Thursday, February 27, 2020

एकुंडी ते अनंतपूर रस्त्याचे डांबरीकरण करा

अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा ग्रामस्थांचा इशारा               जत,(प्रतिनिधी)-       
 एकुंडी ते अनंतपूर हा महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याला जोडणारा मुख्य राज्यमार्ग असूनही शासनाच्या दुर्लक्षामुळे एकुंडी येथे हा रस्ता खराब झाला आहे. प्रवाशांना चालण्यासाठी आणि गाडी चालविण्यासाठी रस्ताच दिसत नाही. रस्त्याच्या बाजूला काटेरी झुडूपांचे साम्राज्य वाढले आहे. लोकांना येथून जाताना कसरत करीत चालावे लागते. लहान मुलांना शाळेत जाण्यासाठीही त्रास होतो.

मागील अनेक वर्षांपासून कर्नाटकातील अनंतपूरला जाण्यासाठी तसेच अथणी-डफळापूर महामार्गाला जोडणाऱ्या एकुंडी-अनंतपूर या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली असल्याने आता हा रस्ता त्वरित डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांनी जत येथील तहसिलदार सचिन पाटील यांच्याकडे केली आहे.
एकुंडी येथे भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे व अनंतपूर येथील आठवडयाच्या बाजारासाठी येथील लोकांना याच मार्गावरून ये-जा करावी लागत असते. अनंतपूर येथे सोमवारी भरत असलेल्या आठवडा बाजारासाठी एकुंडी आणि परिसरातील अनेक गावचे नागरिक याच मार्गाने जात असतात.
एकुंडी व परिसरातील  एखादा रुग्ण आजारी असेल किंवा पेशंटला घेऊन रुग्णवाहिका घेऊन  मिरजेला या मार्गे जावे लागत असते. खड्ड्यांचा त्रास रुग्णांना होतो व वेळही जादा लागतो. मागील वर्षी झालेल्या पाऊसामुळे रस्त्यावर मोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालवणे मुश्कील बनत असून दुचाकीवरून आपला जीव मुठीत धरून नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. १९७२ च्या दुष्काळात रोजगार हमी योजनेतून खडीकरण झालेल्या या रस्त्यावर गेल्या ३० ते ३५ वर्षा पासून साधे मुरूमही टाकण्यात आलेली नाही.
महाराष्ट्राचे परिवहन मंडळाकडून या मार्गावर जत ते बसवेश्वर देवस्थान असलेल्या खिळेगाव पर्यत दिवसातून एक एसटी  गाडी आहे. या गाडीला ही खड्ड्यातून मार्गक्रमण करावे लागत आहे. अन्य एसटीची सुविधा नसल्यामुळे नागरिकांना व्यापाऱ्यांना शाळकरी मुलांना फार मोठा तोटा सहन करावा लागत आहे. तसेच अनेकवेळा या खराब रस्त्यामुळे लहान-मोठे अपघात घडण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे बांधकाम विभागाला आता तरी जाग येणार का ? आणि नागरिकांची रस्त्याच्या डागडुजीऐवजी डांबरीकरण करण्याच्या मागणीचा विचार करून हा अनेक वर्षाचा प्रश्न मार्गी लावणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एकुंडीचे सरपंच म्हणाले, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून ह्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी मंजुरीला प्रयत्न करावेत.कर्नाटक हद्दीतील याच रस्त्याचे डांबरीकरणाचे काम मंजूर झाले असून आता महाराष्ट्र हद्दीतील याच रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून त्वरित डांबरीकरणाचे काम मार्गी लावण्याची गरज आहे. यामुळे अनेक वर्षापासून रखडलेल्या एकुंडी-अनंतपूर रस्त्याच्या कामाचा प्रश्न मिटणार आहे.

No comments:

Post a Comment