Friday, January 24, 2020

उत्तम आरोग्यासाठी सकस आहाराची गरज : श्रीमंत ठोंबरे

जत,(प्रतिनिधी)-
अभ्यासक्रमाबरोबरच आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपले आरोग्य उत्तम असेल तरच आपण पाहिजे त्या क्षेत्रामध्ये करिअर करू शकतो. आपण सकस व उत्तम आहार घेतला तरच आपली प्रकृती चांगली राहते. तरच आपण चांगल्या प्रकारे अभ्यास करून जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो असे प्रतिपादन प्रा. श्रीमंत ठोंबरे यांनी केले.
 बिळुर ( ता.जत) येथील  एज्युकेशनल फाऊंडेशन संचलित इंग्लिश गुरुकुल अँड ज्युनिअर कॉलेजच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. सौ संगीता देशमुख होत्या. यावेळी प्रमुख उपस्थित संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब पाटील,  सचिव डॉ. राजेश जीवानव्वर,  कोषाध्यक्ष विजय कोटगोंड, उपाध्यक्ष बसाप्पा कोळी, संचालक श्रीकांत करोली, गुरुलिंग प्रधाने इत्यादी प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. प्रमुख मान्यवरांचे स्वागत डॉ. राजेश जीवानव्वर, समन्वयक नाशिककर,  प्राचार्य एच. ए. आडळहट्टी, मुख्याध्यापिका सौ. अलिया नाशिककर, सौ.शोभा प्रधाने यांच्या हस्ते करण्यात आले.
       वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संगीत खुर्ची, लिंबू चमचा, पाककृती, फुगे फुगवणे अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या.  या स्पर्धेचे नियोजन मुख्याध्यापिका सौ. आलिया नाशिककर, प्रा. धनलक्ष्मी हिरेमठ, प्रा. सुनिता खडतरे व सर्व स्टाफने केले. विजेत्या स्पर्धकांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
         यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रा. सौ.संगीता देशमुख म्हणाल्या की, आपणास उच्च दर्जाची गुणवत्ता सिद्ध करायची असेल तर विद्यार्थ्यांनी स्वतःला मोबाईल व टीव्हीपासून दूर ठेवले पाहिजे‌. मोबाईलच्या अनेक फिचर मुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. आपण गरजेपुरताच इंटरनेटचा वापर केला पाहिजे. यशाचे उंच शिखर शिखर गाठायचे असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही असेही त्या शेवटी म्हणाल्या.
             यावेळी संस्थेचे सचिव डॉ. राजेश जीवानव्वर म्हणाले की, ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे या उद्देशाने आम्ही एकत्र येऊन या शिक्षण संस्थेची स्थापना केली. मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये  जे शिक्षण मिळते हे तेच दर्जेदार शिक्षण ग्रामीण भागातील मुलांना उपलब्ध करून दिले जाईल जेणेकरून मुलांची ग्रामीण भागापासून नाळ तुटणार नाही. मुलांना शिक्षणासाठी घरापासून दूर जावे लागणार नाही म्हणून या शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. आलिया नाशिककर यांनी केले.  बक्षीस वितरण समारंभाचे अहवाल वाचन प्रा. सुनिता खडतरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कुमार इंगळे यांनी तर शेवटी आभार प्रदर्शन प्राचार्य एच. ए. आडळहट्टी यांनी केले. यावेळी कार्यक्रमास बिळुर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, ग्रामस्थ  महिला व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment