Tuesday, February 25, 2020

भोंदू बाबाने केले पाच बहिणींवर अत्याचार

पुत्रप्राप्ती आणि घरात असलेले गुप्तधन काढून देण्याच्या बहाण्याने एका भोंदू बाबाने एकाच कुटुंबातील पाच बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरीमध्ये २२ जानेवारी ते २१ फेब्रुवारी या कालावधीत हा संतापजनक प्रकार घडला आहे. पिंपरी पोलिसांनी तातडीने कारवाई करत या भोंदूच्या मुसक्या आवळल्या आहेत.

सोमनाथ कैलास चव्हाण (वय ३२, रा. खैरेवाडी, ता. रोहा, जि. रायगड) असे अटक केलेल्या भोंदूबाबाचे नाव आहे. याप्रकरणी २२ वर्षीय पीडितेने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोंदूबाबा सोमनाथ याने पीडित महिलेच्या कुटुंबियांना सांगितले की, तुमच्या घरात पुत्रप्राप्ती होऊ नये, यासाठी नात्यातील एका बाईने घरातील प्रत्येक सदस्यावर करणी केली आहे. तुमच्या घराच्या एका खोलीत सात पेट्या धन, एक सोन्याची घागर, एक गणपतीची मूर्ती असे गुप्तधन आहे. घरातील एका मुलीचा जीव धोक्यात आहे.
पुत्रप्राप्ती व्हावी, गुप्तधन मिळावे आणि मुलीचा जीव वाचवण्यासाठी घरात तीन उतारे व नग्नपूजा करावी लागेल, असा उपाय भोंदूबाबाने सांगितला. तसेच या पूजेसाठी तीन लाख रुपये खर्च येईल. माझी ११ हजार रुपये दक्षिणा द्यावी लागेल. हे तीन उतारे १५ दिवसात सुरू केले नाहीत तर तुमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या जीवाला मोठा धोका असल्याची भीती देखील आरोपी भोंदूबाबाने दाखवली. पीडित महिलेच्या कुटुंबीयांकडून पैसे उकळून पीडित महिलेसह तिच्या पाच बहिणींना उतारा करण्याच्या बहाण्याने एका खोलीत नेले. खोलीचे दार बंद करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. सर्व बहिणींना बाहेर जाताना झालेल्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितल्यास 'तुझ्या आई-वडिलांना माझ्या दैवी शक्तीने व काळ्या जादूने मारून टाकीन' अशी धमकी दिली. त्यानंतर पीडितेच्या एका बहिणीसोबत उतारा काढण्याच्या बहाण्याने तीन वेळा लैंगिक अत्याचार केला. तसेच पीडितेच्या एका बहिणीचे लग्न झालेले असताना देखील तिच्याशी पुन्हा लग्न केले.
याबाबत पीडितेने पिंपरी पोलिस धाव घेत फिर्याद दिली असून, भोंदूबाबावर भारतीय दंड विधान कलम ३५४, ३५४ (अ), ३७६, ३७६ (१) (अ), ३७६ (३), ३७६ (अ ब), ४९४, ४९६, पोक्सो, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबतच्या अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भोंदूबाबाला अटक केली आहे. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment