

जत तालुक्यात लवकरच कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून मोफत मार्गदर्शन व कोरोना उपचार केंद्र सुरू करणार : दिनकर पतंगे


जत,(जत न्यूज वृत्तसेवा)- 

जत तालुक्यात सध्या कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता लायन्स क्लब जत, नरेश फाऊंडेशन आणि पतंजली योगा समिती (जत) च्या वतीने लवकरच जत, उमदी, माडग्याळ येथे रूग्णांना उपचारासाठी मोफत मार्गदर्शन केंद्र सुरू करणार असल्याचे लायन्स क्लब झोन चेअरमन दिनकर पतंगे यांनी सांगितले. 

या तीन ठिकाणी विविध प्रकारच्या तज्ञ डॉक्टरांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात अॅलिवोपॅथिक, अॅक्युपेशन,निसर्ग उपचार तज्ञ, होमिओपॅथी, अशा अनेक प्रकारच्या डॉक्टरचा यात समावेश करण्यात आला आहे. यामध्ये जतमधील प्रसिद्ध डॉ रविंद्र आरळी, डाॅ.नितिन पतंगे,डाॅ.सौ.प्रगती पतंगे, डॉ. सुभाष मालाणी, डॉ. सार्थक हिट्टी,डाॅ.मुलचंदाणी,योगा तज्ञ आर जी माळी, योगा शिक्षिका घोडके, योगा शिक्षक दिनकर पतंगे आणि डाॅ. हत्तळी अशा तज्ञ  डॉक्टरांचा यात समावेश आहे.त्यासोबत कोरोना योध्दा सामाजिक कार्यकर्ते राजेन्द्र आरळी ,कोरोना योध्दा सामाजिक कार्यकर्ते सहदेव उर्फ एम जगदीश माळी सर व कोरोना योध्दा सन्मानित राजू सावंत यांचाही यात समावेश करण्यात आला आहे. तर अशा ठिकाणी  जत तालुक्यातील प्रत्येक रूग्णांनी जाऊन सल्ला घेऊन उपचार घ्यावेत. सर्वसामान्य लोकांना परवडेल असे हे मोफत मार्गदर्शन उपचार केंद्र जतमध्ये लवकरच सुरू करणार असून याचा लाभ घ्यावा असे दिनकर पतंगे यांनी सांगितले.

'जत' दुष्काळी तालुका हा 'कलंक' पुसून टाकणार: आ. सावंत


जत, (जत न्यूज वृत्तसेवा)-

जत तालुक्याचा दुष्काळी कलंक पुसून टाकण्यासाठी येत्या चार वर्षात पाणी, रस्ते या दोन गरजांच्या कामावर भर देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती आमदार विक्रम सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

जत तालुक्यात पावसाचे प्रमाण कायमच कमी असल्याने म्हैसाळ योजनेतून तलाव भरून देण्याची मागणी वारंवार शासनाकडे केली होती. त्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील व कृषीराज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. म्हैसाळ योजना १७ ऑगस्टला सुरू झाली.योजनेतून तलाव भरले. यासाठी मुख्यमंत्री,पालकमंत्री जयंत पाटील यांचे आभार.मात्र पूर्व भागातील अद्यापही ६७ गावे वंचीत आहेत. या गावांना तुबची-बबलेश्वर योजनेचे पाणी सहजपणे मिळू शकते.सध्या हे पाणी तिकोंडी तलाव व हळ्ळी पर्यंत आले आहे. तुबची-बबलेश्वर योजनेतून जतच्या पूर्व भागातील वंचीत ६७ गावासाठी अत्यंत उपयुक्त अशी योजना आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी कर्नाटक राज्याचे माजी जलसंपदा मंत्री एम.बी.पाटील यांच्या प्रयत्नामुळे व मानवतेच्या दृष्टीकोनातून योजनेतून पाणी मिळाले होते.यावेळी सुद्धा तुबची-बबलेश्वर योजनेचे पाणी जालेगिरी फाट्यापासून तिकोंडी तलावात आले आहे.तिकोंडी तलाव ओहरफ्लो होऊन भिवर्गी तलावात सोडले आहे.पुढे करजगी,बोर्गी,बेळोंडगी, बालगांव, हळ्ळी, सुसलाद, सोनलगी या भागात पाणी  पोहचू शकते. सध्या हळ्ळीपर्यंत पाणी पोहचले आहे.महाराष्ट्र शासनाच्यावतीने कर्नाटक राज्याकडे दोन टीएमसी इतक्या पाण्याची मागणी वारंवार केली आहे.तसेच नगरपरिषेदेची प्रशासकीय इमारतीचे काम टेंडर प्रोसेस मध्ये आहे.युवकांच्या हाताला उद्योग धंद्याच्या माध्यमातून राष्ट्रीयकृत  बँकांनी कर्जपुरवठा करावा अशा सूचना केल्या आहेत.सर्वांच्या सहकार्याने जत तालुक्यावर पडलेला दुष्काळाचा कलंक पुसण्याचा प्रयत्न करणार असल्याचे शेवटी आमदार सावंत म्हणाले.

शेवटी अंतर राहूनच गेलं...

 *शेवटी अंतर राहूनच गेलं...*

लहानपणी प्रवास करताना आई

घरून डबा करून द्यायची; पण

बाकीच्या लोकांना विकत घेऊन

खाताना बघितले की खूप वाटायचं,

आपणही विकत घेऊन खावं. पण

बाबा म्हणायचे, ती श्रीमंत माणसं,

पैसे खर्च करून खाऊ शकतात, आपण नाही.

मोठेपणी विकत घेऊन खाताना बघितले, तर आरोग्याची काळजी

म्हणून बाकी लोकं घरून करून आणलेला डबा खाताना दिसू

लागली.

शेवटी अंतर राहूनच गेलं..

लहानपणी जेव्हा मी सुती कपडे घालायचो, तेव्हा बाकी लोक

टेरिकॉट कपडे घालायचे, खूप वाटायचं आपणही असे कपडे घालावे.

मोठेपणी आम्ही टेरिकॉट घालायला लागलो आणि ते सुती. सुती कपड़े महाग झाले. परत शेवटी अंतर राहूनच गेलं..

लहानपणी खेळताना पडलो तर गुडघ्यावर पँट फाटायची, आई

छानपैकी शिवायची, पण शिवलेलं कोणाला दिसू नये ही माझी धडपड आसायची.

मोठेपणी गुडघ्यावर फाटलेले कपड़े

दामदुपटीने घेताना बघितले.

शेवटी अंतर राहूनच गेलं..

आता कळलं,

हे अंतर असंच कायम राहणार,

मनाशी पक्कं केलं.

जसा आहे. तसाच रहा,

मजेत रहा...

●●●●●●

जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा

चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे.

●●●●●●

आरशापुढे उभे असलेल्या पत्नीने पतिदेवाला विचारले - मी खूप जाड दिसते का?

पतीने निरुपयोगी भांडणे टाळण्यासाठी सांगितले - मुळीच नाही!

बायको आनंदी झाली आणि म्हणाली- ठीक आहे, मग मला आपल्या दोन्ही हातांनी उचलून घ्या आणि फ्रीजजवळ घेऊन चला. मी आइस्क्रीम खाईन!

परिस्थिती अनियंत्रित होत असल्याचे पाहून नवरा म्हणाला...

"थांब,.... मी फ्रीजच आणतो!"


जावयांचे प्रकार...

 *जावयांचे प्रकार...*

आपल्याकडे जावयाचे चार प्रकार पडतात...

१) साखऱ्या जावई :

साधारणतः २ टक्के जावई या प्रकारात मोडतात. ते १०० किलोमीटरपेक्षा लांब किंवा परराज्यात अथवा परदेशात असतात. त्या मुळे हे वर्ष-दोन वर्षातून सासुरवाडीला जातात. म्हणून या जावांना खाण्यासाठी गोड-धोड पदार्थ तसेच कपडेलत्ते देऊन यांचा मानपान होतो. चांगलीच बडदास्त असते याची. म्हणून हा साखऱ्या जावई... जावयांमध्ये उत्तम प्रकार हाच आहे...

२) भाकन्या जावई:

या प्रकारात ९५ टक्के जावई मोडतात. हे जावई सासुरवाडीच्या जवळपासच राहतात, तर काही एकाच शहरात राहतात. हे सासुरवाडीला वरचेवर जात असतात. तर काही वेळेस बायकोला तिच्या आई वडिलांची आठवण आली तर तिच्या सोबत जावे

लागते. यांचे जाणे येणे नेहमीचे असते त्यामुळे या जावयाला खाण्यासाठी जे घरात केले तेच वाढले जाते. तर कधी-कधी फक्त चहावर भागविले जाते... हा नेहमीचाच म्हणून काही खास मानपान नसतो, म्हणून हा भाकन्या जावई...

३) ढोकऱ्या जावई :

या प्रकारात २ टक्के जावई सापडतात. हे घरजावई असतात. या जावयाला घरात पाणी सुद्धा स्वतः घ्यावे लागते. तर कधी कधी घरात भाजीपाला, दुध असे आणून द्यावे लागते. झाड लोटीची कामे पण करावी लागतात. हा घरजावई म्हणून मानपान तर सोडा, पण दिवसांतून एक वेळेस तरी याचा अपमान नक्कीच केला

जातो. म्हणून हा ढोकऱ्या जावई...

४) दयावान जावई:

हा जावई सासरच्या लोकांना कायम मदत करतो. बायकोच ऐकतो. मेहुण्याला उसने पैसे देतो. त्याला सासरची मंडळी त्याला कायम गोड-गोड बोलून हरभऱ्याच्या झाडावर चढवून चांगलेच लुटतात. हा १-२ वर्षातून सासरी येतो, त्यावेळी त्याचेकडे आजूबाजूचे लोक दयेने बघतात म्हणून हा दयावान जावई...

आता तुम्हीच ठरवा आपण स्वत: कोणते जावई आहोत ते...?

●●●●●●

जो शर्यतीत धावणाऱ्या चाबकाचे फटके आणि चटके मिळतात म्हणून तो धावत राहतो. त्याला माहित नाही तो का धावतो?

जर आयुष्यामधे तुम्हाला फटके आणि चटके

पडत असतील तर परमेश्वर तुमचा राइडर आहे, तो फटके आणि चटके देतोय कारण तुम्ही जिंकणार

आहात!

●●●●●●

*विनोद*

तो : साहेब, हे बघा, हेल्मेट आहे डोक्यावर, पोल्युशन

सर्टिफिकेट, इन्शुरन्स, आरसी बुक सगळं आहे, अजुन काही राहिलंय?

साहेब : अरे पण गाडी कुठाय?

तो : तुम्ही दिसलात म्हणून मागे पार्क करून आलोय, कागदपत्र चेक करून घेतले, आता आणतो...


एका दारूच्या बाटली मागचे अर्थकारण*

 *एका दारूच्या बाटली मागचे अर्थकारण*

लक्षात ठेवा, एक बाटली मागे,

शासनाला महसूल,

वेटरला टीप,

हॉटेल व्यवसाय,

कर्मचारी रोजगार,

सोडा पाणी बाटली उद्योग,

फूड इंडस्ट्री,

चिकन मटण शॉप,

पोल्ट्री उद्योग,

शेळीपालन,

मसाले व इतर गृह उद्योग,

भंगारवाल्याला बाटली,

चकण्यामुळे बचत गटातील महिलांना पापडाची ऑर्डर,

असे अनेक अर्थचक्र या वर आहे,

परत जास्त झाली की दवाखाने आहेत,

 भानगडी झाल्या वर पोलीस व वकील आहेतच.

 आजपासून दारुडा अजिबात म्हणायचे नाही.

मग म्हणणार ना *अर्थसैनिक*?

●●●●●●

*शब्द*

माणसाजवळ त्याच्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजे त्याचे चांगले विचार... कारण धन आणि बळ कोणत्याही माणसाला वाईट मार्गावर नेऊ शकतात. परंतु चांगले विचार माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित करित असतात.

जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात तर जिव्हारी लागणारे शब्द आयुष्य बिघडवतात

शब्द प्रेम देतात, शब्द प्रेरणा देतात

शब्द यश देतात, शब्द नातं देतात

शब्द आयुष्यभर आणि आयुष्या नंतरही मनामनात जपणारी भावना देतात.

 शब्दांचं मोल जपलं की आपलं आयुष्यही अनमोल

होतं.

●●●●●

*वाचा विनोद*

समोरच्या अपार्टमेंटमधील ती पाच मिनिटं हात हलवत होती..

मग बंड्याने पण हात केला, तेवढ्यात बायकोने पाठीत रट्टा दिला, व म्हणाली ती खिडकीची काच

पुसतेय...


*कुणावर तरी प्रेम करावे*

 *कुणावर तरी प्रेम करावे*

जमेल तसे प्रत्येकाने, कुणावर तरी प्रेम करावे!

कधी संमतीने, कधी एकतर्फी; पण, दोन्हीकडे सेम करावे!

प्रेम सखीवर करावे,

बहिणीच्या राखीवर करावे!

आईच्या मायेवर करावे,

बापाच्या छायेवर करावे!

प्रेम पुत्रावर करावे,

दिलदार शत्रूवरही करावे!

प्रेम मातीवर करावे,

निधड्या छातीवर करावे!

कोटर अंम कट्टा

शिवबाच्या बाण्यावर,

लतादीदींच्या गाण्यावर

सचिनच्या खेळावर आणि

वारकऱ्यांच्या टाळावरही

करावे!

 प्रेम पुलंच्या पुस्तकावर करावे,

गणपतीच्या मस्तकावरही करावे!

महाराष्ट्राबरोबरच देशावर आणि न चुकता

स्वतःवर जमेल तसे प्रेम करावे!

●●●●●

*ध्यान का करावे?*

लोक एकत्रितपणे साधना केल्याने त्यांच्या लहरी दूरवर

पसरतात आणि नकारात्मकता नष्ट करून सकारात्मकता निर्माण करतात. आइन्स्टाईनने

शास्त्रीय दृष्टिकोनातून सांगितले आहे की एका अणुचे

विघटन केल्यास तो त्याच्या शेजारील अनेक अणूंचे

विघटन करतो. त्यालाच आपण अणुविस्फ़ोट म्हणतो.

हीच गोष्ट आपल्या ऋषी-मुनींनी आपल्याला हजारो

वर्षांपूर्वी सांगितली आहे. आपण ध्यान केले तर आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींवरील सकारात्मक परिणाम आपल्यास दिसून येईल.

आपण आपली भौतिक, तसेच आध्यात्मिक प्रगती

ध्यानामुळे कमी श्रमात साधू शकतो. गरज आहे ती फक्त ध्यानातून स्वत:चा शोध घेण्याची.

●●●●●

*वाचा विनोद*

कोंबडीचे पिल्लू कोंबडीला विचारते,

'आई, माणसाच्या बाळाचे जसे नाव ठेवतात; तसे आपल्यात का नाही.'

 कोंबडी म्हणते, 'आपल्यात मेल्यावर ठेवतात. चिकन चिली, चिकन मसाला, चिकन लॉलीपॉप, चिकन तंदूर, चिकन ६५, चिकन सूप, चिकन मंचूरी.'


Tuesday, September 15, 2020

लवकुमार मुळे यांची आयुष्याला भिडणारी कविता

 'कोणत्याही शक्यतेच्या पलिकडे'


कल्पना आणि भावनांची भाषा म्हणजे कविता असे हँझलीट या भाषा विमर्शकाने म्हटले आहे, तर उत्कट भावनेचा उत्स्फूर्त आविष्कार म्हणजे काव्य असे वर्डस्वर्थने म्हटले आहे. म्हणजेच कविता ही एकप्रकारे प्रतिमा प्रतिकांची सेंद्रिय रचना असते आणि कवी या रचनेतून आपला भवताल शब्दबद्ध करत असतो. स्वतःला व्यक्त करत असतो. त्याच्या ह्रदयात धगधगणारे रसायन त्याला शब्दांच्या द्वारे तो वाट करून देत असतो.

         लवकुमार मुळे असाच एक भावनाशील व्यक्तित्व लाभलेला कवी. गुलमोहर, भावमुद्रा, काळीजवेणा,अर्धवेलांटी आणि आता कोणत्याही शक्यतेच्या पलिकडे असा कवीचा काव्यप्रवास चालू आहे. गुलमोहर मधल्या काही कविता रोमँटिक वातावरणातल्या होत्या पण आताचा कवितासंग्रह मात्र कवीला वास्तवाचे असणारे भान दर्शवणारा आहे.

       जागृती प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या या काव्यसंग्रहात एकूण छप्पन कविता असून त्यासाठी कवीने मुक्तछंद, ओवी, अभंग ,द्विपदी इ.रचना प्रकार उपयोगात आणले आहेत. कवीची शब्दांवरची हुकूमत आपणाला प्रत्येक कवितेतून जाणवत राहते.लयबद्धता ,अल्पाक्षरत्व, व्यापक जीवनाशय क्षमता ,संवेद्यता, आशय व अभिव्यक्तीतील एकात्मता ही महत्वाची काव्यलक्षणे या कवितांमधून ठळकपणे दिसून येतात.

    "जिंदगानी खपली सारी आयुष्याची पखाली वाहताना"या एकाच ओळीतून आबाचे कष्टमय जीवन कवी शब्दबद्ध करतो. तर अवतीभवती या कवितेतून"ऐसपैस बसून बघ सारी नावे गोंदू

अवतीभवती जमलेले सगळे श्वास बांधू"असा समन्वयवाद मांडतो.

        काही कवितांसाठी कवीने अभंग हा रचना प्रकार निवडला आहे. प्राचीन संत मंडळींनी हा रचना प्रकार अध्यात्म, देव,पारलौकिक जीवन यांच्या प्रकटनासाठी स्विकारला होता. पण कवीने आपल्या परिसरातील कायमच्या दुष्काळाची दाहकता सांगण्यासाठी अचूकपणे वापरला आहे."जगण्याचा गुंता,आटलेले पाणी

झर्यालाच वाणी मुकलेली"अशी साडेतीन चरणी रचना कवी या ठिकाणी करतो व दुष्काळी भागातील पाणीटंचाई झर्याच्या प्रतिकातून मांडतो.

      "कविता"या कवितेत कवीला एक सनातन असा प्रश्न पडला आहे. तो कवितेच्या निर्मितीसंदर्भातला "परिस्थितीच्या बंधातून की खोल वेदनेच्या वावरातून

नक्की कुठून येते कविता...?"

       शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा. बहुसंख्य लोकसंख्या या व्यवसायात आहे पण शेती हा बेभरवशाचा धंदा झाला आहे. जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी हतबल झाला आहे."आयुष्यभर ऐकत आलो सुर-असुरांच्या युद्धकथा

कुणीच ऐकून घेत नाही माझ्या कुणब्यांची व्यथा"ही शेतकरी जीवनाची परवड कवी शब्दबद्ध करतो.

     ..कवी निराशावादी नाही. अंधारबनीस्थितीतही त्याने आशा सोडलेली नाही."गवसेल कधीतरी उजेडाची लख्ख दिशा

बेभान वादळाचे चक्रावर्त भेदतो मी"असा आशावाद कवीच्या मनात टिकून आहे.

      "चिमणीत तेल नाही शोध चालू आहे

अंधारात चोरट्यांचा बोध सुरु आहे"या द्विपदीतून कवी सामाजिक वास्तव उलगडत जातो. कवीचा जीवनप्रवास"चक्रीवादळ कधी त्सुनामी लाट

स्वत्वात हरवलेली प्रत्येक पाऊलवाट..."असा खडतर होत असताना"आयुष्याच्या वळचणीचा सारा पसारा इस्कटलेला

भुईभेगा लिंपताना जीव नुसता मेटाकुटीला..."अशा तर्हेने त्रासलेल्या वेदनेने ग्रासलेल्या जीवनाचा लेखाजोखा कवी आपणासमोर ठेवतो.

         माणूस हा समाजशील व भोवतीच्या परिस्थिती शी समायोजन साधणारा प्राणी आहे. वाळवंट, जंगल, हिमाच्छादित प्रदेश, कुठेही तो वास्तव्य करून राहतो. निसर्गाशी तडजोड करून राहतो. तशाच प्रकारे तो सामाजिक घटकांशीही समरस होतो."कुठे चाललेत हे दिशाहीन पाय

रस्ता संपत नाही अजूनही

व्यवस्थेच्या तिरडीसोबत चालताना"

        काही कवितांतून कवीच्या व्यक्तिगत जीवनाचे चित्रणही आले आहे. प्रेमळ पित्याचे मन "शब्दफुल"या कवितेतून मांडताना कवी लिहून जातो"लहान थोर झाली पोर

आली गौर हळदीला"

     " पिंपळपार व पिंपळछाया "या कवितांमधून निसर्गातल्या अबोल घटकांना ही मुखर केले आहे. गावोगावी असणारी ही झाड -पेडं ,गावगाड्यातील अनेक घटनांची मूक साक्षिदार असतात. श्रांत क्लांत मनाला विसावा देण्याचे काम करत असतात.

       सामान्य माणसाचा संसार हा एकप्रकारचा जीवनसंघर्षच असतो हे कवीने"तुझ्या माझ्या जगण्याचे कसे झाले रणांगण"अशा शब्दांतून सांगितले आहे."जन्म कशासाठी हा विचार हाय बाकी

आयुष्य पेलून सारं आलं आहे नाकी"कविचा परिसर कायमदुष्काळीभाग रानबाभळीचीच झाडं जीथं रूजतात,तग धरून राहतात पण तेथील माणसं मात्र आतून उन्मळून पडलेली असतात. त्या झाडांच्या सावलीतही मनातली तगमग कमी होत नसते तर वाढतच जाते."अशांत सावली, भग्न वाळवंटी

भूत मानगुटी,बसलेले..."

     धर्म, अर्थ, काम, व मोक्ष हे चार पुरुषार्थ मानले गेले आहेत. यातील दोन गोष्टी सामान्यांसाठी आहेत. त्या म्हणजे अर्थार्जन व प्रजोत्पादन. धर्म व मोक्ष या गोष्टी प्रामुख्याने अलौकीकांसाठी आहेत. पण या पूर्ण करताना होणारी स्थिती कवी मांडतो."घर,लग्न, विहीर कसोशीनं केली पार

अजून आली ना आयुष्याला नवी धार"अशी कबुलीच जणू कवी देतो. लौकिक, प्रापंचिक जीवनात जरी कवी उदासीनता दर्शवत असला तरी कवीच्या काव्य लेखनाला मात्र एक वेगळीच धार,एक वेगळीच उंची प्राप्त झाल्याचे चित्र या संग्रहातून दिसून येते. कवीच्या पुढच्या लेखन प्रवासाला शुभेच्छा!

-एकनाथ गायकवाड

जनता विद्यामंदिर, त्रिंबक ता.मालवण जि.सिंधुदुर्ग पीन .416614 मो.नं.9421182337

Monday, September 14, 2020

जत पोलिसांची 150 मोटारसायकल स्वारांवर कारवाई


जत,(जत न्यूज वृत्तसेवा)- 

जत शहरात सध्या जनता कर्फ्यू सुरू आहे. शहरातील व्यापारी वर्गाने प्रतिसाद दिल्याने जनता कर्फ्यु गेले चार दिवस यशस्वीरीत्या सुरू आहे. मात्र काही तरुण विनाकारण मोटारसायकलवरून शहरातून फेरफटका मारताना दिसत होते. शेवटी जत पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी या मोटारसायकल स्वारांच्या विरोधात पाऊल उचलले. आज सोमवारी जत पोलिसांकडून 150 च्यावर मोटरसायकल स्वारांच्यावर कारवाई करण्यात आली. 

