Thursday, February 27, 2020

मराठी साहित्याला फार मोठी परंपरा- प्रा.सौ.संध्या पाटील

कडेपूर,(प्रतिनिधी)-
साहित्यिकांची खूप मोठी परंपरा  मराठी मातीला लाभली आहे.  त्यामुळेच समृद्ध अशा महाराष्ट्राची जडणघडण झाली आहे. म्हणून महाराष्ट्र संस्कृतीच्या बाबतीत देशात अग्रेसर आहे. म्हणून आपण सर्वांनी मराठी भाषेचे संवर्धन केले पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ गझलकार प्राध्यापिका सौ. संध्या पाटील यांनी केले.

           त्या कडेपूर (ता. कडेगांव) येथे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, कडेपूर येथे  मराठी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य एस.टी.शिंगटे हे होते. यावेळी ज्येष्ठ प्रा.डॉ. एस.पी. शिर्के प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी मराठी विभाग प्रमुख प्रा. बापूराव पवार यांनी आपल्या प्रास्ताविकात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यामागची भूमिका स्पष्ट करून सांगितली.
            आपल्यावर मातृभाषा गौरव दिन साजरा करण्याची गरज का निर्माण झाली. याचे आपण सर्वांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे असे सांगून,  प्रा. सौ. संध्या पाटील पुढे म्हणाल्या की, महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावातून असे मराठी भाषेचे उत्सवपूर्ण कार्यक्रम साजरे झाले पाहिजेत. तरच मराठी भाषेचे संवर्धन होईल. साहित्य विश्वामध्ये हे काव्याला अनन्य साधारण महत्व असून पुस्तके म्हणजे कवींनी टाकलेली कात आहे. अशा सर्व पुस्तकांचे वाचन आपण सर्वांनी केले पाहिजे. मराठी भाषेमध्ये गोडवा ओतप्रोत भरलेला असून हा गोडवा आपण सर्वांनी चाखला पाहिजे. आपण सर्वांनी आजच्या  मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मराठी भाषेला अग्रक्रम देऊन तिचे सौंदर्य जपले पाहिजे  असे सांगून त्यानी कविवर्य कुसुमाग्रज यांचे  काव्य ओघवत्या शैलीत विद्यार्थ्यांसमोर सादर केले. त्याचबरोबर आपल्या गझल काव्याचा जन्म कसा झाला हे सांगून त्यांनी आपल्या स्वरचित गझल काव्याचे गायन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
        यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य एस. टी. शिंगटे यांनी मराठी भाषेच्या परंपरेचा धावता आढावा घेऊन मराठी भाषा किती श्रेष्ठ आहे  हे सांगितले. साहित्यनिर्मितीसाठी भावना महत्त्वाची असून भावनेचा उद्रेक झाला की सकस साहित्य जन्माला येते  असे सांगून त्यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असेही त्यांनी शेवटी सांगितले. प्रारंभी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्याचे पूजन करून व संस्थेच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.  मराठी विभाग प्रमुख प्रा. बापूराव पवार यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. सौ. विजया पवार यांनी तर शेवटी आभार प्रदर्शन प्रा. कुमार इंगळे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. राजेंद्र महानवर,  प्रा. सुनील खोत, प्रा.डॉ. सतीश व्यवहारे,  प्रा. अभिजित दळवी, प्रा. जयदिप दीक्षित,व परिचर श्री. सचिन माने, श्री. किरण भोंगाळे यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment