Wednesday, January 29, 2020

मनामध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी परमात्म्याचा आधार घेण्याची गरज


सुदीक्षाजी महाराज
नाशिक,(प्रतिनिधी)-
 मनामध्ये उद्भवणाऱ्या विपरित भावनांना दूर करुन शांती स्थापित करण्यासाठी परमात्म्याचा आधार घेण्याची गरज आहे असे प्रतिपादन सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी केले. महाराष्ट्राच्या ५३व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या दुसऱ्या दिवशी उपस्थित विशाल जन समुदायाला संबोधित करतांना त्या बोलत होत्या.

सद्गुरु माताजी म्हणाल्या की, आपले मन अनेक रंग धारण करत असते. कधी ते पाषाणासारखे कठोर बनते तर कधी मेणासारखे मऊ बनते. कधी या मनामध्ये द्वेष उत्पन्न होतो तर कधी प्रेमाने भरुन जाते. म्हणुनच मनामध्ये जेव्हा दुष्ट भावना उत्पन्न होतात तेव्हा त्यांना थारा देऊ नये.
सद्गुरु माताजींनी पुढे सांगितले, की आपल्याला जे ज्ञान मिळालेले आहे ते बहुमुल्य आहे. हे ज्ञान आपण आपल्या जीवनामध्ये उतरवून ते इतरांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करायला हवा. जेव्हा आपण ईश्वराचा आधार घेतो तेव्हा आपले वर्तमान जीवन सुधारते आणि भविष्यही सावरले जाते. इतरांचे दुर्गुण न पाहता आत्मसुधाराकडे ध्यान दिले तर जीवन उज्वल बनते. 
सद्गुरु माताजी म्हणाल्या, ईश्वराशी नाते जोडल्याने आपले जीवन संतुलित होते. यासाठी आपण ज्ञान व कर्म या दोन्ही पैलूंकडे लक्ष द्यायला हवे. ज्ञान प्राप्तीनंतर त्याचा प्रभाव आपल्या व्यवहारात दिसून यायला हवा. तेव्हाच आपल्या जिवनात माधुर्य येईल.
संत समागमामध्ये लावण्यात आलेली निरंकारी प्रदर्शनी आणि बाल प्रदर्शनी समागमाच्या तीनही दिवशी भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र बनून राहीली. उल्लेखनीय आहे की, समागम परिसरातील माध्यमिक आश्रम शाळा, जैन चॅरिटेबल शाळा आणि होली अँजल शाळा या तीन शाळांमधील मुलांना संबंधित शाळांमार्फत बाल प्रदर्शनी पाहण्यासाठी पाठविण्यात आले होते. यापैकी एका संस्थेने त्यांच्या शाळेच्या प्रांगणात नियमित बाल सत्संग सुरु करण्याची सुद्धा विनंती केली आहे.
कायरोप्रॅटिक चिकित्सेचे एक शिबिर समागम स्थळावर लावण्यात आले आहे. त्यामध्ये १३ देशांतून आलेले ६० पेक्षा अधिक कायरोप्रॅटिक चिकित्सक आपल्या निष्काम सेवा प्रदान करत असून त्याचा लाभ दररोज सुमारे ३ ते ४ हजार लोक घेत आहेत. उपचार घेणाऱ्यांमध्ये निरंकारी भक्तगणांसह अन्य नागरिकांचाही समावेश आहे.
ही उपचार पद्धती पाठीच्या कण्याशी निगडित आहे. आपल्या शरीरामध्ये उद्भवणाऱ्या प्रत्येक व्याधीचे मूळ पाठीच्या कण्याशी संबंधित असते. कारण शरिरातील सर्व मुख्य नाडयांचा थेट संबंध पाठीच्या कण्याशी असतो त्यामुळे कण्यामध्ये उद्भवलेला लहानसा दोषदेखील अनेक नसांना किंवा नाडयांना प्रभावित करतो. कायरोप्रॅटिक चिकित्सेद्वारे पाठीच्या कण्यामध्ये निर्माण झालेला दोष दूर केला जातो ज्याचा सकारात्मक परिणाम प्राप्त होतो. यातील तज्ञ डॉक्टरांनी सांगितले की, कायरोप्रॅटिक म्हणजे हाताद्वारे उपचार करणे होय. या उपचार पद्धतीने यु.एस.ए., कॅनडा यासारख्या विकसित देशांमध्ये उपचार केले जात आहेत. भारतामध्ये कायरोप्रॅटिक इलाज करणारे ८ डॉक्टर्स सद्या नोंदणीकृत आहेत.

No comments:

Post a Comment