Thursday, January 23, 2020

फेसबुकवर फॉलोअर्स वाढले,नी पतीने पत्नीला ठार मारले

संशय माणसाचा घात करतो. संशय माणसाला स्वस्थ जगू देत नाही. संशयाने एकदा का डोक्यात घर केले की आयुष्य उदवस्त केल्याशिवाय राहात नाही. हाच संशय प्रेमविवाह करून संसार थाटलेल्या नाशला कारणीभूत ठरला आहे. बायकोचे फेसबूकवरील फॉलोअर्स वाढल्याने नवऱ्याचे पित्त खवळले आणि तिला कट रचून यमसदनास पाठवले. पत्नीचा खून करून हा गेला तुरुंगात आणि तीन महिन्याची त्याची मुलगी मात्र अनाथ झाली. जयपूरमधील आमेर भागातील ही धक्कादायक घटना आहे.

अयाज अहमद अन्सारी असे या आरोपीचे नाव असून त्याने पोलिसांकडे आपला गुन्हा कबूल केला आहे. पत्नी सतत फोनवर बिझी असायची शिवाय तिचे फेसबुकवरील फॉलोअर्स वाढत होते. पत्नीला फोनचा वापर कमी कर आणि संसाराकडे लक्ष घाला अशा सूचना आपण देत। होतो,पण ती लक्ष देत नव्हती. त्यामुळे आमच्यात वारंवार खटके उडायचे,असे अयाज अहमद अन्सारीने पोलिसांना सांगितले आहे. भांडून माहेरी जाऊन राहिलेल्या बायकोचा खून करण्यासाठी अयाज अन्सारीने मग मारण्याचा कट रचला.
अयाज अहमद अन्सारीचा  रेशमा ऊर्फ नैना मांगनानी नावाच्या मुलीशी दोन वर्षांपूर्वी प्रेम विवाह झाला होता. नंतर त्यांनी रीतसर निकाहही केला. त्यांना तीन महिन्याची मुलगीदेखील आहे. पत्नी रेशमाच्या फेसबुक वर 5 हजार फॉलोअर्स होते. त्यामुळे ती संपूर्ण वेळ फोनवर बिझी असायची.यामुळे या दोघांमध्ये दुरावा आला होता. त्यामुळे अयाज अहमद अन्सारीने तिला मारण्याचा कट रचला.
नवरा बायकोचा वाद विकोपाला गेल्याने रेशमा काही दिवसांपासून माहेरी राहत होती. शिवाय ती आयाजकडून तलाक मागत होती. आरोपी असलेल्या अयाजने आपण आपला वाद मिटवू या बहाण्याने पत्नीला बाहेर भेटायला बोलावले. दिवसभर दोघे एकत्र फिरले. नंतर दोघांनी बिअर पिली. नंतर त्याने जयपूर-दिल्ली हायवेवर असलेल्या नव्या माता मंदिराजवळ एकांतात नेले. संधी साधून त्याने बायकोचा गळा आवळला आणि मारून टाकले. नंतर त्याने मृतदेह लपवण्यासाठी आणि पुरावा नष्ट करण्यासाठी आयाजने रेशमाच्या चेहऱ्यावर आणि डोक्यात दगडाने वार करून चेहरा विद्रुप केला. त्यानंतर त्याने रेशमाची स्कुटर झाडीत लपवली आणि तिथून पसार झाला. लोकांच्या सांगण्यावरून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला. मात्र पोलिसांनी खुनाचा छडा लावून आरोपी पतीला अटक केली.

No comments:

Post a Comment