Friday, January 24, 2020

वसंत पंचमीचे महत्त्व

वसंत पंचमी ही शिशिर ऋतूमध्ये येणारी माघ शुद्ध पंचमी होय. भारतात साधारणत: मकर संक्रांतीनंतर सूर्याचे उत्तरायण सुरू होतानाच्या काळात येणारा हा सण आहे. भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होत असला तरी खास करून या दिवशी, नृत्यादि कला शिकवणार्‍या संस्थांमध्ये, विद्येची देवता-सरस्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे. हा दिवस सरस्वतीचा जन्मदिवस आहे. मथुरा, वृंदावन, राजस्थान या भागात या दिवशी विशेष उत्सव साजरा केला जातो.
या दिवशी गणपती, इंद्र, शिव आणि सूर्य यांची प्रार्थनाही केली जाते. बंगाल प्रांतात या दिवशी भक्तिगीते म्हणत प्रभातफेरी काढली जाते. भारतातीलच नव्हे तर फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेल्या पश्‍चिम पंजाबात सुद्धा वसंत पंचमी ही पतंगोत्सवाच्या स्वरूपात साजरी केली जाते. शेतातील सरसोची फुले पिवळी र्जद झाल्यावर नदीकाठी पंजाबात हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी केशर घातलेला गोड भात खाण्याची पद्धत आहे. वसंत पंचमी ही कामदेवाच्या पूजेसाठीही ओळखली जात असे. सूफी परंपरेतील चिश्ती संप्रदायात हजरत निजामुद्दीन अवलियाचे शागीर्द मोहरीच्या पिवळ्या फुलांच्या रंगात बुडविलेली वस्त्रे नेसून हा सण साजरा करतात. कृषी संस्कृतीशी याचा संबंध दिसून येतो. या दिवशी नवान्न इष्टी असा एक छोटा यज्ञ करतात. शेतात तयार झालेल्या नवीन पिकाच्या लोंब्या घरात आणून त्या देवाला अर्पण करतात.
माघ शुक्ल पंचमीला वसंतोत्सवाची सुरूवात होते. ऋतुंचा राजा असे वसंतऋतुला संबोधले जाते. नवसृजन, चैतन्य, आनंद, उत्साह याचे लेणे घेऊन वसंत येतो. रंगांची, गंधाची, प्रेमाची, चैतन्याची मुक्तहस्ते उधळण करीत येणार्‍या वसंताच्या आगमनाची तयारी म्हणून 'वसंत पंचमी' साजरी करतात. 'वसंतपंचमी' साजरी करण्यामागे इतरही काही चांगले संकेत आहेत.
प्रेम देवता कामदेव तथा मदनाचा जन्म वसंत पंचमीचा आहे. मदन आणि रती हे पती-पत्नी. सहजीवन आणि सहमिलनाचे प्रतिक. माणसाच्या मनात स्त्री सहवासाची आभिलाषा उत्पन्न करणारा मदनबाण कामदेवाच्या हातात. देवादीकांसह दैत्य प्रवृत्तीला मोहित करणारे मादक सौंदर्य रतीच्या ठायी. असे मनमोहक आणि मादक दाम्पत्य म्हणजे मदन-रती. दोघांच्या मिलनात प्रेम, सौंदर्य आणि श्रृंगार आहे.
वसंत पंचमीचे महत्त्व इतरही मुहूर्तांसाठी आहे. या दिवशी शेतकरी शेतात वाढ झालेल्या नवीन पिकांच्या लोंब्या घरी आणून त्या कुलदेवतेला अर्पण करतो. त्या पासून तयार केलेले 'नवान्न' ग्रहण करतो.
पुराणात उल्लेख आहे की, 'वसंत पंचमी'ला विद्येची देवता सरस्वतीदेवी उत्पन्न झाली. म्हणून तिची पूजा लेखक, कलावंत करतात. लक्ष्मीचाही हाच जन्मदिन मानला जातो. म्हणून या तिथीला 'श्रीपंचमी' असेही म्हणतात.
दीपावलीच्या दिवशी महालक्ष्मीचे 'आवाहन' केले जाते ते कुटुंबात स्थिरावण्यासाठी. मात्र, वसंत पंचमीला सरस्वतीची स्थापना करून पूजा केली जाते ती शब्द आणि कलांच्या उत्तम सृजनासाठी. महालक्ष्मीला आगमनाचे 'आवाहन' तर सरस्वतीला 'सृजनाची विनंती' करणे हा पुजनातील मूलभूत फरक आहे. सृजन हे शब्द, नृत्य, वाणी, गायन, वादन, रंग-रेषा-छाया चित्रण या कलांशी संबंधित आहे. म्हणून सरस्वती पूजनाचा मुहूर्त कलाकार व कलावंतांनी चुकवू नये. आजकालची अनेक व्यावसायिक कौशल्ये ही सुध्दा सृजनाचेच अविष्कार आहेत. त्यामुळे त्या-त्या क्षेत्रातील कुशल कौशल्य असलेली मंडळी सरस्वती ही आपल्या जिव्हा, कान, डोळे, हात, पाय आणि मेंदूत स्थिरावण्यासाठी तीचे पूजन करतात.
कामविकार आणि त्यातून उद्भवणारे प्रश्न पुराणांच्या अनेक कथांमधून आहेत. इंद्राने कपटातून आणि ऋषीपत्नी अहिल्येने स्वसौंदर्याच्या गर्वातून मूक संमतीने केलेला श्रृंगार, राजा दुष्यंताने शकुंतले सोबत नावेत प्रणय, ब्रम्हदेवाच्या मनांत स्व पूत्री संध्याविषयी निर्माण झालेली अभिलाषा, प्रतिज्ञाबद्ध भीष्माच्या मनातही कन्यारुपातील देवर्षी व्यासांनी निर्माण केलेली अस्वस्थता, पार्वती विरहाने व्याकूळ होवून कठोर तप करणार्‍या शंकराचा कामदेव-रतीने केलेला तपोभंग, रती मिलनात मृत्यू आहे हे माहित असून पांडूने माद्री सोबत केलेली कामक्रीडा, दैत्य कुळातील शुर्पणखेला मानव कुळातील लक्ष्मणाविषयी निर्माण झालेले आकर्षण, विवाहिता सितेचे हरण करून विवाहित रावणाने तिची विवाहासाठी केलेली मनधरणी, वानरराज बालीने भाऊ सुग्रीवच्या पत्नीचे केलेले हरण, प्रभू रामचंद्राकडून बाली हत्येनंतर त्याची पत्नी ताराने वानरराज सुग्रीवशी केलेला विवाह, रावण वधानंतर मंदोदरीने राजा बिभिषणशी केलेला विवाह, ऋषि पाराशरने सत्यवती सोबत केलेला संबंध, बृहस्पतिची पत्नी ताराचे चंद्राने केले हरण, राजा नरकच्या वधानंतर कृष्णाने १६ हजार बंदीनींशी केलेला विवाह, राजा दण्डने शुक्राचार्यची पुत्री अरजासोबत केलेला दुर्व्यवहार, वायु देवताने रार्जषि कुशनाभच्या कन्येचा केलेला मानभंग, विष्णूने जालंदरची पत्नी वृंदासोबत केलेला अशिष्टाचार असे अनेक प्रसंग कामविकारातून अनैतिक आणि अनितीचे प्रसंग मानवासमोर उभे करतात.
पुराण कथा या एकवेळ दंत-मौखिक किंवा भाकड कथा मानल्या तरी त्यातून आजही मानवाच्या मन-वर्तनात उत्पन्न होणारा विविधांगी कामविकार स्पष्ट करतात. अर्थात, या कथांचे वाचन करताना त्यामागील नियतीचा नंतरचा न्याय सुद्धा लक्षात येतो. शाप, उप:शाप, शिक्षा, प्रायश्‍चित्त अशा कारककारणांतून कामदेव व रतीच्या सकारात्मक व नकारात्मक बाबींची माहिती होते.
वरील सर्व प्रकारचे कामविकार हे सर्व सामान्य माणसाच्या वैवाहिक जीवनात कधीही उद्भवू शकतात. माणसाच्या कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात कामशांती असेल तर त्याचे ५0 टक्के प्रश्न सहजपणे सुटतात. म्हणूनच 'वसंत पंचमी' ला विद्येची देवता सरस्वतीसह कामदेव-रती पूजनाचेही महत्त्व लक्षात घ्यायला हवे.

No comments:

Post a Comment