Thursday, January 23, 2020

संगणक साक्षर न झाल्यास पोलिसांची पदोन्नती रोखणार

संगणकाचा वापर आजच्या काळात खूपच आवश्यक झाला आहे. सर्वच क्षेत्रात संगणकाद्वारेच कार्यालयीन कामकाज केले जात आहे. शहरी भागात संगणकाने कामकाज होतेच पण, ग्रामीण भागातही आज संगणक महत्त्वाचे झाले आहे. सर्वच शासकीय कार्यालयात संगणक अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वच कर्मचार्‍यांना संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक झाले आहे. पोलिस विभगातही संगणाचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. तसे पोलिस कर्मचार्‍यांना परिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
विशेष म्हणजे संगणक साक्षर न झाल्यास वेतनवाढ आणि पदोन्नतीही रोखली जाणार आहे.
कार्यालयीन कामकाज सोयीचे व्हावे, गुन्ह्य़ाचा शोध घेताना संगणकाचा सहज उपयोग करता यावा, यासाठी पोलिस कर्मचारी संगणक साक्षर व्हावे, असा शासनाचा विचार आहे. त्यानुसार परिपत्र काढून पोलिस कर्मचार्‍यांना राज्य शासनाने ठरवून दिलेल्या कालावधीत संगणक हाताळणीचे प्रमाणपत्र सादर करण्यास सांगण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र सादर न केल्यास संबंधित कर्मचार्‍यांची वार्षिक वेतनवाढ आणि पदोन्नती रोखली जाणार आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून तशी अधिसूचना जारी करण्यात आली होती. ती मुदतवाढ डिसेंबर २0१९ मध्येच संपली होती. पण, बर्‍याच लोकांना अजूनही प्रमाणपत्र प्राप्त झाले नसल्याने त्यांना पोलिस महासंचालकांच्या आदेशाने मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ३१ जानेवारी २0२0 पर्यंत संगणक हाताळणी प्रमाणपत्र सदर करता येणार आहे. साधारणत: पंधरा वर्षांपूर्वी सर्व कर्मचारी आणि अधिकार्‍यांनी संगणक हाताळणीचे प्रशिक्षण घ्यावे, यासाठी प्रोत्साहन भत्ता दिला जायचा. विशिष्ट कालावधीत संगणक प्रशिक्षण घेऊन तसे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक करण्यात आले होते. त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा अन्य निवड पद्धतीने पोलिस दलासह इतर शासकीय सेवेत नव्याने दाखल होणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांना ठराविक कालावधीत संगणक हाताळणीचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले होते. महाराष्ट्र मुलकी सेवा नियमांत तशी तरतूद करण्यात आली आहे. राज्य शासनाने आता त्यात आणखी सुधारणा करून सरकारी अधिकारी-कर्मचार्‍यांना संगणक ज्ञान बंधनकारक आणि त्यासंबंधीचे प्रमाणपत्र विहित कालावधीत सादर करणे सक्तीचे केले आहे. व्यस्त कामकाजामुळे प्रमाणपत्र सादर करण्यास जमले नसलेल्या पोलिस कर्मचार्‍यांसाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, ज्या पोलिस कर्मचार्‍यांचे वय ५0 वर्षे पूर्ण झाले आहे, अशा पोलिस कर्मचार्‍यांना संगणक हाताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही. त्यांना आणि वाहन चालकांना या प्रक्रियेतून पूर्ण सूट देण्यात आली आहे. ज्यांनी मुदत संपल्यावरही प्रमाणपत्र सादर केले नाही, अशा कर्मचार्‍यांची वेतनवाढ आणि पदोन्नती रोखण्यात येणार असल्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment