Monday, February 17, 2020

उमदीत पेट्रोल-डिझेलची वाणवा

दोन्ही पंप रिकामेच ;जादा दराने पेट्रोल घेण्याची वेळ 
उमदी,(वार्ताहर)-
          उमदी-चडचण राज्य महामार्गावर उमदी गावाजवळ दोन कंपन्यांचे दोन पेट्रोलपंप आहेत. या पेट्रोलपंपावर पेट्रोल व डिझेलचा कायमस्वरूपी तुटवडा असल्याने व पंप वारंवार बंद राहत असल्याने सर्वसामान्य लोकांना जादा दराने पेट्रोल डिझेल खरेदी करावी लागत आहे. अन्यथा कर्नाटकातील चडचण येथे जाऊन पेट्रोल भरावे लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक या पंप चालकाच्या मनमानी कारभारामुळे वैतागले आहेत. या पंपावर पेट्रोल व डिझेल सुविधा चांगल्या प्रकारे द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू,असा इशारा तालुका पाणी संघर्ष समिती व क्रांती युवा मंचच्या वतीने देण्यात आला आहे.

         उमदी येथील हे पेट्रोल पंप कायमचे बंद असल्यामुळे ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. बागेला औषध फवारणी करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर केला जातो. मात्र पंपावर पेट्रोल डिझेल मिळत नसल्याने शेतकरी वर्गाचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच या पंपावर
ऑईल कंपन्यांद्वारे  ग्राहकांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांसाठीचे मानके ठरवून देऊनही यात मोकळी जागा, हवा मशिन, स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी थंडपेय मशिन,  महिला-पुरुष स्वतंत्र शौचालय अशा ग्राहक हिताच्या विविध सुविधांचा अभाव दिसून येतो. अशा सुविधा पेट्रोलपंपावर असाव्यात. विविध सेवा पुरवण्याची  जबाबदारी सबंधीत विभागाची असतानासुद्धा याकडे अधिकारीवर्ग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. शिवाय प्रत्येक पेट्रोलपंपावर योग्य वजनमापे, तक्रारबुक, फिल्टर पेपर, अग्निशमन यंत्र अशाही सुविधा आवश्यक  असतात. या सुविधांचाही वानवा दिसून येतो. याकरीता प्रतिलिटर पेट्रोलमागे ग्राहकांच्या खिश्यातून ठराविक रक्कम कपात केली जाते. यामुळे ग्राहकाला त्याच्या हक्काची सुविधा मिळणे आवश्यक  असताना याकडेही संबधित पुरवठा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.   
       वाहनधारक येथील पेट्रोलपंपावर इंधन
भरण्यास गेल्यास सबंधीत कर्मचारी रिडींग शुन्य करण्याचे टाळतो तसेच त्यामुळे पेट्रोल कमी भरत असल्याची ग्राहकांची  धारणा होते. याबाबत ग्राहकांने आवाज उचलल्यास कर्मचारी त्यास अपमानित करतो, कधी कधी तर तो हाताघाईवर उतरतो. यासंदर्भात ग्राहकांची तक्रार असतानाही सबंधीत शासकीय पुरवठा विभागातर्फे   पेट्रोलपंपावर कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. याठिकाणी इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम अशा प्रमुख दोन तेल पेट्रोपंप आहेत. परंतु असुन अडचण नसुन खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
          पेट्रोल पंपावरीती सर्व सोई सुविधा पेट्रोलपंपावर असाव्या ही जबाबदारी सबंधीत विभागाची असताना मात्र अधिकारीवर्ग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. प्रत्येक पेट्रोलपंपावर योग्य वजनमापे, तक्रारबुक, फिल्टर पेपर, अग्निशमन यंत्र अशाही सुविधा आवश्यक असतात. मात्र पेट्रोलपंप चालक याकडे हेतूपुरूस्पर दुर्लक्ष करीत असतात.दोन्ही पंपावर पेट्रोल डिझेल नसल्याचा फायदा घेऊन जवळच असलेल्या मंगळवेढा अगर चडचण येथून पेट्रोल डिझेल आणून उमदीत चढ्या भावाने म्हणजेच ८०रुपयांचे पेट्रोल १०० रु. प्रति लीटर विकत आहेत.
           एकूणच उमदी हद्दीतील पेट्रोलपंपावर सुविधेचा अभाव असून याद्वारे एकप्रकारे ग्राहकांची आर्थिक लुट होत आहे. याकरिता सबंधीत विभाग व त्यांच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष पुरविणे गरजेचे आहे. अन्यथा जत तहसील कार्यालया समोर तीव्र आंदोलन करु, असा ईशारा पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार उपाध्यक्ष अनिल शिंदे व क्रांती युवा मचंचे अध्यक्ष फिरोजभाई मुल्ला, उपाध्यक्ष रवी शिवपुरे यांनी दिला आहे.

नागरिकांची मागणी
बाप दाखवा....नाहीतर श्राद्ध घाला
 दोन्ही पंप बंद असताना कांही लोक बाहेरून पेट्रोल विक्री करतात किरकोळ दोन-चार रुपये जादा घेऊन पेट्रोल विक्री करतात. त्या लोकांनाच पोलीस त्रास करतात बेकायदेशीर विक्री करता म्हणून पोलीस कारवाई करतात कारवाई करण्याची पोलिसांची कामच आहे मात्र त्या प्रमाणे कायमस्वरूपी दोन पंप असूनही बंद असतात त्याकडे पोलीस वा.. शासन  का दुर्लक्ष करतात कोण जाणे. या विषयी जत तहसीलला तक्रार नोंदविला आहे.  जर पंप सुरू होत नसेल तर गावातील लोकांना टपरी, किराणा या लोकांना विक्री करण्यास परवाना द्यावे, नाहीतर पंप सुरळीत ठेवावे  म्हणून शासनाकडे  बाप दाखवा ... श्राद्ध घाला अशी मागणी नागरिकांची होत आहे.

No comments:

Post a Comment