Monday, February 17, 2020

शेतकरी उत्पन्न वाढीसाठी तालुकास्तरावर समित्या

जत,(प्रतिनिधी)-
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सातत्य ठेवण्यासाठी व उत्पन्नात वाढ करण्यासाठी सरकारच्या विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधला जाणार आहे. याकरिता तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली १२ सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार आहे.

तालुका कृषी अधिकारी हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. या व्यतिरिक्त या समितीत गट विकास अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, सिंचन विभागाचे उपअभियंता, कृषी विद्यापीठ संशोधन संस्थेचे प्रतिनिधी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, मत्स्य रेशीम ग्रामोद्योग या विभागाचे प्रतिनिधी, वीज विभागाचे अभियंता, बँकेचे प्रतिनिधी, सहायक निबंधक सहकारी संस्था यांचे प्रतिनिधी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांना या समितीमध्ये स्थान देण्यात आलेले आहे. याशिवाय  समितीच्या बैठकांना उपविभागीय कृषी अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तीन महिन्यांतून एकदा या समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करून उपाययोजना सुचविल्या जाणार आहेत. तसेच या बैठकीत हवामान पीक परिस्थिती, उत्पादकता, खत व बियाणे पुरवठा, पीककर्ज, कुटीरोद्योग, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी जोडधंदे, बँकांचे शेतकरी कर्ज प्रकरणे, वीजजोडणी प्रकरणे व सरकारच्या विविध योजना या विषयावर या बैठकांमध्ये चर्चा केली जाणार आहे. यानुसार तालुकास्तरावर तत्काळ समित्या स्थापन करण्यात याव्यात असे आदेश कृषी विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी तहसीलदार व। तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिला आहे.

No comments:

Post a Comment