Thursday, January 30, 2020

६६ टक्के लोकांना रोजचा खर्च भागवणेही कठीण

देशाच्या सुस्तावलेल्या अर्थव्यवस्थेच्या पार्श्‍वभूमीवर एक सर्वेक्षण चिंतेत टाकणारे आहे. सामान्य माणसावर महागाई आणि आर्थिक मंदीचा डबल मारा होत आहे. सुमारे ६६ टक्के लोकांनी घर खर्च चालवायलाही नाकी नऊ येत आहेत. लोकांचे म्हणणे आहे की महागाई दिवसागणिक वाढतच निघाली आहे. त्याचा परिणाम घराच्या बजेटवर होत आहे.
आयएएनएस सी वोटरच्या सर्वेक्षणानुसार, एकूण ६५.८ टक्के लोकांचे म्हणणे आहे की त्यांना रोजचा खर्च करणंही कठिण होत आहे. सर्वेक्षणानुसार, अर्थसंकल्पाच्या आधी केलेल्या या सर्वेक्षणात सध्याची लोकांची आर्थिक स्थिती, रोजच्या खचार्चा ताळमेळ बसवताना होणारी तारांबळ समोर आली आहे. पगार वाढत नाही, मात्र खाद्यपदार्थांपासून सर्व गरजेच्या वस्तूंच्या किंमतीत गेल्या काही महिन्यात वाढ झाली आहे.

४५ वर्षांमधील सर्वाधिक बेरोजगारी मागील वर्षीच्या बेरोजगारीचा दर गेल्या ४५ वर्षांतला उच्चांकी आहे. विशेष म्हणजे २0१४ मध्ये युपीए सरकारच्या काळातही सुमारे ६९.९ टक्के लोकांनी सांगितले होते की त्यांना आपल्या खर्चाचे व्यवस्थापन करणे कठीण होते. मात्र २0१५ च्या तुलनेत लोकांचा मूड आता आणखी वाईट आहे. चालू वर्षात लोकांमधील नकारात्मक दृष्टीकोनात वाढ झाली आहे.
६५ महिन्यांतील सर्वाधिक महागाई
अधिकृत आकडेवारीनुसार, खाद्यपदार्थ्यांच्या किंमतीत बेसुमार वाढ झाल्याने डिसेंबर महिन्यातील महागाईचा दर ७.३५ टक्के हा गेल्या ६५ महिन्यातील उच्चांकी स्तर आहे. या सर्वेक्षणात सामील झालेल्या ४,२९२ लोकांपैकी ४३.७ टक्के लोकांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की त्यांचं उत्पन्न एकसमानच राहिलं आहे आणि खर्च वाढला आहे, तर २८.७ टक्के लोकांच्या मते खर्च तर वाढले आहेतच पण उत्पन्न घटलं आहे.

No comments:

Post a Comment