Friday, January 17, 2020

संस्कृतचे गाढे अभ्यासक:डॉ. आ. ह. साळुंखे


ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आ. ह. साळुंखे यांना सामुदायिक विकास व संसाधन व्यवस्थापन संस्था यांच्या वतीने दिले जाणारा पाचवा अश्‍वघोष पुरस्कार जाहीर झाला. सातारा येथे येत्या २ फेब्रुवारी रोजी होणार्‍या धम्म महोत्सवात शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. डॉ. आण्णासाहेब हरी साळुंखे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील खाडेवाडी या लहानशा गावी एका शेतकर्‍याच्या कुटुंबात १४ ऑक्टोबर १९४३ रोजी झाला. संस्कृत विषयात पहिल्या वर्गात प्रथम येत त्यांनी आपली पदवी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून घेतली.
एम.ए.मध्येही त्यांनी संस्कृत विषयात प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी १९८६मध्ये शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर इथे चार्वाक दर्शनाचा चिकित्सक अभ्यास ह्या विषयावरील पीएचडीसाठीचा प्रबंध सादर केला. ते मराठीतील लेखक, महाराष्ट्रातील एक विचारवंत, व्याख्याते आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक आहेत. ते सातारा शहरातील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात संस्कृत विषयाचे २00३पयर्ंत विभागप्रमुख आणि कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे विद्याशाखेचे अधिष्ठाता, अकॅडमिक काउन्सिलचे सदस्य होते. त्यांना राष्ट्रभाषा पंडित म्हणून गौरवण्यात आले होते. त्यांनी मराठी विश्‍वकोशात तुलनात्मक धर्मशास्त्र, संस्कृत इत्यादी विषयांत १00हून अधिक लेख लिहिले आहेत. १९५९ पासून जाहीरसभांमधून भाषणे देत असले तरी त्यांची महाराष्ट्रभर भटकंती आणि व्याख्याने १९८0-८१पासून सुरू झाली. ४ ऑगस्ट २00९ला महाराष्ट्र सरकारने ड. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी समिती नेमली होती. डॉ. साळुंखे यांची ग्रंथसंपदा मोठी आहे. यामध्ये अंधाराचे बुरुज ढासळतील, अशी भेटत राहा तू, अस्तिकशिरोमणी चार्वाक, आता आमच्या धडावर आमचेच डोके असेल, प्राईड ऑफ स्वराज्य : उमाजीराजे नाईक, एकलव्य, शंबूक आणि झलकारीबाई, ऐतरेय ब्राह्मण : एक चिकित्सा, गुढी आणि शंकरपार्वती, गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो (पुस्तिका), चांदण्यात भिजायचे राहून जाऊ नये, म्हणून, चार्वाकदर्शन (पुस्तिका), चिंतन - बळीराजा ते रवींद्रनाथ यांचा समावेश आहे. त्यांना अनेक पुरस्कार, मानसन्मान प्राप्त झाले आहेत. अश्‍वघोष पुरस्कार त्यात भर पडली आहे.

No comments:

Post a Comment