Wednesday, January 15, 2020

शिक्षण सेवकांना 25 हजार मानधन द्या: शिक्षक समिती

सांगली,(प्रतिनिधी)-
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांचेसह  पदाधिकाऱ्यांनी ग्राम विकास मंत्री  हसन मुश्रीफ, शालेय शिक्षण मंत्री सौ. वर्षाताई गायकवाड, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांची शिक्षक, विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्र्नांच्या सोडवणुकीसाठी मुंबईत भेट घेतली. यावेळी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षणासंबंधी चर्चा करण्यात आली आणि प्रश्न सोडवण्याबाबत सकारात्मक सहमती दर्शविण्यात आली आहे.

जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय व्हावा, शिक्षकांच्या बदली धोरणात सर्व समावेशक बदल करावा, घरभाडे भत्त्यासाठी मुख्यालयी संबंधाने दि. ९ सप्टेंबर २०१९ चे परिपत्रक रद्द करावे, प्राथमिक शिक्षण सेवकांचे मानधन  २५ हजार रुपये करावे, शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम संघटनांना विश्वासात घेऊन ठरवावा, ग्रामीण भागातील शाळकरी किशोरवयीन मुलींसाठी शाळा स्तरावर सॅनिटरी पॅड मोफत पुरवावेत, भेदभाव न करता सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळावे, MS-CIT मुदतवाढ देण्यात यावी या व अन्य मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. संबंधित मंत्रीमहोदयांनी निवेदनास अनुसरून बैठक घेण्याचे आश्वस्त केले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, शिक्षक नेते काळूजी बोरसे-पाटील, अण्णा मिरजकर, राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर, राज्य कोषाध्यक्ष केदुजी देशमाने, राज्य संघटक सयाजी पाटील, सांगली जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब लाड, धिरेश गोळे (सातारा), किरण गायकवाड, शशिकांत भागवत (सांगली) आदी यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment