Monday, January 13, 2020

आपल्या मुलांना चांगले शिक्षण आणि संस्कार द्या;विलासराव जगताप

जत,(प्रतिनिधी)-
मराठा समाजाने कर्मकांड, पूजा पाठ, व्रत वैकल्ये, बुवाबाजी आदींच्या मागे न लागता आपल्या मुलांना चांगले शिक्षण व  संस्कार द्यावे, असे आवाहन जतचे माजी आम. विलासराव जगताप यांनी जत येथे केले. येथील अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे वतीने साईप्रकाश मंगल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या  राजमाता जिजाऊ यांच्या जयंती कार्यक्रमात मार्गदर्शन करीत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जतचे श्रीमंत इंद्रजित उर्फ बाबाराजे डफळे  होते. 

कार्यक्रमाचे सुरूवातीस श्रीमंत उर्वशीराजे डफळे   यांच्या शुभहस्ते राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.   या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्री. जगताप म्हणाले, आताच्या काळात सरंजामशाही संपुष्टात आली आहे. असे असताना ही आपण शिंदे सरकार, जगतापकी, पाटीलकी, देशमुखी अशा भ्रमात वावरत आहोत. खायला अन्न नाही,पण आपला थाट सोडत नाही,त्यामुळे मराठा समाज मागे पडला आहे. मराठा समाजाने मुलांच्या शिक्षण आणि संस्काराकडे लक्ष देण्याची गरज आहे.
 राजमाता जिजाऊ यांनी संपूर्ण हिंदुस्थानात मोगली सत्ता असतानाही  आपणाला छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या सारखे स्वाभिमानी व स्वराज्यसंस्थापक असे छत्रपती दिले. सतराव्या शतकात देशात फक्त चार वर्ण होते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र. त्या काळी छत्रपती शिवाजी महाराज यांना व छत्रपती शाहू महाराज याना या ब्राह्मणांनी शुद्र म्हणून त्यांचा राजा म्हणून स्विकार करण्यास नकार दिला होता. व राज्याभिषेकाला विरोध केला होता. हा इतिहास आपण  लक्षात घेतला पाहिजे. असेही जगताप म्हणाले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात महिलांवर अत्याचार करणारेवर हात पाय कलम करून त्यांचा कडेलोट केला जात असे. त्यामुळे अशी कठोर शिक्षा होण्याच्या भितीने स्वराज्यात महिलावर अत्याचाराच्या घटना घडल्या नाहीत. याचा विचार आजच्या राज्यकर्त्यांनी करणे गरजेचे आहे.व त्यासाठी कठोर शिक्षेची अंमलबजावणी करावी, असेही जगताप म्हणाले.  या प्रसंगी स्वराज्य संघाचे प्रदेशाध्यक्ष महादेव साळुंखे, व्याखाते प्रा.  माणिक कोडग यानी प्रबोधन केले. 
या वेळी कु. मानसी पाटील,सायली काशिद,  श्रावणी शिंदे, समृद्धी नागणे, जान्हवी जाधव, प्रथमेश सावंत, प्रितम सावंत यांनी राजमाता जिजाऊ यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले.  या प्रसंगी श्रीमंत शार्दुलराजे डफळे, श्रीमंत इंद्रजित उर्फ बाबाराजे डफळे, नगरसेवक उमेश सावंत, नगरसेवक प्रकाश माने, माजी नगरसेविका सौ.बेबीताई चव्हाण,  स्वराज्य संघाचे जिल्हाध्यक्ष  सुभाष गायकवाड, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्यान सभापती सौ.सुनिता पवार, जि.प.सदस्य सरदार पाटील, सुनिल पवार उपस्थित होते.
तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब जाधव,मच्छिंद्र बाबर,गणेश सावंत, श्रीकृष्ण पाटील,प्रा कुमार इंगळे रावसाहेब यादव,शहाजी भाेसले,दिपक शिंदे ,राहूल जाधव, गणपत काेडग,अरूण शिंदे,मधुकर जाधव, सुरेश डफळे ,पमू चव्हाण यांनी काम पाहिले.  यावेळी महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेता पै.तानाजी  शिंदे यांचा सुधीर चव्हाण यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
दरम्यान,सौ.शैलजा मानेपाटील, सौ.शोभा इंगळे, सौ.हेमलता निकम, सौ.ज्योती घाडगे, सौ.मंगल भोसले, सौ.शिल्पा पवार, सौ.कल्पना पवार, सौ.जयश्री शिंदे आदींच्या उपस्थितीत महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता. याला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  प्रास्ताविक डॉ.महेश भाेसले तर स्वागत मोहन मानेपाटील यांनी केले शेवटी आभार अनिल शिंदे यांनी मानले.

No comments:

Post a Comment