Sunday, January 26, 2020

बलशाली भारतासाठी सुसंस्कारक्षम पिढी घडवा-डॉ रमेश होसकोटी

निष्ठा प्रशिक्षण केंद्रास भेट;निष्ठापूर्वक प्रशिक्षण घेण्याचे  केले आवाहन
जत,(प्रतिनिधी)-
शिक्षण हे सर्व व्यवसायाची जननी असून शिक्षकांनी नवनवीन ज्ञान,तंत्रे व कौशल्याचा वापर  नेहमी विधायक कार्यासाठी करावे. शिक्षकांच्या विचारातील सकारात्मकता, आशावाद, मुलांना जगण्याचे बळ देतो. भविष्यात येणाऱ्या संकटांवर मात करायची असेल तर शिक्षकांना मुळात स्वतःला घडविण्याची, उत्तुंगतेची आस असली पाहिजे. शिक्षकाला मातीची भांडी घडविणाऱ्या कलाकाराची भूमिका निभावताना विद्यार्थ्यांवर सुसंस्कार, नीतीमूल्ये, सकारात्मक जीवनदृष्टी घडवायची आहे. त्यातूनच उद्याचे आदर्श नागरिक घडणार असून देशाचे भवितव्य ठरविणार आहेत. प्रत्येक विद्यार्थी स्वतंत्र तेज, बुद्धी आणि वृत्ती जपणारा असतो. त्याचा कल शिक्षकाने समजावून घेतला पाहिजे.सहज व कृतीयुक्त अध्यापन पद्धतीतून आनंददायी शिक्षणाबरोबरच अध्ययन निष्पत्तीवर भर देणे आवश्यक आहे.

भारताच्या बलशाली भविष्यासाठी मार्कवंत विध्यार्थ्यापेक्षा सुसंस्कारक्षम गुणवंत विद्यार्थी घडवणे आजच्या काळाची गरज असल्याचे प्रतिपादन  सांगली डाएट कॉलेजचे प्राचार्य डॉ. रमेश होसकोटी यांनी केले. माडग्याळ येथे सुरू असलेल्या शिक्षकांच्या निष्ठा प्रशिक्षण केंद्रास सदिच्छा भेट देऊन मार्गदर्शन  केले. यावेळी जत पूर्वभागातील सर्व केंद्रातील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक शिक्षक  प्रशिक्षणास उपस्थित होते.
     डॉ होसकोटी यांनी मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, वाचन ज्ञान व अंकज्ञान आले की विध्यार्थ्यामध्ये गुणवत्ता आली असे होत नाही. शिक्षण प्रक्रियेत शिक्षक व विद्यार्थी हे दोन महत्त्वपूर्ण घटक असून त्यांचा एकमेकांवर सतत परिणाम होत असतो. सध्याच्या युगात शिक्षकांवरील जबाबदारी फार मोठी आहे.  कारण उद्याचा समाज हा सतत शिकत राहणार आहे. यासाठी शिक्षकांची कार्यत्परता खूप महत्वाची आहे.निष्ठासारख्या प्रशिक्षणाने शिक्षकांची व्यावसायिक उंची वाढते. जगाच्या स्पर्धेमध्ये टिकायचे असल्यास आपली गुणवत्ता सिद्ध करणे आवश्यक असल्याचे सांगत  शिक्षकांचे व्यक्तीमत्व जेवढे प्रभावी, परिणामकारक, ज्ञानसमृद्ध असेल तेवढे ते विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असते. आजची आव्हाने आणि भविष्यातील समस्या यांना सामारे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे हे शिक्षकांसमोर मोठे आव्हान आहे. शिक्षकामध्ये विविध ज्ञान व कौशल्य अद्ययावत असणे आवश्यक आहे. त्यामुळे कामात निर्माण होणारे कोणतेही प्रश्न हातळण्याची सूत्रे आपल्याला प्रशिक्षणाने उपलब्ध होतात. शिक्षकाने नेहमी चिंतनशील असावे. आजचे युग हे संगणकाचे युग आहे. कुठल्याही नव्या परिवर्तनाच्या  शक्तीचा उगम प्रभावी शिक्षण हे माहिती व तंत्रधिष्ठीत आहे. आपल्या शाळांमधून परिक्षार्थी तयार करण्यापेक्षा शिक्षकांनी आपल्या वाट्याला आलेले काम कुशलतेने, आनंदीवृत्तीने, बिनचुकपणे, वेळेत आणि नियमांच्या आधीन राहून करायला हवे.  शिक्षकाने नवनवीन  संकल्पना समजून घेऊन त्याप्रमाणे अध्यापन तंत्राचा अवलंब करून विषयात सहजता आणावी. त्या त्या विषयाचा प्रत्यक्ष जीवनाशी असणारा संबंध स्पष्ट करावा आणि शिक्षण हे खऱ्या अर्थाने जीवन शिक्षण बनावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी प्रा तुकाराम राजे व  न्यु इंग्लिश स्कुलचे मुख्याध्यापक श्रीशैल हिरगोंड  यांनीही मार्गदर्शन केले.
    गटशिक्षणाधिकारी आर डी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र समन्वयक अधिव्याख्याता चंद्रहंस हिप्परकर, सुरेंद्र सरनाईक, नशिमा जमादार, वैशाली माने,सदाशिव ऐवळे यांनी  चार टप्प्यातील प्रशिक्षणाचे सुयोग्य नियोजन केले आहे.  ए. ए. सय्यद, भक्ताराज गर्जे, एल एस भोसले, एम टी दुगाणी, आर टी गडदे हे निष्ठा प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक म्हणून काम करीत आहेत.यावेळी राजकुमार करडी, चनबसु चौगुले, मारुती चव्हाण, लखन होनमोरे, बसवंतराय बगली, डी के चव्हाण, बसवराज बिरादार,दिलीप वाघमारे,विकास वायदंडे,आमगोंडा पांढरे,सचिन पोळ,दादासाहेब कोडलकर यांच्यासह प्रशिणार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळ- (सांगली डायटचे  प्राचार्य डॉ रमेश होसकोटी यांनी  केंद्रास भेट देऊन प्रशिक्षणार्थी शिक्षकांना मार्गदर्शन केले.यावेळी प्रा तुकाराम राजे, चंद्रहंस हिप्परकर व  मुख्याध्यापक श्रीशैल हिरगोंड आदी उपस्थित होते.)

No comments:

Post a Comment