जत शहरातील मोटर सायकल स्वारांवर कारवाई करण्यासाठी जत पोलीसानी चार पोलिसांचे एक पथक नेमले होते. विजापूर-सातारा रोडवर बसस्थानकाजवळील पेट्रोल पंपासमोर हे पथक थांबले होते. मोटरसायकलवरून जाताना मास्क न बांधणे, तिहेरी सीट बसून जाणे, लहान मूले गाडी चालविणे, लायसन्स नसणे आदी भंगाबद्दल 150 जणांच्यावर कारवाई करण्यात आली. आज दिवसभरात 100 रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई जत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उत्तम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पोलिसांच्या कारवाईमुळे जत शहरातून समाधान होत आहे.

Tuesday, September 8, 2020

खोजनवाडीतील तरुणांचा शॉक लागून मृत्यू


जत,(प्रतिनिधी)-

 जत तालुक्यातील खोजनवाडी येथील मल्लापा कात्ताप्पा तेली वय (24) या तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 6 च्या दरम्यान घडली.याबाबतची अधिक माहिती अशी की, कात्ताप्पा तेली यांचे खोजनवाडी येथे बिळूर रोडला 9 एकर शेती असून त्यातील अडीच एकरामध्ये द्राक्षेची बाग लावलेली असून कात्ताप्पा यांना दोन मुली व एक मुलगा आहे.मयत मल्लाप्पा हा आपल्या वडिलांबरोबर शेती व्यवसाय करत होता.मंगळवारी सकाळी 6 च्या दरम्यान शेतातील विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेला असता विजेचा शॉक लागून मल्लाप्पाचा जागीच मृत्यू झाला.मुलगा मल्लाप्पा शेतामधून अजून कसा घरी परत आला नाही हे बघण्यासाठी गेले असता मल्लाप्पा हा मृत अवस्थेत पडल्याचे वडिलांना दिसून आला.वडिलांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.तीन महिन्यांपूर्वी मयत मल्लाप्पाचा साखर पुडा झाला होता.त्याच्या मृत्यूने खोजनवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेची नोंद जत पोलीस ठाण्यात झालेली आहे.

Sunday, September 6, 2020

दि सॅलरी अर्नर्स को ऑप सोसायटीच्या वेबसाईटचे अनावरण


सांगली,(जत न्यूज वृत्तसेवा)-

 दि सॅलरी अर्नर्स को ऑप सोसायटी सांगली या महाराष्ट्रातील अग्रगण्य शतक महोत्सवी संस्थेच्या वेबसाईटचे अनावरण नुकतेच संस्थेच्या सभागृहात राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक जे. के.महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष अभिमन्यू मासाळ, उपाध्यक्ष प्रकाश पाटील व सर्व संचालक  यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी अभिमन्यू मासाळ म्हणाले की,माहिती व तंत्रज्ञाच्या या युगात संस्था कोअर बँकिंगच्या माध्यमातून सभासद, ठेवीदार याना अत्याधुनीक बँकिंग सेवा देत आहे. परंतु संस्थेच्या विविध योजनांची, उपक्रमांची तसेच संस्थेच्या कामकाजातील बदलाची माहिती संस्थेने सभासद,ठेवीदार व हितचिंतक यांना मिळावी या उद्देशाने http..//www.sanglisalary.com या नावाने वेबसाईट सुरु केली आहे. जे. के. महाडिक यांना कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी यांचेकडून सामाजिक कार्यात दिलेल्या योगदानाबद्दल मनाची डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक लालासाहेब मोरे, शरद पाटील, रामचंद्र महाडिक, पी. एन. काळे, राजेंद्र कांबळे, मलगोंडा कोरे, शक्ती दबडे, अरुण बावधनकर, अश्विनी कोळेकर, राजू कलंगुटगी, राजेंद्र बेलवकर, नाभिराज सांगले- पाटील, सचिव वसंत खांबे व कर्मचारी उपस्थित होते.

धनगर आरक्षणप्रश्नी जतमध्ये लक्षवेधी आंदोलन होणार


जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-

 धनगर समाजाच्या अनुसुचित जमाती आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जत येथे 7 सप्टेंबर 2020 रोजी लक्षवेधी आंदोलन केले जाणार असल्याची माहिती धनगर विवेक जागृती अभियानचे संयोजक विक्रम ढोणे यांनी दिली.

राज्यातील ठाकरे सरकार सत्तेवर येत असताना धनगर अरक्षणासंबंधीची ग्वाही देण्यात आली आहे. तत्पुर्वी या सरकारमधील तिन्ही घटक पक्षांनी धनगर आरक्षणाच्या मुद्यावर आवाज उठवला आहे, मात्र सत्तेवर आल्यानंतर अनुषंगिक कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे तातडीने कार्यवाही व्हावी, यासाठी हे आंदोलन केले जाणार आहे. राज्य विधीमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर जत तहसिल कार्यालसाबाहेर 7 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता फिजीकल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून हे आंदोलन होणार असल्याचे ढोणे यांनी म्हटले आहे.

आरक्षणासंदर्भात राज्य शासनाने मंत्री समिती स्थापन करावी, तसेच राज्य आणि केंद्र शासनाशी समन्वय करणारी लोकप्रतिनिधी- अधिकाऱ्यांची समन्वय समिती गठित करावी. केंद्र शासनानेही अशीच स्वतंत्र समिती स्थापन करावी, अशी आमची मागणी आहे. त्यादृष्टीकोनातून राज्य सरकारनेही पाठपुरावा करावा, या मागण्या ढोणे यांनी केल्या आहेत.

Saturday, September 5, 2020

बहुजन क्रांती संघाच्या जिल्हाध्यक्षपदी संतोष व्हनकट्टे


जत (जत न्यूज वृत्तसेवा)-

सांगली जिल्हा बहुजन क्रांती संघाच्या  जिल्हाध्यक्षपदी संतोष शिवाजी व्हनकट्टे यांची निवड  झाली आहे. या निवडीचे पत्र बहुजन क्रांती संघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटक  दऱ्याप्पा मनोहर कांबळे यांच्या व जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.

जत तालुक्यातील तिप्पेहळळी येथील श्री. व्हनकट्टे यांना समाज कार्याची आवड असून अनेक समाजोपयोगी कार्यात त्यांचा सहभाग असतो. सांगली जिल्हा बहुजन क्रांती संघाच्या जिल्हाध्यक्ष पदी झालेल्या निवडीचे पत्र देण्याच्या कार्यक्रमावेळी  अजिंक्यतारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकर  जाधव, जिल्हा परिषद सदस्या सौ. स्नेहलता प्रभाकर जाधव, जि.प.सदस्य सरदार पाटील, तिप्पेहळ्ळी गावचे लोकनियुक्त सरपंच सौ. मनिषा रविंद्र शिंदे, उपसरपंच सौ. लक्ष्मी शिंदे, विद्यमान ग्रा.पं. सदस्या सौ. शालनताई

सुर्वे, ग्रा.पं. सदस्य विक्रम बाळासो शिंदे, ग्रा.पं. सदस्य पृथ्वीराज शिंदे, माजी सरपंच सतिश चव्हाण, माजी सरपंच प्रतापराव शिंदे, प्रकाश शिवशरण, संभाजी शिवशरण, दिपक शिवशरण,सोने-चांदी व्यापारी रविंद्र मधुकर शिंदे, सुधाकर शिंदे,बबलु शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री सिद्धेश्वर स्वामी यांचा बालगाव येथे महिनाभर चिंतनसोहळा


आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तत्त्ववेत्ते आणि विजापूर येथील ज्ञानयोग मठाचे स्वामी प. पू. सिद्धेश्वर स्वामी हे त्यांच्या साधी राहणी, तसेच आपल्या रसाळ वाणीबद्दल सुप्रसिद्ध आहेत. कधीही कोणताही बडेजाव न मारता आपल्या व्याख्यानातून  समृद्ध आयुष्याची जीवनमूल्ये सांगताना स्वतःही असेच जीवन जगणारे 'बोले तैसा चाले' त्यांची वंदावी पाऊले ' असे व्यक्तिमत्त्व असलेल्या स्वामी सिद्धेश्वर स्वामी यांचा सहवास जतकरांना लाभणार आहे. महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर असलेल्या जत तालुक्यातील बालगाव येथील गुरुदेव आश्रमात महिनाभर ते वास्तव्यास असणार आहेत. प्रवचन होणार नसले तरी चिंतन सोहळा होणार आहे, त्यामुळे परिसरातील त्यांचे निस्सीम चाहते आनंदून गेले आहेत. 


श्री सिद्धेश्वर स्वामी यांचे व्याख्यान ऐकणे ही एक पर्वणीच असते. दैनंदिन जीवन जगताना अध्यात्माची सांगड कशी घालायची याविषयीचे त्यांचे विचार ऐकण्यासाठी भक्त गर्दी करतात.जत सारख्या दुष्काळी भागातील बालगाव येथील गुरुदेव आश्रमात कित्येक वर्षानंतर मुक्कामी येत असल्याने त्यांच्या भक्तांमध्ये उत्साह संचारला आहे. स्वामीजींच्या आगमनानंतर दररोज   महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील असंख्य भक्तगण त्यांचा आशीर्वाद व दर्शन घेण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे दररोज आश्रमात महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण आश्रमाची स्वच्छता,साफसफाई, रंगरंगोटी करून व पेंडॉल मारून सजावट करण्यात आली आहे. आश्रमात दिवाळी-दसऱ्यासारखे उत्साहाचे वातावरण तयार झाले असून महास्वामीजींच्या उपस्थितीने जत तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिकची उंची वाढणार आहे. 

ज्ञानयोगाश्रम विजयपूरचे (विजापूर) ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी यांचे संपूर्ण आयुष्य आधात्म क्षेत्रात गेले आहे. ते अगदी लहानपणीच आपले गुरू वेदांतकेसरी श्री मल्लिकार्जुन महाशिवयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व धर्मांचा सार प्राशून आध्यात्मिक

प्रवचनात परिपूर्ण बनले. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी त्यांनी 'सिद्धांत शिखामणी' या ग्रंथावर भाष्य केले. राजाराम कॉलेज, कोल्हापूर येथून एम.ए. (तत्त्वज्ञान) ची पदवी संपादन केलेले सिद्धेश्वर स्वामी अध्यात्मात सखोल तत्त्वचिंतन आचारलेले श्रेष्ठ महानुभावी

आहेत. त्यांचा निरागस स्वभाव, त्यांचे आचार व विचार सामान्य व असामान्यांनाही आकर्षून घेतात. उपनिषदे, भगवद्गीता, पातंजल योगशास्त्र, वचनशास्त्र, श्री अल्लमप्रभूदेव, महात्मा बसवेश्वर, श्री अक्कमहादेवी, श्री सिद्धरामेश्वर यांच्या वचनांवर व इतर विषयांवरही स्वामीं ची प्रवचने झालेली आहेत व होत आहेत.

गहन वेदांत तत्त्वेही सोप्या व सरळ भाषेत पंडित व सामान्य जनांनाही सुलभ आणि सहजरित्या समजेल अशा सुमधुर वाणीत प्रभावीपणे विवरण्याची त्यांना लाभलेली कला ही भगवंताची देणगीच आहे. महाशिवयोगी श्री अल्लमप्रभूदेव यांच्या समग्र वचनावर त्यांनी भाष्य लिहिले असून, 'श्री स्वामींनी कन्नड, संस्कृत, इंग्रजी, मराठी, हिंदी भाषेत पांडित्य संपादून अनेक उत्कृष्ट ग्रंथांची निर्मिती केली आहे. परदेशात त्यांची विपुल प्रवचने झालेली आहेत व होत आहेत. अशी ही महान विभूती जत सारख्या दुष्काळी भागात असलेल्या गुरुदेव आश्रमात वास्तव्यास येणार आहे.

सांगली जिल्ह्यातील बालगाव (ता.जत) येथील गुरुदेव आश्रम अलीकडच्या काळात योग विक्रमामुळे प्रसिद्धीस आले असले तरी इथे सातत्याने धार्मिक आणि योग प्रसाराचे कार्यक्रम होत असतात. मागे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बालगाव (ता. जत) येथे पार पडलेल्या योगशिबिरात एकाचवेळी १ लाख १0 हजार लोकांनी सूर्यनमस्कार घालून यापूर्वीचा विश्वविक्रम मोडीत काढला होता. सांगली जिल्हा प्रशासन व गुरुदेव आश्रमची नोंद यानिमित्ताने एशियन बुक ऑफ रेकॉर्डसह,मार्व्हल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड अशा तीन संस्थांचे  विश्वविक्रम नोंदविणाऱ्या तीन संस्थांकडे झाली आहे. त्याबाबतचे प्रमाणपत्रही बालगाव येथे वितरीत करण्यात आले होते. अशा आश्रमात श्री सिद्धेश्वर स्वामी महिन्याभर वास्तव्यास असणार आहेत.  त्यामुळे भक्त, शेतकरी, तरुणांनी व महिला वर्गांनी दररोज होणाऱ्या चिंतन व  आध्यात्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन  योगाचार्य डॉ  अमृतानंद स्वामीजींनी केले आहे.Friday, September 4, 2020

जत तालुक्यातील धरेप्पा कट्टीमनी, उद्धव शिंदे आणि संजय लोहार यांना जिल्हा परिषदेचा शिक्षक पुरस्कार जाहीर


जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-

सांगली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या आदर्श व गुणवंत शिक्षकांचे पुरस्कार जाहीर झाले असून जत तालुक्यातील तिघांना हा पुरस्कार मिळाला आहे. जत तालुक्यातील उमराणी येथील कन्नड शाळेतील शिक्षक धरेप्पा मारुती कट्टीमनी, शेगाव शाळेतील उध्दव राजाराम शिंदे आणि जिरग्याळ शाळेतील संजय शामराव लोहार यांना आदर्श व गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत.

सांगली  जिल्हा परिषदेचे सन 2020 सालातील 

जिल्हा शिक्षक पुरस्कार खालीलप्रमाणे:1.श्रीम. मंदाकिनी प्रकाश मोरे (जि. प. शाळा. चिंचोली ता.शिराळा),2. सुरज मन्सुर तांबोळी (जि. प. शाळा, गोडवाडी ता. वाळवा),3. प्रकाश भिमाण्णा कलादगी (जि. प. शाळा विजयनगर -म्हैसाळ ता. मिरज),4. सौ. वैशाली राजेश पाटील ( जि. प. शाजा. बालगवडे ता. तासगांव), 5.अमोल विलास साळुखे (जि. प. शाळा, कुंडल ता पलुस),6.आप्पासाहेब तातोया जाधव (जि. प. शाळा, हणमंतवाडी ता. कडेगांव)7. प्रकाश शिवाजीराव चव्हाण जि. प. शाजा. गोरवाडी ता. खानापूर),8.हैबतराव जयवंत पावणे,शाळा गळवेवाडी आटपाडी), 9.संदिप सिताराम माने (जि.प.शाळा, करंजाडी ता.क.महांकाळ)10. धरेप्पा मारुती कट्टीमनी (जि. प. शाळा. उमराणी-कन्नड ता. जत),10. उध्दव राजाराम शिंदे (जि. प. शाळा. शेगांव ता.जत)

गुणवंत शिक्षक पुरस्कार खालीलप्रमाणे:

 1.रमण दगडू खबाले (जि. प. शाळा. मगदुर ता.शिराळा),2. श्रीम. आयेशा इकबाल नदाफ (जि. प. शाळा,तूजारपुर ता वाळवा),3.सचिन विश्वनाथ पाटील (जि.प.शाळा.सोनी ता. मिरज),4. सतिश रामचंद्र नलवडे (जि. प. शाळा. वैभवनगर ता. पलुस),5. रघुनाथ किसन जगदाळे (जि. प. शाळा. हिंगणगांव बु. ता. कडेगांव),6. नारायण तुकाराम पवार (जि. प. शाळा. रायेवाडी. ता. क. महाकाल), 7. संजय शामराव लोहार (जि. प. शाळा, जिरग्याळ ता.जत)

उर्दू शिक्षक पुरस्कार

1.श्रीम. रेहाना मोहंदरपिक मुजावर जि. प. शाळा, कुपवाड ता. मिरज)


जत शहरातील आशा वर्कर्सना कोरोना कामाचा प्रोत्साहन भत्ता द्या-हणमंत कोळी


जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-

 लाल बावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटनेच्यावतीने उपविभागीय अधिकारी प्रशांत आवटे यांना जत शहरातील आशा वर्कर्स यांना कोरोनाच्या कामाचा प्रोत्साहन भत्ता नगरपरिषदेकडून मिळावा, यासंदर्भात कॉ. हणमंत कोळी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.

जगभर कोरोना संसर्गामुळे हाहाकार माजला आहे. देशात आणि महाराष्ट्रातदेखील कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. कोरोना काळात सर्व प्रथम  आपल्या जीवाची पर्वा  न करता काम करणाऱ्या आशा वर्कर्स यांची कामगिरी कौतुकास्पद आहे. महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील  आशा वर्कर्स यांना ग्रामपंचायत स्तरावरून कोरोनाच्या कामासाठी विशेष   प्रोत्साहन भत्ता म्हणून एक हजार रुपये देऊ केले आहे व ते कोरोना जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांना तो प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. तसेच इतर ठिकाणीही म्हणजे महापालिका, नगरपालिकामध्ये आशा वर्कर्स यांना त्यांच्या सेस फंडातून प्रोत्साहन भत्ता देऊ केला आहे. आपल्या जत नगरपरिषदअंतर्गत 33 आशा वर्कर्स काम करत आहेत. या आशा वर्कर्स शासनाकडून मिळणाऱ्या  तटपुंज्या मानधनावर काम करत आहे, तरी जत नगरपरिषदनेही आपल्या सेस फंडातून आशा वर्कर्स यांना एप्रिल पासून प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा व जोपर्यंत कोरोना आहे तोपर्यंत प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा. यासंदर्भात वेळोवेळी जत नगरपरिषदेला भेटून निवेदन दिले आहे. मात्र ते म्हणतात की आम्हाला प्रोत्साहन भत्ता देण्यासंदर्भात पत्र नाही. आम्हाला जिल्हाधिकारी किंवा प्रात अधिकाऱ्याकडून लेखी पत्र आल्या शिवाय आम्ही भत्ता देऊ शकत नाही असे ससांगितले आहे. तरी प्रांतअधिकारी यांनी यात स्वतः लक्ष्य घालून आशा वर्कर्स यांच्या प्रोत्साहन भत्ताच्या प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली आहे. 

यावेळी ललिता सांवत,राजश्री कोळी,लता मदने, अर्चना काळे, रुकसाना मुजावर, विद्या साळे इ. आशा वर्कर्स उपस्थित होते.

डफळापूर येथे सफाई कामगार,आशा वर्कर्स, महावितरण कर्मचारी यांची आरोग्य तपासणी

कु.उत्कर्षा हणमंत कोळी हिच्या वाढदिवसानिमित्त आयोजन


जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-

जत तालुक्यातील डफळापूर येथील धडाडीचे युवक कॉम्रेड हणमंत कोळी यांची कन्या कु.उत्कर्षा हणमंत कोळी हिच्या वाढदिवसानिमित्त कोरोना महामारीमध्ये अहोरात्र कार्यरत असणाऱ्या आशा वर्कर्स, महावितरण कर्मचारी आणि ग्रामपंचायत सफाई कर्मचारी यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्राजक्ता फौंडेशन व जत येथील हिराई मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने डफळापूर येथील सवदे बंधू हॉल येथे आरोग्य शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.

यावेळी जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उत्तम जाधव, कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी, डॉ.सुदर्शन घेरडे, सांगली जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य अभिजीत चव्हाण, जत पंचायत  समितीचे सदस्य दिग्विजय चव्हाण, डॉ.राजेंद्र झारे, डॉ.विनोद माळी, डॉ.गुरूशांत माळी व सर्व कर्मचारी, सवदे उद्योग समुहाचे मालक अशोक सवदे, कॉ.मिना कोळी, सरिता पवार, ग्रामपंचायत सदस्य मुरलीधर शिंगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विकास शिंदे, आणि सर्व पत्रकार, आशा वर्कर्स, महावितरण कर्मचारी व ग्रामपंचायत सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गौस मकानदार, अमिर नदाफ,अतुल शिंदे, विशाल शिंदे, दिपक कांबळे नितिन पाटील, अशोक स्वामी, शरद सकट,वृषभ कोळी आदींनी आरोग्य शिबिराचे योग्य नियोजन केले. 

Wednesday, September 2, 2020

मुचंडी येथे आमदार सावंत यांच्याहस्ते व्यायाम शाळेचे उदघाटन

मुचंडी-शेडयाळ रस्त्याच्या खडीकरण,मुरुमीकरणचे भूमिपूजन


जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-

जत तालुक्यातील मुचंडी येथे 25/15 या योजनेतून मुचंडी ते शेडयाळ रस्त्याच्या खडीकरण आणि मुरुमीकरण या कामाचे भूमिपूजन आमदार विक्रम सावंत यांच्याहस्ते करण्यात आले. त्याचबरोबर गावात बांधण्यात आलेल्या व्यायाम शाळेचे उदघाटनही आमदार सावंत यांच्याहस्ते करण्यात आले.

जत तालुक्यातील मुचंडी येथे झालेल्या या कार्यक्रमांना जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अप्पाराया बिराजदार, माजी पं.स.सभापती बाबासाहेब कोडग, सरपंच अशोक पाटील,ग्रा प.सदस्य श्री. बिराजदार, संजय मलमे, रमेश कोळूर,संजय कुमार बिराजदार, अण्णापा जालिहाल,शंकर शिंदे,बबन शिंदे,व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार विक्रम सावंत यांच्या पाठपुराव्याने म्हैसाळ योजनेच्या कामास गती-डॉ. प्रदीप कोडग


जत, (जत न्यूज वृत्तसेवा)-

जत तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे काम रेंगाळले आहे, त्यामुळे जत तालुक्यात सोडलेल्या कृष्णा नदीचे पाणी मिळण्यास पश्चिम भागाला अडचणीचे ठरत आहे. मात्र आमदार विक्रम सावंत यांनी पाठपुरावा केल्याने योजनेच्या पाईपलाईनच्या कामास गती आली आहे, अशी माहिती डॉ. प्रदिप कोडग यांनी दिली आहे. म्हैसाळ योजनेचे पाणी सध्या दुष्काळी जत तालुक्यात सुरु असुन पाईपलाईनच्या अपुऱ्या कामामुळे अजुन मोकाशेवाडी, सिंगनहळ्ळी, आवंढी व लोहगाव या गावांना पाणी जाऊ शकत नाही त्यातच यंदा या परिसरात पावसाचे प्रमाणही कमी आहे.  सध्या अजुबाजुच्या गावात चांगल्या पावसाबरोबरच म्हैसाळ योजनेचे पाणीही सुरु आहे. त्यामुळे पाईपलाईनचे काम पूर्ण होऊनही जाँईट करणे व व्हाँल्व बसविणे या कामाचे वेल्डिंग करण्याचे काम सुरु असल्याने पाणी सोडण्यास विलंब होत आहे, आमदार विक्रम सावंत यांनी संबंधीत अधिकारी, काँन्ट्रँक्टर, यांच्याशी वारंवार चर्चा करुन कामास गती देण्याचे काम केल्याचे यावेळी माजी उपसरपंच डॉ. प्रदिप कोडग यांनी यावेळी सांगितले, यावेळी सांगली जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस दिनेशभाऊ सोळगे म्हणाले कि, सध्या तालुक्यात पाणी सुरु असुन हे पाणी बंद होण्याच्या आगोदर वेल्डिंगचे काम पूर्ण करुन आवंढी व परिसरातील गावांना लवकरात लवकर पाणी सोडण्याचे पुण्यकाम ठेकेदाराने करावे, यावेळी आवंढी ग्रामस्थांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देऊन कामाच्या प्रगतीबाबत कामगारांशी चर्चा केली,यावेळी शिवाजी कोडग शेठ, सुरेश कोडग,सतिश कोडग, नितिन कोडग, सचिन कोडग,संजय कोडग,सुभाष कोडग,श्रीकांत कोडग, आदि ग्रामस्थ उपस्थित होते.