Wednesday, January 29, 2020

शाळेच्या आवारात भरला भाजी बाजार

'भाजी घ्या भाजी'चा कलकलाट
जत,(प्रतिनिधी)-
डफळापूर (ता.जत) येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या नं. 2 शाळेच्या आवारात आज भाजीपाला बाजार भरला होता,पण हा बाजार भरवला होता चिमुकल्या मुलींनी. आणि ग्राहक होते पालक. आपलीच भाजी खपली जावी म्हणून मुली वेगवेगळ्या क्लृप्त्या करताना दिसत होत्या.  'भाजी घ्या भाजी' अशी आरोळी,ग्राहकांचा कलकलाट यामुळे शाळा परिसर भाजीमंडईमय झाला होता.
 येथील विद्यार्थिनींनी शाळेतच - आठवडा बाजार भरवला होता. यावेळी गावातील नागरिकांनी शाळेत येऊन बाजारातील पालेभाज्या खरेदी केल्या. डफळापुर परिसरातील शेतकऱ्यांच्या मुलांनी आपल्या 'शेतातील भाजी-पाला बुधवारच्या बाजारात न जाता थेट शाळेत भरवलेल्या बाजारातच विकायला आणल्यामुळे शाळेत आठवडी बाजाराचे वातावरणच तयार झाले होते. व्यावहारिक ज्ञानाची माहिती प्रत्यक्ष अनुभवाने घेता यावी या हेतूने प्रेरित होऊन हा आठवडा बाजाराचे आयोजन करण्यात आले. बाजारात विकण्यासाठी विद्यार्थ्यांनी भाजीपाला, कांदा, बटाटे, टोमॅटो, विविध प्रकारचा भाजीपाला, सरबत, पानीपुरी, भेळ, इत्यादी खाद्यपदार्थ, मेकअप साहित्य, प्लॅस्टिकची भांडी अशा विविध प्रकारच्या वस्तू आणल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या आठवडी बाजारात सर्वात जास्त गर्दी पहायला मिळत होती ती म्हणजे खाद्य पदार्थाच्या स्टॉलवर सर्व ग्रामस्थानी या बाजाराला भेट देऊन वस्तू विकत घेत विद्यार्थ्यांना उत्तम प्रतिसाद दिला. दोन अडीच तासांच्या बाजारात 12 ते 15 हजार रुपये एवढी विक्री विद्यार्थ्यांनी केली. पहिल्या स्वकमाईचा आनंद यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
पालकवर्गाची आपल्या पाल्याकडून वस्तू खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली होती. तसेच या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन केंद्र प्रमुख शंकर बेले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेकडून शाळेस मिळालेल्या संगणक संच्याचे उद्घाटन जि. प. सदस्य महादेव पाटील, पं. स. सदस्य दिग्विजय चव्हाण, मार्केट कमिटी संचालक अभिजित चव्हाण, माजी जि. प. सदस्य राम पाटील, मनोहर भोसले, राजू भोसले, देवदास पाटील सदस्य ग्रा.प., यांच्या हस्ते घेतले. यावेळी डफळापूर गावच्या सरपंच बालिका चव्हाण, सुभाष गायकवाड अध्यक्ष मराठा स्वराज्य संघ, एस.एम.सी.अध्यक्ष विकास शिंदे उपाध्यक्ष हणमंत कोळी, ज्योती उमेश सावळे हे उपस्थिती लावली केंद्राचे केंद्रप्रमुख शंकर बेले व मुख्याध्यापिका रेखा कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अलका पवार, शंकर कुंभार, सुषमा चव्हाण, उद्योगरत्न संकपाळ या शिक्षकांनी हा उपक्रम राबविला.

1 comment: